Karnatak Politics / मुंबईत कर‘नाटकी’ राजकारण : आमदारांच्या मनधरणीसाठी आलेले कर्नाटकचे मंत्री पोलिसांच्या ताब्यात

काँग्रेस नेते मिलिंद देवरा, नसीम खान यांच्यावरही कारवाई

विशेष प्रतिनिधी

Jul 11,2019 09:17:00 AM IST

मुंबई - कर्नाटकातील काँग्रेस व जेडीएसच्या बंडखोर आमदारांच्या मुंबईतील वास्तव्यात बुधवारी हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. बंडखोरांच्या मनधरणीसाठी बंगळुरूहून आलेल्या कर्नाटक सरकारमधील मंत्री डीके शिवकुमारांना भेटण्यास आमदारांनी नकार दिला. तर, शिवकुमार यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन संध्याकाळी माघारी पाठवले. या संपूर्ण परिस्थितीमुळे हॉटेलसमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले.


राजीनामा देऊन काँग्रेस व जेडीएसचे आमदार काही दिवसांपूर्वी मुंबईत आले होते. बीकेसी येथील हॉटेलमध्ये मुक्कामास असलेल्या या आमदारांपर्यंत काँग्रेस नेते पोहोचू नयेत, यासाठी त्यांना गोव्याला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मंगळवारी रात्री ते गोव्याला रवाना झाले. परंतु, त्यांना पुण्याहून परत मुंबईत आणून पवईतील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. या आमदारांची मनधरणी करण्यासाठी डीके शिवकुमार बुधवारी सकाळी मुंबईला दाखल झाले. बंडखोर थांबलेल्या हॉटेलमध्येच त्यांच्यासाठी रूमही बुक करण्यात आली होती. परंतु, जीवितास धोका असल्याने शिवकुमार यांना हॉटेलमध्ये येण्यास बंदी घालावी, अशी मागणी बंडखोर आमदारांनी हॉटेल प्रशासन आणि पोलिसांना पत्र लिहून केली होती. त्यानुसार हॉटेल प्रशासनाने शिवकुमार यांची आरक्षित केलेली रूम रद्द केली आणि पोलिसांनीही १२ जुलैपर्यंत संचारबंदी लागू केली.

काँग्रेस नेते मिलिंद देवरा, नसीम खान यांच्यावरही कारवाई

शिवकुमार यांना बंडखोर आमदारांची भेट घेण्यापासून रोखण्यात आले. परंतु, आपण दहशतवादी नाही, तर फक्त नागरिक आहोत, त्यामुळे हॉटेलमध्ये थांबायला अडवले जाऊ नये. या प्रकरणात मोठे गौडबंगाल असल्याचा आरोप शिवकुमार यांनी केला. त्याच वेळेस तेथे माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा व नसीम खान आले. हॉटेलबाहेर कार्यकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले आणि कलिना गेस्ट हाऊस येथे नेले.

डीके शिवकुमारांना बळजबरी नेले विमानतळावर
संध्याकाळी पोलिसांनी सर्व नेत्यांना कलिना गेस्ट हाऊसमधून काढले. शिवकुमार यांना बंगळुरूला पाठवण्याची तयारी केली. परंतु, शिवकुमार अडून होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना बळजबरीनेच विमानतळावर पोहोचवले. अशोक चव्हाण व देवरांनी या संपूर्ण प्रकरणाचा निषेध केला.

X
COMMENT