आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बागल गटाची ८ जागा जिंकत मुसंडी, मात्र स्थिती त्रिशंकू; सत्ताधारी जगताप-पाटील गटाला धक्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाळा- येथील बाजार समितीच्या निवडणुकीत १५ पैकी आठ जागा मिळवून रश्मी बागल गटाने जोरदार मुसंडी मारली तर सत्ताधारी माजी आमदार जयवंतराव जगताप - आमदार नारायण पाटील गटाला सहा, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे गटाला एक जागा मिळाली. संचालक मंडळाच्या १८ पैकी व्यापारी गटातील दोन, हमाल गटातील एक अशा तीन जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या. त्यापैकी दोन जगताप - पाटील गटाने तर एक हमाल पंचायतीने जिंकली होती. आता बागल आणि जगताप - पाटील गटाचे समसमान बलाबल झाल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असून, शिंदे गटाचे महत्त्व वाढले आहे. तसेच जगताप हे दोन जागांवर निवडून आल्याने त्यांना एका जागी राजीनामा द्यावा लागणार असल्याने काही काळासाठी एक जागा घटणार आहे. 


बाजार समितीच्या निवडणुकीत रश्मी बागल यांच्या नेतृत्वाखाली बागल गटाने जगताप - पाटील आणि शिंदे गटाशी एकाकी झुंज दिली. शिंदे गटाने जगताप गटाशी तडजोड करत जातेगाव, वांगी येथे उमेदवार उभे केले नव्हते. त्यामुळे वांगी गटात जगताप यांचा विजय सहज शक्य झाला. मात्र, जातेगाव गटात शिंदे गटाचे सुजित बागल यांचा बागल गटाच्या संतोष वारे यांनी पराभव केला. यावरून या तडजोडीचा शिंदे गटाला लाभ झाला नाही. मतदारांनी बागल गटाला झुकते माप दिल्याचे दिसून आले. एकाकी झुंज आणि चांगले उमेदवार याच्या बळावर बागल गटाने पोथरे, जातेगाव, सावडी, राजुरी, हिसरे, कंदर येथे विजय मिळवला. तर जगताप-पाटील गटाला जिंती, उमरड, झरे, साडे, केम, वांगी येथील उमेदवार निवडून आणण्यात यश आले. वाशिंबे येथून शिंदे गटाचे एकमेव चंद्रकांत सरडे हे विजयी झाले. सत्ता स्थापनेत हमाल मतदारसंघातील वालचंद रोडगे व शिंदे गटाचे चंद्रकांत सरडे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार अाहे. 


पुत्राच्या पराभवाने जगताप गटाला धक्का 
पोथरे गटातील मतपेट्या जसजशा उघडल्या तसतशी उत्सुकता वाढत होती. सुरुवातीला दिग्विजय बागल तिसऱ्या क्रमांकावर तर शंभूराजे जगताप दुसऱ्या क्रमांकावर होते. तिसऱ्या फेरीपर्यंत सुनील सावंत आघाडीवर होते. पण नंतर बागल यांनी १६८७ मतांची मुसंडी घेत त्यांना मागे टाकत विजय मिळवला. सावंत दुसऱ्या स्थानी राहिले. मात्र, जगताप यांचे सुपुत्र शंभूराजे जगताप १२२५ मते घेऊन तिसऱ्या स्थानी फेकले गेल्याने जगताप गटाला मोठा धक्का बसला. सावंत यांनी १३८२ मते मिळवून दोन आमदार पुत्रांच्या विरोधात त्यांनी लक्षणीय कामगिरी केली. 

 

बातम्या आणखी आहेत...