आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकमधील पोटनिवडणुकीची मतमोजणी आज; येदियुरप्पा सरकारचे भवितव्य ठरणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू : कर्नाटकमधील १५ विधानसभा मतदारसंघांत झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सोमवारी होत आहे. या मतदारसंघांतील निकालांतूनच चार महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या येदियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचे भवितव्य ठरणार आहे.

राज्यातील १५ विधानसभा मतदारसंघांत ५ डिसेंबरला पोटनिवडणूक झाली होती. तेथे ६७.९१ टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघांतील मतमोजणी ११ केंद्रांवर सकाळी ८ वाजता सुरू होईल आणि दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येतील अशी अपेक्षा निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

काँग्रेस आणि जेडीएसच्या १७ आमदारांना अपात्र ठरवण्यात आल्यामुळे रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी ही पोटनिवडणूक घ्यावी लागली. या आमदारांनी बंड केल्यामुळे एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार गेल्या जुलै महिन्यात कोसळले होते. त्यानंतर भाजपचे सरकार येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. या १५ मतदारसंघांपैकी १२ मतदारसंघ काँग्रेसकडे, तर ३ मतदारसंघ जेडीएसकडे होते. या पोटनिवडणुकीच्या निकालांवर भाजप सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. भाजप सरकारला बहुमतासाठी किमान सहा जागा जिंकणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी गेल्या २९ जुलैला विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. त्या वेळी १७ आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे आणि त्यांना अपात्र ठरवण्यात आल्याने २२५ सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी १०५ आमदारांची गरज होती. भाजपकडे सध्या तेवढेच सदस्य आहेत. विधानसभेत सध्या दोन जागा रिक्त आहेत. उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्यामुळे तेथे पोटनिवडणूक झाली नाही. सध्या भाजपकडे एका अपक्षासह १०५ एवढे संख्याबळ आहे, तर काँग्रेसचे ६६ आणि जेडीएसचे ३४ आमदार आहेत. त्याशिवाय बसपाकडे एक आमदार, एक नियुक्त आमदार आणि विधानसभा अध्यक्ष यांचा सदस्यांत समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, सर्व मतमोजणी केंद्रांवर कडक पोलिस बंदोबस्तासह सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

स्थानिक वृत्तवाहिन्या आणि विविध संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपला या पोटनिवडणुकीत १५ पैकी ९ ते १२ जागा मिळण्याची शक्यता असून त्यामुळे भाजपकडे स्पष्ट बहुमत होईल. आमचे सरकार कालावधी पूर्ण करेल, अशा विश्वास सत्ताधारी भाजपचे नेते व्यक्त करत आहेत. मतमोजणीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री येदियुरप्पा म्हणाले की, 'आमचा पक्ष किमान १३ जागा जिंकेल. आमचे सरकार आपला कालावधी पूर्ण करेल. लोकांचीही आमच्याकडून तीच अपेक्षा आहे.' स्थैर्य आणि विकास यासाठी लोकांनी आमच्या बाजूने मतदान केले असेल, असा विश्वास भाजपचे नेते व्यक्त करत आहेत, तर काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनाही निकाल आपल्या बाजूने लागेल, असा विश्वास आहे. ज्या बंडखोरांना अपात्र ठरवण्यात आले होते आणि जे सध्या सत्ताधारी भाजपचे उमेदवार आहेत त्यांना मतदार नाकारतील, असे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना वाटते.

भाजपने अपात्र ठरवलेल्या १६ आमदारांपैकी १३ जणांना तिकीट दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पोटनिवडणूक लढवण्याची परवानगी दिल्यानंतर या १३ जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि जेडीएसच्या उमेदवारीवर हे उमेदवार जेथून निवडून आले होते त्याच मतदारसंघांतून भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे. बहुतांश मतदारसंघांत भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होत आहे.

भाजपला बहुमत न मिळाल्यास पुन्हा राजकीय नाट्याची शक्यता

बहुमत कायम ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या जागा जिंकण्यात सत्ताधारी भाजपला अपयश आल्यास राज्यात पुन्हा एकदा राजकीय नाट्य पाहायला मिळेल, अशी शक्यता आहे. कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर आघाडीतून बाहेर पडलेले काँग्रेस आणि जेडीएस हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील आणि पुन्हा सरकार स्थापन करतील, असे दिसत आहे. मात्र, पोटनिवडणुकीच्या आधी अशा शक्यतेबद्दल दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. पोटनिवडणुकीतील निकाल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांच्यासाठीही महत्त्वाचे आहेत. त्यांच्या एककल्ली कारभारामुळे तसेच पोटनिवडणुकीसाठी निवडलेल्या उमेदवारांवरूनही त्यांच्याविरोधात मोठा असंतोष आहे. कुमारस्वामी यांच्यासाठीही हे निकाल महत्त्वाचे ठरतील. जेडीएसचे काही आमदार पुन्हा फुटू शकतात अशी शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने आपल्या आमदारांना एकत्र ठेवण्याचे आव्हान कुमारस्वामी यांच्यासमोर आहे.
 

बातम्या आणखी आहेत...