आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारगिल विजय दिवस: १९९९ मध्ये बंकर, आज तिथे सुसज्ज हॉटेल; वीस वर्षांतील कारगिलचा हा प्रवास हेही ‘ऑपरेशन विजय’च

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कारगिलमधून संजय आवटे
‘हॉटेल कारगिल’च्या प्रांगणातला जुना बंकर लक्ष वेधून घेतो. पाकिस्ताननं घुसखोरी केल्यानंतर घराघरात असे बंकर तयार झाले. शत्रूच्या माऱ्यापासून वाचण्याचा तेव्हा तेवढाच मार्ग होता. १९९९ मध्ये पाकिस्तानने हल्ला करून अनेक इमारती उद्ध्वस्त करून टाकल्या. स्थानिक लोक जिथं जीव मुठीत धरीन जगत होते, तिथं आता देश - विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येऊ लागले आहेत. 


राखेतून उडालेल्या फिनिक्सप्रमाणे कारगिलने वाटचाल केली आहे. पाकिस्तानने १९९९ मध्ये केलेली घुसखोरी भारतीय सैन्याच्या लक्षात येईपर्यंत द्रास, बटालिक, कारगिलपर्यंत पाक सैन्य घुसले होते. पाकिस्तानने केलेल्या बॉम्बवर्षावात अनेक घरं उद्ध्वस्त झाली. सैनिकांप्रमाणेच सर्वसामान्य माणसं जिवाला मुकली. वीस वर्षं झाली तरी त्या जखमा आजही ओल्या आहेत. सगळं होत्याचं नव्हतं झालं, पण डोंगररांगा चढून जाणारी, बर्फ अंगावर घेणारी ही माणसं पराभूत झाली नाहीत. ‘लडाख अॅटॉनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल’ फक्त लेह जिल्ह्यात होते. पण, लोकांच्या रेट्यामुळे कारगिलमध्ये ते २००३ मध्ये अस्तित्वात आले. त्यानंतर या प्रक्रियेला आणखी गती मिळाली. आकाराने मोठे असले तरी कारगिलची लोकसंख्या आहे अवघी दीड लाख. हिमालयाच्या कुशीत, पहाडांनी व्यापलेल्या, समुद्रसपाटीपासून आठ हजार ते २३ हजार एवढ्या उंचीवर असलेल्या कारगिलवर निसर्गाने सौंदर्याची उधळण केली आहे. सुरू व्हॅलीचं हे देखणेपण १९९९ च्या युद्धानं हरवलं होतं. पण, आज चित्र बदललं आहे. १९९९ मध्ये जिथं कशीबशी तीन हॉटेल्स होती, तिथं आज सुसज्ज अशी चाळीस हॉटेल्स आहेत. शिवाय, अनेक घरांमध्येही पर्यटक उतरण्याची व्यवस्था आहे. शिवाय गेस्ट हाउसेस आहेत. कारगिलची जेवढी लोकसंख्या आहे, तेवढेच पर्यटक तिथे आता दरवर्षी येत असतात. कारगिलमध्ये पाक फौजांनी ज्या परिसरात स्फोट घडवले होते, तिथं आता ‘कारगिल हाइट्स ’ नावाचं तारांकित हॉटेल उभं राहिलं आहे. 


खळाळत्या सुरू नदीचं सौंदर्य डोळ्यांत साठवण्यासाठी, ‘जोझिला पास’चा थरार अनुभवण्यासाठी, ‘नुन कून’ शिखराची उत्तुंगता पाहण्यासाठी, हिमनदी जवळून दिसावी म्हणून, बमियानच्या मूर्तींएवढा प्राचीन बुद्ध कारगिलमध्येच भेटू शकतो, त्यामुळे पर्यटक इथे येतात आणि रमतात. द्रास हे जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात थंड गाव. तिथंही आता ‘डी- मेडोज्’ यासारखं सुंदर हॉटेल उभं राहिलं आहे. पर्यटन व्यवसायानं कारगिलमधल्या तरुणाईला रोजगार दिला आहे. ‘कारगिल टुरिझम फेस्टिव्हल’ नुकताच झाला, त्याला जोरकस प्रतिसाद मिळाला. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी या कार्यक्रमात कारगिलच्या ‘स्पिरिट’चं कौतुक केलं हे खरं, पण राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचं निरीक्षण इथले पत्रकार नोंदवतात. मात्र, जनरेटा असा आहे की चित्र बदलत चालले आहे. उद्योजकता वाढू लागली आहे. अॅग्रो बेस्ड इंडस्ट्रीज उभी राहू लागली आहे. लष्करासाठी हा महत्त्वाचा तळ असल्याने लष्कराशी संबंधित कामांमधून २५ टक्के तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. दीड लाख लोकसंख्येच्या कारगिलमध्ये आज पाच महाविद्यालयं आहेत आणि गावागावात शाळा उभ्या राहिल्या आहेत. साक्षरतेचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त आहे. विशेषतः मुली मोठ्या संख्येनं शिकताहेत. कारगिलमधील मुजामिल अन्वर या तरुणाने अहमदाबादच्या आयआयएममधून एमबीए केलं. आता कारगिलमध्ये तशी अॅकॅडमी सुरू करण्याची त्याची इच्छा आहे. पुण्यातील ‘सरहद’ संस्थेच्या महाविद्यालयात कारगिलचे अनेक विद्यार्थी शिकत आहेत. गेल्या वीस वर्षांतील कारगिलचा हा प्रवास हेही ‘ऑपरेशन विजय’च आहे! 
 

 

कारगिलच्या प्रगतीचा ‘रस्ता’
पर्यटन वाढले की कारगिलचा विकास होईल. त्यासाठी रस्त्यांचे जाळे आणखी चांगले होणे आवश्यक आहे. गेल्या तीन वर्षांत पर्यटकांची संख्या पाच पटींनी वाढली आहे. पर्यटनाला ‘इंडस्ट्री’ म्हणून विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 
अश्रफ अली, अध्यक्ष, कारगिल ट्रॅव्हल्स ट्रेड असोसिएशन

 

अर्थव्यवस्था झपाट्याने झेपावतेय
कारगिलची अर्थव्यवस्था झपाट्याने झेपावत आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर गेल्या पाच वर्षांत पाच पटींनी वाढला. बलिदान करणारी ही भूमी आहे. देशाची मान उंच होईल, असा आर्थिक विकास  करण्याचा प्रयत्न आहे. 
काचो फिरोज अहमद खान चेअरमन, ‘लडाख अॅटॉनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल’
 

 

बातम्या आणखी आहेत...