आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कळमेश्वर बालिका बलात्कार प्रकरणी आरोपीला 13 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी; आरोपीला फाशी देण्याची पीडित मुलीच्या वडीलांची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लिंगा येथील एका तुरीच्या शेतात मुलीचा दगडाने ठेचलेला मृतदेह आढळून आला होता

नागपूर- जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथे पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी आरोपी संजय पुरी (वय 32, मोहगाव) याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरूद्ध भादंवि कलम 302, 376, पाॅक्सो तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान आरोपीला प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सादर केले असता 13 नोव्हेंबरपर्यत पोलिस कोठडी देण्यात आली. सरकारतर्फे अॅड. नितीन तेलगोटे यांनी बाजू मांडली. पीडित मुलीच्या वडीलांनी माध्यमांशी बोलताना आरोपीला फाशीची शिक्षाच ठोठावण्यात यावी, अशी मागणी केली.   


पीडित मुलीच्या घरापासून जवळच तिच्या आजीचे (आईच्या आईचे) घर आहे. मुलगी नेहमीच आजीकडे जात असे. याच रस्त्यावरील एका शेतात आरोपी संजय पुरी सालगडी म्हणून काम करत होता. त्याला पीडित मुलगी रोज आजीकडे जाणे-येणे करते हे माहिती होते. शुक्रवार (6 नोव्हेंबर)ला नेहमीप्रमाणे आजीकडे गेलेली मुलगी शनिवारी 7 ला परत आली नाही. म्हणून कळमेश्वर पोलिस ठाण्यात कलम 363 अंतर्गत मुलगी हरवल्याची तक्रार देण्यात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी लगेच तपास सुरू केला. शनिवारी रात्री तपास थांबवण्यात आला. रविवार, 8 रोजी सकाळी तपास सुरू केला असता लिंगा येथील एका तुरीच्या शेतात मुलीचा दगडाने ठेचलेला मृतदेह आढळून आला. आरोपीने मुलीला चाॅकलेटचे आमिष दाखवून शेतात नेले व तिथे तिच्यावर बलात्कार करून खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
    

कठोर कारवाईसाठी निघाले मोर्चे


हैद्राबाद व उन्नाव येथील घटनेच्या पार्श्वभूमिवर ही घटना घडल्याने लोकांमध्ये सतापाची लाट उसळली. कळमेश्वर येथे पीडितेला श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी रात्री मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. तर संतप्त नागरिकांनी पोलिस ठाण्याला घेराव घालत आरोपीला हवाली करण्याची मागणी केली. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्यबळाचा वापर करावा लागला. सोमवारी, कळमेश्वर बंदची हाक देण्यात आली. नागरीक तसेच व्यापाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे बंद ठेवला. सोमवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास सर्वपक्षीय युवकांनी मोर्चा काढून बंदचे आवाहन केले. त्या नंतर दुपारी परत नागरिकांनी मोर्चा काढून निषेध केला. तर दीड ते पावणेदोनच्या सुमारास पीडित मुलीच्या आई वडीलांसह शेदीडशे नागरिकांनी मोर्चा काढून आराेपीवर कठोर करवाईची मागणी केली.   स्टॅण्डर्ड आॅपरेटींग सिस्टिम हवी


शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी माध्यमांशी बोलताना पोलिसांनी गुन्ह्यांची उकल होण्यासाठी स्टॅण्डर्ड आॅपरेटींग सिस्टिम (एसओपी) तयार करायला हवा तसेच साक्षीदार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली. उन्नाव प्रकरणात साक्षीदार संरक्षण कायद्याची प्रचंड हेळसांड झाली, असे त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र


हरवलेल्या व्यक्तींना शोधण्याचा महत्त्वाचा कालावधी तक्रारी नोंदविण्यात होणाऱ्या विलंबातच जातो. तो टाळण्यासाठी व ताबडतोब शोधकार्य सुरू व्हावे म्हणून अशा व्यक्ती हरविल्याबाबतच्या तक्रारी एसएमएस, व्हॉटस्अ‍ॅप, ई-मेलद्वारे व तक्षणी नोंदविण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात केली आहे.
महिलांवर वारंवार हल्ले आणि अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे. आयटी क्षेत्रात काम करण्याऱ्या महिलांचा समावेश यात जास्त आहे. महिला सुरक्षा व पायाभूत सुविधांची निगराणी याबाबत रस्ते वाहतुक, हायवे अॅथाॅरिटी, टोल प्लाझा देखरेख करतांना फक्त  सीसीटीव्ही पुरेसे नसून  आॅनलाईन व्हिजीलन्स  माध्यमातून देखरेख करण्यात यावी, अशी मागणी गोऱ्हे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...