आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kaka Asava Tar Asa, Shirish Divan, Mukt Vyaspith

काका असावा तर असा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. आमचे गाव परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातील पाटोदा. वडील शेतकरी असल्याने मीही त्यांच्यासोबत शेतात जायचो. वडील कसे काम करतात ते पाहायचो. दिवसभर मी झाडांविषयी माहिती गोळा करायचो. वडिलांनाही माझे कौतुक वाटायचे. वडिलांचा मी खूप लाडका, पण मला शाळेत जायला आवडत नसे. मी शाळेत क्वचितच जायचो. माझे काका औरंगाबादमध्ये राहायचे. ते अधूनमधून गावाकडे यायचे. एकदा ते असेच गावाला आले. मला म्हणाले, चल, तुझा अभ्यास घेतो. मी म्हटले, मी तुम्हाला झाडांबद्दल सांगू? आणि माहिती सांगायला सुरुवात केली. मग ते म्हणाले, चल, आपण औरंगाबादला जाऊ. मी म्हटले, मला तेथे नाही करमणार. तेव्हा ते म्हणाले, तेथे खूप झाडे आहेत. असे गोडगोड बोलून त्यांनी मला औरंगाबादला आणले. मीही चांगला एक महिनाभर राहिलो. मग वडिलांनी मला एक पत्र पाठवले. काका म्हणाले, वाच पत्र. मला तर ते पत्र वाचता येईना. मग माझे डोळे भरून आले. कारण मला वडिलांचे पत्र वाचता आले नाही. मग मला काकांनी मुकुल मंदिर शाळेत टाकले. तेथील सर्व मुले शिस्तीने रोज शाळेत येत. त्या वातावरणात राहून माझ्यात जिद्द निर्माण झाली. मी अभ्यास करायला लागलो. काकांनी मला लिहायला- वाचायला शिकवले. तेव्हापासून माझ्या आयुष्याला एक वेगळी कलाटणीच मिळाली. त्यानंतर इयत्ता 10 मध्ये मी चांगल्या गुणांनी पास झालो. आई-वडिलांनीही माझे कौतुक केले. आज मी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. याचे सर्व श्रेय काकांना जाते. शिक्षणाची गोडी त्या जोडीला आहे. जर त्या वेळेस काकांचे मार्गदर्शन लाभले नसते, तर मी आज अभ्यासू झालो नसतो. त्यांनी जे लिहिणे, वाचणे शिकवले ते माझ्या कायम स्मरणात राहिले.