politics / लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात मोठे वाद, कर्नाटक काँग्रेस समिती बरखास्त, नेत्यांच्या वादाचा बसला फटका

कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती बरखास्त करण्याचा निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीने घेतला

वृत्तसंस्था

Jun 20,2019 10:51:00 AM IST

नवी दिल्ली - कर्नाटक काँग्रेसमधील वादविवादामुळे तेथील प्रदेश काँग्रेसची समिती बुधवारी बरखास्त करण्यात आली. मात्र, प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्ष हे दोघेही आपापल्या पदांवर कायम राहतील. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस (संघटना) के. सी. वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती बरखास्त करण्याचा निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीने घेतला आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्ष पदांवर कायम राहतील.


लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर कर्नाटक प्रदेश काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद उसळून आले होते. राज्यात काँग्रेस आणि जेडीएस या दोन पक्षांचे आघाडीचे सरकार आहे. या सरकारच्या समन्वयातही अनेक समस्या आहेत. आघाडी सरकारच्या कामकाजावरूनही कर्नाटक काॅँग्रेसमध्ये अनेक वेळा मतभेदाचे सूर दिसून आले आहेत. त्यामुळेच अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीने ही कारवाई केली असल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसचे राज्यातील एक ज्येष्ठ नेते रोशन बेग यांनी राज्यातील नेतृत्वावर कडक टीका केली होती. त्यांनी सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनाही ‘विदूषक’ असे संबोधले होते. त्यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावरही टीका केली होती.

X
COMMENT