Home | Magazine | Rasik | kamalakar Nadkarni article in rasik

तात्यांनू! वस्त्रहरण झाला?

कमलाकर नाडकर्णी | Update - Sep 02, 2018, 07:38 AM IST

उत्स्फूर्त नाट्यविष्कार हे दशावतारी नाटकाचे प्राणतल आहे. नेमके तेच ‘वस्त्रहरण’ने उचलले आहे.

 • kamalakar Nadkarni article in rasik

  'वस्त्रहरण'हे रंगभूमीला पडलेलं खुमासदार स्वप्न आहे. हा तांबड्या मातीतला अस्सल लोककलाकेंद्री फार्स आहे. आजवर पाच हजाराहून अधिक प्रयोग झालेल्या या नाटकाने खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीला पांढरपेशा संस्कृती-सभ्यतेच्या अनावश्यक दडपणातून मुक्त केलं आहे. असं हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक-सामाजिक चलनवलनावर प्रभाव टाकणारं सदाबहार नाटक पुन्हा एकदा नव्या संचात रंगभूमीवर अवतरलंय. त्या निमित्ताने 'वस्त्रहरण'मुळे आलेल्या झपाटलेपणाचा काळ जागवणारा हा फर्मास लेख...

  रात्रौचे जास्त नाही, साडे आठच वाजले होते. नाटक सुरू व्हायची वेळ. फोन खणखणला. नाटकाच्या घंटेसारखाच. ‘मी मच्छिंद्र, उद्या षण्मुखानंदला उत्सवी प्रयोग.’ ‘माहीत आहे. येणार बघायला.’ ‘नको येऊस’ ‘म्हणजे?’ ‘बघायला येऊ नकोस. स्टेजवरच ये.’ ‘तुला उद्याच्या प्रयोगात काम करायचं आहे.’ ‘अरे, पण तालीम?’ ‘तुला तालीम कशाला?’ तुझं ‘काका किशाचा’ मी दहा वेळा पाहिलंय. ‘अरे पण, त्या ‘काका’चा आणि वस्त्रहरणाचा काय संबंध?’ ‘अर्धा तास अगोदर ये. तुला देवाचं काम करायचंय.’ खट्‌ट. फोन ठेवला. मी गरगरलोच. मनात मालवणीतच म्हणालो ‘देवा तू पाव!’ ‘शो मस्ट गो ऑन’ हे देखील मनात आणि मालवणीत म्हणालो आणि षण्मुखानंदला वेळेच्या अगोदर हजर झालो.

  मच्छिंद्रने देवाचा प्रसंग माझ्यावर घातला. त्यावेळी ‘वस्त्रहरण’ नाटकाचं पुस्तकही छापलं नव्हतं. पण मला सारं नाटक ठाऊक होतं. मी आणि माझ्या मुलींनी ‘वस्त्रहरण’ सोळा वेळा तोंड फाटेपर्यंत पाहिलं होतं. मी बिनधास्त होतो. कारण मालवणी भाषा मला चांगलीच अवगत होती. म्हणजे घरात मी, आई आणि वडील मालवणीतच बोलत असू. बायको आणि दोन मुली मात्र मालवणीपासून लांब होत्या. पण आमचं मालवणी कान टवकारून मनापासून ऐकत राहायच्या. एखादं गाणं ऐकावं तशा. धाकटी आजीकडे माशाच्या आमटीचा हट्‌ट मालवणीत करायची. ‘आज्ये बांगडे हाड मगे.’ नातीचे बोल ऐकून आजी खूश व्हायची. मला दुरदुरीत बांगड्याची आमटी बांगड्यासकट मिळायची.

  तर रंगमंचावर मुकुट बुकुट घालून अस्मादिक देव अवतरले आणि मोकाट सुटलेच देवचारासारखे. प्रेक्षकांनी टाळ्या देऊन मला अधिकच तारवटवले. देवाचं काम करणारा मूळ नट कागद-पेन घेऊन समोरच बसला होता. पुढच्या प्रयोगासाठी त्याला बरेच विनोद मिळाले. त्या दिवशीचा ५००वा प्रयोग तुफान रंगला. अशोक सराफ, सचिन असे सगळे ख्यातनाम होते, पण मीच एकटा अस्सल मालवणी होतो.


  ‘भद्रकाली प्रॉडक्शन्स’चं ‘वस्त्रहरण’ हे सदाहरित नाटक. कोकणात नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. ‘वस्त्रहरण’ हा भद्रकालीचा कल्पवृक्षच आहे. पूर्वी आचार्य अत्र्यांचे ‘लग्नाची बेडी’ हे नाटक सदाहरित समजले जायचे. ख्यातनाम नट आणि ‘लग्नाची बेडी’ हे नाटक नट बदलले - तरी नाटक सदा हाऊसफुल्ल. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, तनुजा इ. मंडळींनी तर बांधिलकीच्या भावनेनं या नाटकाचा दौरा करून ‘सामाजिक कृतज्ञता निधी' जमा केला होता.

  ‘वस्त्रहरण’ बोलीभाषेतलं नाटक. प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांच्या मालवणीतलं हे बहुधा पहिलंच संपूर्ण नाटक. यापूर्वी ‘ललाट लेख’ या नाटकात ‘पीटा’ नावाची एक व्यक्तिरेखा होती. मालवणी बोलून हसे मिळवणारी मराठी रंगभूमीवरील ही बहुधा पहिली मालवणी महिला. ‘माजा नाव पीटा, खंय गेली माजी भूतां’ हे तिचं पालुपद. मद्रासी व्यक्तिरेखा जशी बऱ्याच नाटक सिनेमातून हमखास हशे मिळवण्यासाठी वापरली गेली, तद्वतच मालवणी व्यक्तिरेखांचा उपयोग केला गेला. संपूर्ण मालवणी भाषेतलं हे बहुधा पहिलंच विनोदी नाटक.

  मराठी नाटकांच्या प्रेक्षक संख्येचा अभ्यास केला, तर त्यात ८० टक्के प्रेक्षक कोकणातलेच आढळून येतील कोकणाइतका नाटकवेडा (कोकणात तर असंही म्हणतात,की एखादा वेडा असतो ना तोसुद्धा नाटकातलीच गाणी गातो!) प्रदेश महाराष्ट्रात दुसरा नाही. नाटककारापासून नटापर्यंत अगदी बुकिंग क्लार्कसह सर्वाधिक व्यक्ती कोकणातल्याच आढळतात. या ऐंशी टक्के लोकांना अगदी पहिल्यांदा आपल्या मातृभाषेतलं संपूर्ण नाटक ‘वस्त्रहरणा’च्या निमित्ताने बघायला मिळालं. या नाटकाची भाषाच फक्त मालवणी नव्हती, तर संपूर्ण नाट्यमाहोलच मालवणी म्हणजे कोकण हाच होता. आणि जत्रेला किंवा वार्षिक उत्सवाला होणारा नाट्यप्रयोग हा त्यांच्या सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य भाग होता. आजही दूरदर्शन व चित्रफितीच्या काळातही कोकणात ‘दशावतार किंवा दहिकाला’ नाट्यप्रकाराला तुफान गर्दी होत असते. पूर्वी इतकी नसली तरी अजूनही बरीच दशावतारी मंडळे टिकून आहेत. ‘वस्त्रहरण’ हे नाटक म्हणजे फार्सिकल दशावतारच आहे. आणि त्यामुळेच आपण आपलंच, नाटक आपल्या गावी जाऊनच बघतो आहोत, अशी एक गाववाली आपुलकीची भावना आपोआप बहुसंख्य प्रेक्षकांत निर्माण होते. किंबहुना, हा विशेष हाच या नाटकाच्या आकर्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. (आणि जाता जाता हेही सांगायला पाहिजे की त्यानंतर रंगभूमीवर आलेलं व तसाच उत्तम प्रतिसाद मिळवणारं ‘यदाकदाचित’ हे नाटक प्रमाण मराठी भाषेतलं असलं तरी त्यातही प्रामुख्यानं दशावतारच आहे.) पण, केवळ दशावतारावरच हे नाटक थांबत नाही. या नाटकात लोकनाट्य म्हणजे तमाशाही आहे. देवांच्या दरबारातली लावणी आहे. तुफान लोकप्रिय विनोदी नाटकांची आलोचना केली, तर त्यांच्या लोकप्रियतेचं कारण त्यात दडून बसलेला तमाशाचा घटक हा असतो. हे सहज समजून येईल. हे केवळ लावणीला उद्देशून मी म्हणत नाही. तमाशात जो उघड उघड चावटपणा असतो, तो या तुफानी नाटकातून कुठेना कुठे झिरपत असतो. ‘वस्त्रहरण’मध्ये चावटपणा नाही, पण फाजीलपणा आहे. जो सर्वांसकट मनमुराद अनुभवता येतो.
  मराठी नाटकांचा प्रेक्षकवर्ग हा एक विशिष्ट स्तराचा होता. मध्यमवर्गीय वा उच्च मध्यमवर्गीय हे मराठी नाटकांचे आश्रयस्थान होते. ही कोंडी जोरदारपणे प्रथम फोडली, ती ‘वस्त्रहरण’ या नाटकाने. ते केवळ मध्यमवर्गाची वा पांढरपेशांची करमणूक म्हणून राहिलं नाही. सर्वसामान्य प्रेक्षक ते प्रतिष्ठित सुशिक्षित अभिजनवर्ग सर्वांनीच ‘वस्त्रहरण’ आपलंस केलं. जो प्रेक्षक नाट्यगृहाकडे कधी वळला नव्हता, तो वस्त्रहरणमुळे थिएटरवाला झाला. सर्व प्रकारच्या प्रेक्षकांचा प्रतिसाद हे त्याच्या चिरंतन लोकप्रियतेचे एक प्रमुख कारण आहे. माझं तर पुढे जावून असंही म्हणणं आहे, खास मालवणी शिव्यांची प्रेमळ बरसात असलेलं वस्त्रहरण तेंडुलकरांच्या "सखाराम बाइंडर'आधी आलं, तर सखारामची रासवट भाषा प्रेक्षकांना जड गेली नसती. असो.

  तोपर्यंत मराठी रंगभूमीवर आलेले बरेचसे फार्स हे पाश्चात्य फार्सची रूपांतरे वा आधारित होते. ‘वस्त्रहरण’ असा एक फार्स होता, की ज्याला कसलेच पाश्चात्य कपडे नव्हते. तो तांबड्या मराठी मातीतला अस्सल फार्स आहे. उत्स्फूर्त नाट्यविष्कार हे दशावतारी नाटकाचे प्राणतल आहे. नेमके तेच ‘वस्त्रहरण’ने उचलले आहे. म्हणूनच ‘वस्रहरण’चा कुठचाही प्रयोग किती वाजता संपेल, त्याची खात्री कुणालाच देता यायची नाही. एक नट दुसऱ्यावर कुरघोडी करायला लागला, की आपोआपच लांबी वाढायची. सगळेच नट अंगात वारे आल्यासारखे काम करायचे. त्यामुळे नटांबरोबर प्रेक्षकही झपाटले गेले तर नवल नाही. मी ज्या षण्मुखानंदच्या प्रयोगात होतो, तो संध्याकाळी सात वाजता सुरू झालेला प्रयोग, माझ्या स्मरणाप्रमाणे अकरा-साडेअकराच्या दरम्यान संपवावा लागला होता. प्रेक्षकांची हसून हसून दमछाक झाली होती.

  देहबोलीचा भन्नाट वापर हे या नाट्यप्रयोगाचे अतुलनीय वैशिष्ट्य आहे. नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या प्रसंगनिष्ठ विनोदावर ही देहबोली अशी काही स्वार होते, की नाटक सर्वथैव नटांचे आणि रमेश रणदिवे या दिग्दर्शकाचेच होते. अर्थात मांड म्हणजे,पाया लेखकाचा आणि तो मजबूत. म्हणूनच हे शक्य झाले. मच्छिंद्रच्या तात्या सरपंचच्या भूमिकेतल्या कमालीच्या स्वाभाविक अभिनयाचा वस्त्रहरणच्या यशात सिंहाचा वाटा आहे.


  या ‘वस्त्रहरण’ नाटकाने मालवणी बोलीभाषेला प्रतिष्ठा मिळवून दिली. या बाबतचे सर्वाधिक श्रेय निर्माते व प्रमुख नट स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी यांना द्यायलाच हवे. नाटकातील नाटकाचा सरकत्या दोराचा काल्पनिक पडदा तर अफलातूनच, क्षणाक्षणाला अष्टवक्र होणारा गोट्या (दिलीप कांबळी) विसरणे शक्य नाही. या नाटकामुळे नाटककार गंगाराम गवाणकर केवळ लोकप्रियतेच्या शिखरावरच विराजमान झाले नाहीत,तर या नाटकाच्या यशाने त्यांना अ.भा. नाट्यपरिषदेचे अध्यक्षपदही सहजी प्राप्त करून दिले. परिषदेलाही आपण एका बोलीभाषेतल्या नाटककाराला अध्यक्ष केल्याचे श्रेय मिळवता आले. तर नाटककार गवाणकर इतके ‘वस्त्रहरणमय’ झाले की त्यांना जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी वस्त्रहरणच दिसू लागले. कुठेही भाषण असो, समारंभ असो त्यांनी ‘वस्त्रहरण’ची आठवण काढली नाही, अशी एकही घटना घडली नाही. पुढे ‘वस्त्रहरण’च्या परदेशप्रवासावर तर त्यांनी एक ग्रंथच प्रसृत केला. शिवाय दैनिकात वर्षभर स्तंभही लिहिला. अधून मधून किस्से पेरणी चालूच. विषय अर्थातच वस्त्रहरण. याच वस्रहरण’च्या वलयामुळे लोक त्यांना अहो, ‘वस्त्रहरण गवाणकर’ अशी प्रेमळ हाक मारू लागले. या सगळ्या धुमशानीत गवाणकरांची पुढची नाटकं थबकली. त्याचं काय?

  या नाटकानं ‘मालवण’ या शब्दातच रुची निर्माण केली (त्या शब्दात लवण अर्थात मीठ असल्यामुळे का?) पूर्वी मालवणी भोजनालये दुर्मीळ होती. दक्षिणी व पंजाबी पदार्थांची रेलचेल होती. ‘वस्त्रहरण’ लोकप्रिय झाल्यापासून मुंबई-ठाणे पट्ट्यात मालवणी खाद्यगृहे वाढली. पूर्वी गिरगावांत ‘अनंताश्रम’ व दादरला ‘दुर्गाश्रम’ होते. नाटकानंतर जागोजाग अगदी उपनगरांत सुद्धा ‘कोकण किनारा’, ‘मालवणी कट्‌टा’, ‘फिश करी’, ‘गजाली’ अशा कोकणी खादाडी उभ्या राहिल्या. गजाली हा नवा शब्द आणि त्याचा अर्थ हॉटेलमुळे लोकांना कळला. ‘ताज’मध्ये तर मेनूकार्डमध्ये मालवणी पदार्थांचे वेगळे पान आहे. नाटकाच्या सामाजिक परिणामांचे चविष्ट उदाहरण दुसरे कुठले नसेल. (काही दक्षिणी हॉटेलवाले हल्ली मालवणी पदार्थ देऊ लागले आहेत. शेवटी राष्ट्रीय एकात्मकतेचा मार्ग जिभेवरून जातो, हेच खरं!)


  ‘वस्त्रहरण’ नाटक म्हणजे देवांचा मेळावा - काहीजण या नाटकाला देवांचे नाटकच म्हणतात. आणि देवांना मरण नसते! जोपर्यंत मालवणी भाषा व ती बोलणारे लोक आहेत तोपर्यंत मच्छिंद्रचा वारसा पुढे चालवत प्रसाद कांबळी सादर करत असलेल्या ‘वस्त्रहरण’ला मरण नाही.
  नवविवाहित मालवणी जेव्हा मधुचंद्राहून आपल्या मित्रमंडळीत येतो, तेव्हा त्याचे मालवणी मित्र त्याला पहिला प्रश्न करतात.
  काय, तात्यांनू ‘वस्त्रहरण’ झाला?
  ‘मी हनीमूनांक गेलंय तो काय धुणी वाळत घालूक गेलंय. चूप राव! फाजील मेले!’

  एकाकिकेचं नाटक झालं
  ही मुळात एकांकिका. तिचं नाव, "आज काय नाटक होवाचा नाय'. गंगाराम गवाणकरांनी १९६२ मध्ये ती लिहिली. लिहून झाल्यावर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दोस्त असलेल्या त्यावेळच्या उदयोन्मुख दिग्दर्शक-नेपथ्यकार दामू केंकरेंना वाचायला दिली. पण, केंकरेंकडून ही एकांकिका कुठे तरी गहाळ झाली. मग गवाणकरांनी आठवून आठवून पूर्ण लांबीचे नाटकच लिहिले. त्याला नाव दिलं ‘वस्त्रहरण'.

  'वस्त्रहरण'चा काळाबाजार
  १९८० मध्ये "वस्त्रहरण'चा पहिला प्रयोग झाला. त्यानंतर आजवर या नाटकाचे तब्बल सहा हजारहून अधिक प्रयोग झाले आहेत. नाटकाच्या शिवाजी मंदिरला झालेल्या १७५ व्या प्रयोगाला पु.ल. देशपांडेंनी हजेरी लावली आणि त्यानंतर हे नाटक उभ्या महाराष्ट्राचे झाले. तोवर मराठी रंगभूमीवर प्र. के. अत्रेंच्या "तो मी नव्हेच' नाटकाने विक्रम प्रस्थापित केले होते. या नाटकाची तिकिटं काळ्याबाजारात विकली गेली होती. पण त्यानंतर असा प्रकार "वस्त्रहरण'च्या बाबतीत घडला.

  दिग्गजांना भूरळ 'वस्त्रहरण'ची
  'वस्त्रहरण'ने रंगभूमीवर अक्षरश: धुमाकूळ घातला. पु.लं देशपांडेंसारख्या खेळियाला या नाटकात काम करण्याचा मोह आवरला नाही. तशी भावना त्यांनी, मच्छिंद्र कांबळ‌ींना पत्र लिहून बोलून दाखवली .पुढे षण्मुखानंद हॉलमध्ये नाटकाच्या समाजपयोगी कार्यासाठी निधी गोळा करण्याच्या उद्देशाने आयोजित महोत्सवी प्रयोगात पु. ल. नाही, पण मराठी चित्र-नाट्यसृष्टीतल्या इतर दिग्गजांनी वस्त्रहरणमध्ये काम करण्याचा योग जुळून आला. या नाटकाची दणक्यात जाहिरात करण्यात आली. नाटकाला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर कुटुंबियांसह उपस्थित राहिल्या आणि रंगमंचावर मच्छिंद्र कांबळींच्या तात्या सरपंचासह मास्टर भगवान (भीष्माचार्य), डॉ. काशिनाथ घाणेकर (दु:शासन) अशोक सराफ (धर्म), नाना पाटेकर (भीम), संजय जोग (शकुनी मामा), सचिन पिळगावकर (विदूर) सतीश पुळेकर (अर्जुन), बाळ धुरी (दुर्योधन), कमलाकर नाडकर्णी (देव), विजू खोटे (अध्यक्ष)आदी दिग्गजांनी आपापल्या भूमिकांमध्ये तुफान रंगत आणली.

  लेखकाचा संपर्क : ९३२४६३२९८९

  kamalakarn74@gmail.com

Trending