आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kargil Victory Day: Captain Vikram Batra's Twin Brother Vishal Expresses Sentiment After Returning From A 3,000 Foot Tall Batra Top

कारगिल विजय दिवस : कॅप्टन विक्रम बत्रा यांचा जुळा भाऊ विशालने १७ हजार फूट उंच बत्रा टॉपहून परतल्यावर व्यक्त केल्या भावना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या २० वर्षांपासून बत्रा टॉपवर एकदा जाण्याचे माझे एक स्वप्न होते. माझी ही इच्छा मी अनेकदा विक्रमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बोलून दाखवली. लेफ्ट. वाय. के. जोशी हे कारगिल युद्धादरम्यान विक्रमचे कमांडिंग ऑफिसर होते. सध्या ते लष्कराच्या १४व्या तुकडीचे जीआेसी आहेत. त्यांच्यामुळेच या वर्षी माझे स्वप्न पूर्ण झाले. अनेक अडचणी आल्यामुळे लेफ्ट. जोशी यांनी मला एअरड्रॉप करून तेथे पोहोचवण्याचा निर्णय घेतला. बत्रा टॉपपासून १०० मीटर अंतरावर सपाट जमिनीवर आमचे चॉपर उतरले. बत्रा टॉपवर जायचे आहे या विचारातून मी आदल्या दिवशी रात्री झोपू शकलो नव्हतो. आम्ही १५ जण हाेतो. सर्वच जण २० वर्षांनंतर या शिखरावर जात होतो. यात हे शिखर शत्रूच्या ताब्यातून सोडवण्यासाठी विक्रमसोबत लढलेले सैनिकही होते. चॉपरमधून उतरल्यावर या शिखरावर पाऊल ठेवले नाही तोच मनात अनेक प्रश्नांनी काहूर माजवले. विक्रम कुठे उभा होता, त्याने कुठून बंकरमध्ये उडी घेतली, त्याने तीन पाकिस्तानी सैनिकांना कुठे कंठस्नान घातले, किती बंकर्स होते आणि किती राउंड गोळीबार झाला... एक ना अनेक प्रश्न मनात येत होते. विक्रमला कोणत्या ठिकाणी गोळी लागली होती... आणि त्याने नेमका कुठे अखेरचा श्वास घेतला असेल ... मी मनालाच हे प्रश्न विचारत चालत होतो. मी विक्रमच्या शौर्याबद्दल यापूर्वी अनेकदा ऐकले होते. मात्र, या वेळी ते स्थळ डोळ्यांनी पाहत असताना वाटत होते हे सर्व पहिल्यांदाच पाहतो आहे...


२६ जून १९९९ रोजी विक्रमने आई-वडिलांशी सॅटेलाइट फोनवर संपर्क साधला होता. ती त्याची अखेरची भेट ठरली. अत्यंत उत्साहात त्याने कळवले होते की, लष्कराने ५१४० शिखर शत्रूच्या ताब्यातून मुक्त केले आहे. काही दिवसांनी तो आपल्या पुढील मोहिमेवर निघाला. पॉइंट ४८७५ जिंकण्याच्या मोहिमेसाठी ५ जुलै १९९९ रोजी त्याच्या पथकाने चढाई सुरू केली होती. ७ जुलै १९९९ रोजी या शिखरावर तिरंगा फडकला होता. याच दिवशी विक्रम शहीद झाला होता. आज हे शिखर बत्रा टॉप म्हणून ओळखले जाते. २० वर्षांनंतर ७ जुलै २०१९ रोजी मी याच ठिकाणावरून आई-वडिलांना फोन केला. फोन घेताच वडिलांनी विचारले, कुठे आहेस? मी उत्तर दिले, “बत्रा टॉपवरून बोलत आहे.’... हा फोन विक्रमने स्वत: केला असता तर... येथे येण्यापूर्वी मला सतत वाटत होते की विक्रम आज असता तर... माझ्या मनात काहूर माजले होते. जणू विक्रम मला येथे बोलावतो आहे आणि मी त्याला भेटण्यासाठी जात आहे. मी विक्रम आणि त्याच्या शहीद सहकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सोबत उदबत्ती आणि धूप घेऊन गेलो होतो. हा भाग आजही माझ्या भावाच्या शौर्याची गाथा सांगतो. वाटते, आजही विक्रम या शिखराच्या रक्षणार्थ तैनात आहे.


१७ हजार फूट उंचीच्या या शिखरावर पोहोचणे सामान्य माणसाला शक्य नाही. मला प्रत्येक दुसऱ्या पावलावर श्वास घेण्यासाठी थांबावे लागत होते. २० वर्षांपूर्वी गोळीबार सुरू असताना गडद काळोखात जे सैनिक या शिखरावर पोहोचू शकले ती दैवी शक्तीच म्हणायला हवी.  पाकिस्तानी विक्रमला शेरशहा म्हणत. कारण, एखादा सिंहच हे काम करू शकतो... बत्रा टॉपवर पोहोचल्यावर मी स्तब्ध उभा होतो. मला विक्रमचे अस्तित्व अनुभवायचे होते. ज्या दगडांना २० वर्षांपूर्वी माझ्या भावाने स्पर्श केला होतो त्या दगडांना स्पर्श करून मी विक्रमचे अस्तित्व अनुभवले. माझ्या भावना अनावर होत्या. जोरजोरात रडावे असे मला वाटत होते. मात्र, मी रडू शकलो नाही.. कारण माझा भाऊ हसत हसत लढला होता. अखेरच्या व्हिडिओतही तो हसतानाच दिसत होता. मग या शिखरावर त्याला भेटताना मी कसा रडू शकेन? ऑक्सिजनची कमतरता आणि बर्फाने आच्छादलेली शिखरे अशा ठिकाणी मी दोन तास थांबलो... विक्रमचे अस्तित्व अनुभवले. मूक संवाद साधला. आता विक्रम माझ्या कणाकणात सामावला होता. माझ्यासाठी बत्रा टॉप हेच चारधाम होते.


हे शिखर आता ‘बत्रा टॉप’ आहे... 
कॅ. विक्रम बत्रा यांनी ७ जुलै १९९९ रोजी हे शिखर शत्रूच्या ताब्यातून मुक्त केले होते. येथेच ते शहीद झाले. या शिखरावर घेतलेले हे छायाचित्र त्यांचा जुळा भाऊ विशाल यांचे आहे.

 

(शब्दांकन : उपमिता वाजपेयी)

बातम्या आणखी आहेत...