आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kargil Vijay: Indian Army Declares Funeral Of Pak Soldier With Allah hu Akbar's Slogan After Pak Denies Identity Of Its Soldiers

कारगिल विजय : पाकने आपल्या सैनिकांची ओळख नाकारली तेव्हा भारतीय सैन्याने अल्लाह-हू-अकबरच्या घोषणा देत केला मृत पाक सैनिकांचा अंत्यविधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी जेव्हा कारगिलमधील त्या १६,५०० फूट उंचीवरील शिखरावर पोहोचलो तेव्हा तेथे पाच सैनिकांचे मृतदेह पाकच्या ध्वजात गुंडाळलेले होते. त्यांच्या दफनाची तयारी सुरू होती. पॉइंट ४८७५ नावाच्या शिखराचे टोक एखाद्या तीव्र कड्याप्रमाणे होते. तेथे कबर खोदणे अत्यंत कठीण होते. भारतीय सैनिकाने तेथे फक्त दोन फुटांचा खड्डा खोदला तर कुदळीचे टोकच तुटले. वीस वर्षांपूर्वी जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर दोन महिने चाललेल्या या युद्धात शेकडो पाकिस्तानी सैनिक मारले गेले. पाकिस्तानने त्यांची ओळख पटवण्यास नकार दिला होता, मात्र भारतीय लष्कर आपले तत्त्व विसरले नाही. युद्ध संपल्यानंतर जिथे जिथे पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह सापडले, भारतीय सैन्याने त्यांच्यावर इस्लामी रिवाजानुसार अंत्यविधी केले. लढाईच्या अखेरच्या टप्प्यात ज्या वेळी पाच पाकिस्तानी सैनिकांचा दफनविधी झाला तेथे मला चेतक हेलिकॉप्टरने जाण्याची संधी मिळाली. 


पाकिस्तानी सैनिकांच्या त्या समारंभपूर्वक अंत्यविधीच्या आठवणी आजही माझ्या मनात जिवंत आहेत. शत्रू सैनिकांच्या मृतदेहाला एखादे लष्कर एवढे सन्मानाने कसे काय हाताळते  हे पाहून मी थक्क झालो. भारतीय लष्करातील एका मुस्लिम सैनिकाने कुराणातील आयते वाचली आणि अल्लाह-हू-अकबरचा घोष केला. त्यानंतर तेथे उपस्थित हिंदू सैनिकांनी अत्यंत सन्मानपूर्वक  अल्लाह-हू-अकबर असे म्हटले. नंतर पाकिस्तानचा ध्वज मृतदेहावरून काढण्यात आला. मृतदेह जवळपास १० दिवसांपूर्वीचे होते. त्यांचे दफन करताना भारतीय सैन्याने छोट्या छोट्या मुस्लिम रिवाजांकडे लक्ष दिले. मृतदेहांचे डोके मक्केच्या दिशेने करून अत्यंत हळुवारपणे त्यांना कबरीमध्ये दफन केले. पॉइंट ४८७५ या शिखरावर जेथे हा विधी झाला तेथून पाक घुसखोरांनी अनेक दिवस गोळीबार केला होता. हे शिखर ताब्यात घेण्यासाठी कडवा संघर्ष झाला. येथे ५३ पाक सैनिक मारले होते. हे सैनिक पाकच्या १२ नॉर्दर्न लाइट इन्फंट्रीचे होते. मात्र पाकने त्यांना मुजाहिदीन घोषित केले आणि एकही मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. या युद्धात किती पाकिस्तानी सैनिक मारले गेले याची अधिकृत माहिती आजवर नाही. सर्व जगाने पाकिस्तानचा कांगावा ऐकला, ज्यात म्हटले होते की कारगिलमध्ये मुजाहिदीन होते. नंतर पाकचे तत्कालीन राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी  ‘इन द लाइन ऑफ फायर’ हे पुस्तक लिहिले होते. त्यात त्यानी कारगिलमध्ये पाक सैन्याने केलेल्या दु:साहसाची कबुली दिली होती. पाक लष्कराचे २७०० जवान यात मारले गेले, असे त्यांनी एका मुलाखतीत मान्यदेखील केले होते. हे खरे असेल तर ही संख्या १९७१ च्या युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांपेक्षा जास्त आहे. 
     (शब्दांकन : मुकेश कौशिक)