आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घुंगरांच्या वेदना!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाकळी लोणार येथे यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या हरिभाऊ बडेसह शिवकन्या कचरे यांच्या तमाशातील कलावंतांवर गावातील गुंडांनी प्राणघातक हल्ला करत महिला कलाकारांचा विनयभंग केला. या हल्ल्यामध्ये बारा तमाशा कलावंत जखमी झाले. दुष्काळ, कर्जाचा विळखा, जागतिकीकरणाचा बसलेला फटका अशा दुर्दैवाच्या चक्रव्यूहात आधीच अडकलेल्या महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेवर आता अशा पद्धतीचे आणखी एक नवे संकट ओढवणार असेल तर या लोककलेचे जतन-संवर्धन होणार तरी कसे?

 

तमाशा कलेची सुरक्षितता ही चिंतनीय बाब झाली आहे. त्याची शासकीय पातळीवर दखल घेतली पाहिजे. तमाशाचा खेळ चालू झाल्यापासून ते पहाटे बंद  होईपर्यंत त्यास सरकारी बंदोबस्त देणे काळाची गरज आहे. आजच्या तरुण पिढीची मानसिकता बदलली आहे. ‘मारणे आणि मरणे’  ही संवेदना बोथट बनली आहे. यासाठी सरकारी कायद्याने तमाशा कलावंतांना सुरक्षितता दिली पाहिजे. 
 

 

ढोलकीची थाप… घुंगरांचा छनछनाट आणि टाळ्या-शिट्ट्यांचा कडकडाट …हा अस्सल गावरान नजराणा सध्या पाहायला मिळतोय गावच्या जत्रेत…परंतु टाळ्या-शिट्ट्यांच्या या आवाजात वेदनेचे, आक्रोशाचे हुंकार का ऐकू येत आहेत? ढोलकीवर कडकडणाऱ्या हातांवर हे जखमेचे व्रण कुठून आले...? घुंगरू बांधताना पायावर हे रक्ताचे डाग का दिसत आहेत...? बोर्डावर नाचणाऱ्या या लावण्यवतींचा मनमोहक चेहरा असा निस्तेज का दिसतोय...? 


कारण, तमाशा कलावंतांवर गावगुंडांकडून वाढत जाणारे हल्ले...!  एकवेळ हा तमाशा कलावंत गरिबीशी लढेल, कर्जाच्या विळख्यातून स्वत: सोडवण्याचा प्रयत्न करेल, कलेशी प्रामाणिक रााहण्यासाठी जिवाचे रान करेल... परंतु जर गावगुंडांच्या जमावाकडून थेट प्राणघातक हल्लेच होत असतील तर त्याला कसे रोखायचे? 


असा नव्हता तमाशा अन् आता हे काय आक्रीत घडलंय या तमाशावर...
चैत्र महिना पानाफुलांनी बहरतो, त्याच वेळी अनेक सण, उत्सवांची मानवी मनात पालवी फुटते. गावागावात गावबैठका होतात. देवदेवतांच्या यात्रा सुरू होतात. जत्रांचे नियोजन केले जाते. गावबैठकीत यात्रेला करमणुकीच्या कार्यक्रमच्या वेळी गावपुढाऱ्यांचे एकमत होते. गावाच्या यात्रेला पाहिजे ‘तमाशा’. तमाशाशिवाय यात्रा नाही... तमाशाशिवाय जल्लोष नाही. .. तमाशाशिवाय यात्रेचा आनंद नाही. खरं तर, गावयात्रेला तमाशा पाहिजे ही अनेक वर्षांपूर्वीची परंपरा, आजही आहे. परंतु ती पुढे टिकेल की, नाही यावर भाष्य करणे आजच्या परिस्थितीत अवघड आहे. पूर्वीचा तमाशा पारावर, चावडीवर, गावच्या माळरानावर होत असे. आता परिवर्तन झाले तसे तमाशा मालकांनी स्वतःचे रंगमंच उभे केले, वाहतुकीची साधने बदलली. पूर्वीच्या रंगमंचावरची रॉकेलची हिराळे जाऊन आता चित्रपटातील रोषणाईने रंगत वाढवली. तमाशाच्या स्टेजवर पूर्वी गावाचा पाटील, इनामदार फेटा उडवायचा, तमाशाला रंगत यायची. सवाल-जबाबाची स्पर्धा व्हायची. त्यातूनच पुराणातील घटनांची उकल व्हायची. गणापासून सुरू झालेला तमाशा भैरवीपर्यंत म्हणजे म्हणजे पहाटे ६ वाजेपर्यंत होई. तमाशा कलावंत मनोभावे तमाशा रसिकांची सेवा करायचा. त्या वेळी तमाशा कलेतील कलाकारांना ‘धन’ कमी होते, पण ‘मान’ जास्त होता.


आधुनिक तमाशाच्या परिवर्तनात फिरत्या रंगमंचाप्रमाणे तमाशा रसिकदेखील बदलला. तमाशातील पाटील तर गेला, पण पाटलाची वारसदार सांगणारी पिढी तयार झाली. तमाशा कलावंतांचे तमाशातील कलेचे नाते हे तात्त्विक स्वरूपाचे निर्माण झाले आहे. त्या कलेवरील निष्ठा कमी झाली. आजच्या तमाशा क्षेत्रातील कलेबद्दल ‘धन’ वाढले. पण तमाशा सृष्टीबद्दलचा ‘मान सन्मान’ कमी झाला. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे धन म्हणून आपण तमाशा कलेकडे पाहतो. तमाशाच्या माध्यमातून लोक मनोरंजनातून लोकप्रबोधन, लोकसंस्कृती, समाज परिवर्तन, लोकशिक्षण, लोकशाही, समता, समानता यासारखी राष्ट्रीय मूल्यांची शिकवण नकळत स्वरूपात मिळते. गावकारभारात  अनेक मतभेद होतात. पण गावच्या यात्रेसाठी तमाशा पाहिजे यावर संपूर्ण गावाचे एकमत होत असते. आजही एकाच व्यासपीठावर एकत्र येतात म्हणून तमाशा हे समतेचे साधन म्हणावे लागेल. तमाशाची सुरुवात गणाने होते.  ‘गण’ गणरायाची आराधना, प्रार्थना रात्री आठ-नऊला सुरू व्हायची. तमाशातील गण, गवळण, रंगबाजी, वगनाट्य असे टप्पे पार करत शेवटी भैरवी आळवायला लागायची. तेव्हा सकाळचं तांबड फुटणं बाकी असायचं.  “पददलित समाजाने महाराष्ट्राच्या माळरानावर पिढ्यान् पिढ्या उभा केलेला बहुरंग तमाशा म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन होते.” 
 तमाशातीत दोन गण, हळीच्या दोन गवळणी, कृष्णाची ओळख, कृष्ण गवळण असा तमाशाचा साज होता. त्यामुळे तमाशा सुरुवातीलाच रंगत होता. आजच्या तमाशा रसिकांची ती मानसिकता राहिली नाही. तमाशाच्या सुरुवातीला ज्या कलाकृती सादर केल्या जातात, त्याच्यात जास्त वेळ न दवडता तत्काळ फक्त चित्रपटातील प्रसिद्ध  गाणी, गीते, नृत्य सादर झाली पाहिजे याकडे कल असतो. ही पसंती फक्त रंगमंचाच्या समोर बसलेल्या रंगेल १०० ते २०० तरुणांची असते. गावातील सर्वसामान्यांची असतेच असे नाही. पण आता गावातील कार्यकर्ता तरुण आहे. तो जे सांगेल तेच झाले पाहिजे, तसे न झाल्यास ती पलटण तमाशा बंद पाडण्यापर्यंत मजल मारते. नाचणे, धिंगाणा घालणे, आवाज करणे, मारामारी करणे, दंगल घडवून आणणे असे प्रकार सध्याच्या तमाशात सर्रास वाढले आहेत. या सर्व  स्थितीला  तमाशा कलावंताना दररोज सामना करावा लागतो. 


महाराष्ट्राची ही लोककला टिकण्यासाठी फक्त तमाशा फडमालक अथवा तमाशा कलाकार यांचीच ही जबाबदारी नाही. तर त्यासाठी गावपुढारी, यात्रा कमिटी, गावातील सुज्ञ विचारांचे तरुण यांनी पुढाकार घेतला पाहिजे. वर्षातून गावाची यात्रा एक दिवसाची असते. त्यासाठी गाववाले लाखो रुपये खर्च करत असतात. वर्षभर गावकारभारी त्याचे नियोजन करत असतात. या सर्व त्यांच्या कष्टांवर विकृत विचारांचे तरुण पाणी पाडतात. यासाठी गाव पातळीवरती त्यांच्या बंदोबस्ताचा निश्चित विचार झाला पाहिजे. त्यांचा बंदोबस्त सुरुवातीला केला तरच तमाशा सुरळीत होऊ शकतो. जोपर्यंत गाव बैठकीत योग्य निर्णय घेतले जात नाहीत त्याशिवाय तमाशाला सुरक्षितता प्राप्त होणार नाही. 


तमाशा कलेची सुरक्षितता ही चिंतनीय बाब झाली आहे. त्याची शासकीय पातळीवर दखल घेतली पाहिजे. तमाशाचा खेळ चालू झाल्यापासून ते पहाटे बंद  होईपर्यंत त्यास सरकारी बंदोबस्त देणे काळाची गरज आहे. तमाशा कला काही वर्षांनंतर लोप पावेल, अशी आज परिस्थिती तमाशा क्षेत्रात दिसून येते आहे. आज एका तमाशा फडात जवळपास १०० लोकसंख्येचा संच  असतो. वाहतुकीची साधने सरासरी तीन ते आठ असतात. प्रत्येक तमाशा फडाचा दररोजचा खर्च जवळपास ४० ते ४५ हजार असतो. सरासरी कलाकारांचे पगार १५ हजारांपासून ते ३० हजारांपर्यंत  असतात. या सर्व गोष्टींमुळे आज तमाशा फड मालक मेटाकुटीला आला आहे. त्यातूनच दुष्काळ परिस्थती, निवडणुका, गावच्या पुढाऱ्यांचे मतभेद, तमाशाकडे पाहणाऱ्या तरुण तरुणांची सामाजिक स्थिती या सर्व कारणांनी तमाशा कला मोडकळीस आली आहे . 


तमाशासृष्टी एक वेळ आर्थिक संकट सहन करील. किंबहुना अशा आर्थिक संकटाची त्यांना सवयच आहे, मात्र तमाशावर होणारे हल्ले सहन करू शकणार नाही. तमाशातील कलाकारांचे जीवन सुरक्षित राहिले नाही. गावाच्या यात्रा कमिटीचा , गाव पुढाऱ्यांचा , गावकारभांऱ्याचा धाक कमी झाला आहे. त्यामुळे गावातील विकृत विचारांच्या गाव टुकारांपासून तमाशा कलावंताना बेधडक मारहाण होते, मानसिक छळ होतो, विनयभंग केला जातो. त्याचा परिणाम म्हणून तमाशाचा कलाकार तमाशाकडे पाठ फिरवत आहे. टाकळी लोणार येथे यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या हरिभाऊ बडेसह शिवकन्या कचरे यांच्या तमाशातील कलावंतांवर गावातील गुंडांनी प्राणघातक हल्ला करत महिला कलाकारांचा विनयभंग केला. या हल्ल्यामध्ये बारा तमाशा कलावंत जखमी झाले. या घटनेनंतर तमाशा कलावंत प्रचंड घाबरलेला आहे, दडपणाखाली आहे. 


‘तमाशा संस्कृतीला’ नवी चैत्राची पालवीही फुटेल. पण त्यासाठी तमाशा फडमालकांनी मानसिकता बदलली पाहिजे. महाराष्ट्रातील तमाशा फड मालक, तमाशा कलावंतांच्या  संघटनांनी संघटित झाले पाहिजे. त्यांनी एकीचे बळ दाखवले पाहिजे. या लोककलेच्या चळवळीतूनच तमाशा कला महामंडळाची निर्मिती होईल. त्यामुळे तमाशासृष्टीला आर्थिक पाठबळ मिळेल व महाराष्ट्राच्या तमाशा लोकसंस्कृतीचे संवर्धन होईल.

(लेखक नारायणगाव, जुन्नर येथील तमाशा अभ्यासक आहेत.)


काशिनाथ आल्हाट
divyamarathirasik@gmail.com

संपर्क - ८६०५५२६२२०

बातम्या आणखी आहेत...