आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल आहे, ‘नेट’ नाही, ‘वर्क’ होईना; कळंकीच्या ग्रामस्थांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार; नेत्यांनाही केली गावबंदी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पी.डी. केवट 

कन्नड (जि. औरंगाबाद) - आजवर रस्ते, पाणी आणि इतर पायाभूत सुविधा नसल्याने नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे आपण एेकले असेल. मात्र, कन्नड तालुक्यातील कळंकी येथील ग्रामस्थांनी गावात मोबाइल नेटवर्क नसल्याने चक्क विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तसे पत्र विभागीय आयुक्तांना दिले आहे.

गावात बीएसएनएल व एका खासगी कंपनीचे मोबाइल टॉवर आहे. मात्र, दीड वर्ष उलटूनही ते सुरू झालेले नाही. एकीकडे पंतप्रधान डिजिटलायझेशन, ऑनलाइन बँकिंग, ऑनलाइन योजनांसाठी आवाहन करत असताना नेटवर्कअभावी कळंकीकर वैतागून गेले आहेत. डोंगराळ भागात वसलेले कळंकी प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. मात्र संपर्काची  आधुनिक सुविधा नसल्याने गावकऱ्यांना शेतमालाचे बाजारभाव लवकर मिळत नाहीत.  गावाची लोकसंख्या अंदाजे २५०० असून ८ ग्रामपंचायत सदस्य आहे. गावात ११०० च्या वर मोबाइल हँडसेट्स आहेत. १० ते १२ किमीवर मोबाइल टॉवर असले तरी त्याची रेंज गावात येत नाही.
 

‘आऊट ऑफ रेंज’ असल्याने तरुणांच्या साेयरिकीही जुळेना
ग्रामस्थ अरुण थोरात म्हणाले, रेंजअभावी बँकेचे मेसेज येत नाही, बाजारभाव कळत नाही. तुम्हाला हसू येईल, पण लोकांशी संपर्कच होत नसल्याने गावातील मुलांची लग्नेही जुळत नाहीयेत. अर्जुन वाकळे म्हणाले, आम्ही वर्गणीतून शाळा डिजिटल केली. कॉम्प्युटर, प्रोजेक्टर घेऊन दिले. परंतु रेंज नसल्यामुळे ती बंदच आहे. 
 

नेत्यांनाही केली गावबंदी 
सर्व ग्रामस्थांनी मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत विधानसभाच काय पुढील सर्वच निवडणुकांवर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे, तर राजकीय नेत्यांना गावबंदीही करण्यात आली आहे.
 

१९९८ मध्येही बहिष्कार
कळंकीकरांनी रस्त्याच्या मागणीसाठी १९९८ लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकला होता. मतदान कर्मचारी रिकाम्या पेट्या घेऊन परतले होते. निवडणुकीनंतर मात्र रस्त्याचे काम मार्गी लागले होते.