आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्धाकडून बुद्धाकडे निघाले कारगिल...बंद शाळा उमेदीने सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कारगिल - कारगिलच्या बटालिक सेक्टरमध्ये लालुंग नावाचं गाव आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे १५ हजार फूट उंचीवर वसलेलं. गावाशेजारी लष्करी छावणी. २० वर्षांपूर्वी झालेल्या कारगिल युद्धानं या गावाला जखमी केलं. पाकिस्तानी सैन्य आतपर्यंत घुसलं. इथल्या सामान्य माणसांचं आयुष्य युद्धानं उद्ध्वस्त केलं. जनजीवन विस्कळीत झालं. शाळा बंद पडली. 


त्याच लालुंगमधील शाळेच्या प्रांगणात आम्ही होतो. पुर्गी भाषेत मुलं प्रार्थना म्हणत होती. सहावी ते दहावीपर्यंतची ही शाळा. शाळेत मुलींची संख्या लक्षणीय. कारगिल युद्धात शाळा बंद पडली. पण, पुन्हा काही वर्षांनी ती उभी राहिली. त्या शाळेत ही प्रार्थना सुरू होती. देशासाठी मरण्याची वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही, असे सांगणारी ती प्रार्थना. 


नववीतील आबेदा तिथं भेटली. तिला एअर होस्टेस व्हायचं आहे. झुबेरला फौजी व्हायचंय, तर इक्बालला क्रिकेटर. 
दहावीतल्या सलमाला म्हटलं, कारगिलबद्दल तुला काय वाटतं? ती म्हणाली, खूप अभिमान वाटतो. आम्ही देशाला विजय मिळवून दिला. पण, पुढं ती म्हणाली, ‘लेकिन युद्ध के लिए नहीं, बुद्ध के लिए कारगिल जाने जाना चाहिए.’ कारगिलमध्ये अपाती, कर्चेखर, किरमरचे अशा अनेक ठिकाणी बुद्धमूर्ती आहेत. शिल्पे आहेत. त्याचा उल्लेख ती करत होती. तिच्या सुरात इतरांनीही सूर मिसळला. युद्धानंतर जन्मलेल्या नव्या पिढीला युद्ध नव्हे, बुद्ध अधिक आश्वासक वाटतोय!