आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूनंतरही वैर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूरच्या पूर्वीच्या पत्रकारितेत ‘कर्मयोगी’ साप्ताहिकाचे नाव मोठे होते. माझे वडील चक्रपाणी मनोहर काकडे ते साप्ताहिक चालवत असत. कर्मयोगीचे (कै.) रामभाऊ राजवाडे यांची परखड भूमिका त्यांनी ठामपणे पुढे चालवली. कर्मयोगी साप्ताहिक कोणाशीही बांधील नव्हते. ते सडेतोड होते. परिणामी समाजात हितचिंतकापेक्षा हितशत्रूच जास्त होते. मात्र, वडिलांनी आपल्या बेडर स्वभावामुळे हितशत्रूंवर मात केली होती. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ते जातपात मानत नव्हते. त्यांचे मूळ गाव टेंभुर्णी. काही कारणामुळे त्यांना पुन्हा गावात यावे लागले. अन्यायाला विरोध करणारा, गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा माणूस गावात आल्यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा उठला. तेव्हा वडिलांची बदनामी करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या दिंडी दरवाजावर विरोधकांनी बदनामीकारक मजकूर लिहिला. दिंडी दरवाजा प्रसिद्ध असल्याने मजकूर वाचायला हितशत्रूंनी त्या काळीही मोठी गर्दी केली होती. याशिवाय गावभर चर्चेने ही बदनामी प्रत्येकाच्या कानी पोहोचली. वडिलांनी बेडरपणे हा अपमान पचवला तरी आमच्या साºया कुटुंबासाठी तो एक अतिशय क्लेशकारक अनुभव होता. एकदा वडील सोलापूरला असताना अक्कांचे निधन झाले. आम्ही सारे लहान भावंडे, आई तर घाबरलेली. अक्कांचे अंत्यसंस्कार करायचे कोणी? हितशत्रंूनी पाठ फिरवली. कोणाला तरी दया आली. त्यांनी माझ्या हातात दोन रुपयांची तांबडी नोट सरकवली आणि सोलापूरहून वडिलांना घेऊन ये, असे सांगितले. मी मालट्रकने सोलापूरला आलो. इकडे वडिलांविरोधातील राग व्यक्त करत अक्कांचा मृतदेह अखेर स्मशानात आणला. दरम्यान, घरी मी वडिलांना घेऊन आल्यावर हा प्रकार समजला. जिवंत माणसे मृताशीही कसे वैर धरतात हे पाहिले. पत्रकाराचे परखड लेखन समाजाच्या पचनी पडत नाही. लोकांना पचेल, रुचेल असे लिहावे लागते. सडेतोड पत्रकारितेचे व्रत अंगीकारलेल्या कसा मनस्ताप सहन करावा लागतो, हे आम्ही फार अनुभवले.