आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोअरवेलमध्ये पडलेल्या सहावर्षीय बालकाला वाचवण्यात यश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळवण - तालुक्यातील बेज गावात सहावर्षीय मुलगा जुन्या बंद पडलेल्या बोअरवेलमध्ये पडल्याची घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. ५० फूट खोल गेलेल्या मुलाने बचावकार्य करणाऱ्यांना प्रतिसाद देत सूचनांचे पालन केल्यामुळे तीन तासांत मुलगा सुखरूप बाहेर आला. यामुळे बालदिनाच्या दिवशी बालकाचा पुनर्जन्म झाला.

कळवण तालुक्यात सेंधवा, मध्य प्रदेशमधून काही कुटुंबे बेज येथील एकनाथ खैरनार यांच्या शेतात मका कापणीसाठी आली आहेत. मका कापणी सुरू असताना शेताजवळ खेळणारा रितेश जवानसिंग सोळंकी हा सहा वर्षांचा मुलगा ८ वर्षांपासून बंद असलेल्या बोअरवेलमध्ये पडला. या वेळी सोबत असलेला ३ वर्षांचा लहान भाऊ जितेंद्र सोळंकी याने आरडाओरड करून जवळ असलेल्या आईवडिलांना व नातेवाइकांना बोलावले. यानंतर या घटनेची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी पोलिस पाटील तसेच कळवण तहसीलदार, प्रांताधिकारी व पोलिस प्रशासनाला दिली. प्रसंगावधान राखत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले. बचावकार्य सुरू करून जेसीबी आणि पोकलेनने बोरवेलच्या समांतर जवळपास वीस फूट खोल खड्डा आजूबाजूला खोदण्यात आला. यानंतर त्याला ऑक्सिजन मिळण्याची व्यवस्था सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली. मुलगा ५० फुटांवर अडकल्याचे वरून सोडलेल्या दोरखंडामुळे निदर्शनास आले. यानंतर मुलाला सूचना देऊन सदर दोरखंड बांधून गाठ बांधायला सांगितली. मुलाने दोरखंड पायाला गुंडाळून घट्ट पकडल्यावर त्याला हळूहळू वर ओढून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. बाहेर येताच त्याला ऑक्सिजन लावला व तपासणी करून त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

घटनास्थळी आमदार नितीन पवार, माजी जि. प. सभापती रवींद्र देवरे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. पंकज आशिया, तहसीलदार बी. एन. कापसे, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, आरोग्य यंत्रणेचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल काटे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत पाटील व डॉ. जगदीश जाधव, डॉ. सुधीर पाटील यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी मदत केली.बोअर पूर्ववत
 
यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे बोअरवेलमधील भराव दबला व तेथे खड्डा तयार झाला. आज या ठिकाणी खेळताना रितेश अचानक खाली दबला गेला व ५० फुटांपर्यंत जाऊन थांबला. बुजलेल्या बोअरचा  भराव अतिवृष्टीमुळे दबला गेल्याचे यंत्रणेने सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

कळवण उपविभागीय अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलास (एनडीआरएफ) पाचारण केले होते. पथक कळवणच्या दिशेने यायला लागले असताना स्थानिक नागरिकांचे बचावकार्य यशस्वी झाल्याने एनडीआरएफची टीम माघारी धाडण्यात आली. दरम्यान, प्रशासनाच्या अतिशीघ्र कारवाई आणि प्रसंगावधानाने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अधिकाऱ्यांचे व यंत्रणेचे कौतुक केले.