आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकन्नड - मोबाइलवरील लुडो गेम खेळताना झालेल्या वादातून दोघा भावंडांनी आपल्या मित्राचा ‘गेम” केला. कन्नड तालुक्यातील गुदमा येथील शिवारात कौतिक नारायण राठोड हा राहुल जाधव, मोतीराम जाधव या आपल्या मित्रांसोबत मोबाइलवरील लुडो गेम खेळत असताना त्यांच्यात वाद झाला. या वादातून राहुल, मोतीराम या दोन सख्ख्या भावंडांनी कौतिक याचा त्याच्याच कंबरेच्या पट्ट्याने व पट्टा तुटल्यानंतर दोरीने गळा आवळून निर्घृणपणे खून केला. ही घटना गुरुवारी रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मोबाइलवरील लुडो खेळामुळे कौतिक या १४ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तालुक्यातील गुदमातांडा येथील राहिवासी नारायण फत्तू राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. ७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी शेतातून घरी आल्यावर बघितले असता मुलगा कौतिक नारायण राठोड (१५) घरी आलेला दिसला नाही. म्हणून त्याची शोधाशोध केली असता चिंचखेडा शिवारातील गायरान तळ्याजवळ मुलगा पडलेला दिसला. त्याच्या जवळ जाऊन बघितल्यावर त्याची जीभ बाहेर आलेली आणि नाकातोंडातून रक्त आलेले तर उजव्या डोळ्यास जखम झालेली दिसली. या वेळी नातेवाइक व गावचे पोलिस पाटील यांना मुलाचा घातपात झाल्याची खात्री पटल्याने पोलिस पाटील यांनी तत्काळ ही खबर ग्रामीण पोलिस ठाण्यात दिल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश सातव, पोलिस निरीक्षक सुनील नेवसे, उपनिरीक्षक बजरंग कुटुंबरे, बीट जमादार मनोज घोडके यांनी रात्री साडेदहा वाजता घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
खून करून मोठा भाऊ धुळ्याकडे पळाला होता
मृत तरुण व विधिसंघर्ष बालक यांच्यात मोबाइलवरील गेम खेळण्यावरून भांडण सुरू झाले होते. त्यावेळी विधिसंघर्ष बालकाचा मोठा भाऊ राहुल तेथे आला त्यावेळी मृत कौतिक राठोड याने मी आता माझ्या घराच्यांना सांगतो पोलिसात तक्रार देतो, असे म्हटल्याने छोट्या भांडणाचे रूपांतर मोठ्या वादात झाल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कौतिकचा आपल्या हातातून खून झाल्याचे लक्षात आल्याने राहुल जाधव धुळ्याकडे पळून गेला होता.
असा झाला गुन्हा उघड
मृत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल सुबाराम जाधव (२५) व त्याचा लहान भाऊ विधिसंघर्ष बालक (१२) शिरपूर जि. धुळे आदिवासी (पावरा) समाजाचे सध्या गुदमातांडा येथील गायरान मध्ये झोपडी करून राहतात. मृत कौतिक राठोड व विधिसंघर्ष बालकांत चांगली मैत्री होती. ते सोबत बकऱ्या चारण्यासाठी जंगलात जात असत. घटनेच्या दिवशीही हे दोघे सोबत होते. मृताच्या एका नातेवाइकाने दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दोघे मोबाइलवर काहीतरी बघत असल्याची माहिती दिली. तर संध्याकाळी कौतिक राठोड घरी आला नाही म्हणून जाधव यांना फोन केला असता आम्हाला माहिती नसल्याचे सांगितले. तर घटना उघड झाल्याने घाईगडबडीत दोघे दुचाकीवर जात असल्याचे राठोडच्या एका नातेवाइकाने बघितले व विचारले तर शिवूर येथे सासूरवाडीला चाललो असे राहुल जाधव यांनी सांगितल्याने आपल्या मुलाचा खून यांनीच केल्याचा संशय आला. यामुळे पोलिसांनी दोन्ही अारोपींना ताब्यात घेतले असून कलम ३०२, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
कौतिक राठोड याचा कोणत्या कारणाने खून करण्यात आला हे निष्पन्न झाले नसल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक बजरंग कुटुंबरे बीट जमादार मनोज घोडके करत आहे.
एक जण बालसुधारगृहात
एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर राहुल हा आरोपी धुळे येथे पसार झाला होता. त्यास पोलिसांनी धुळे येथून अटक केली. त्यास शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.