आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर अंतर्गत विषय, पाकिस्तानने हिंसाचार भडकवू नये : राहुल गांधी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राकडे पाठवलेल्या पत्रात आपला नामोल्लेख आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी भानावर आले आहेत. राहुल यांनी बुधवारी त्यासंबंधी सारवासारव करणारे ट्विट केले. अनेक मुद्द्यांवर मी सरकारशी सहमत नाही. परंतु काश्मीर भारताचा अंतर्गत विषय आहे. त्यात पाकिस्तानसह इतर कोणत्याही देशाने हस्तक्षेप करण्याची गरज नाही. जम्मू-काश्मीरमधील हिंसाचार पाकिस्तानने भडकवल्यामुळे आहे. पाकिस्तानने या गोष्टी सोडून द्याव्यात. पाकिस्तानला जगभरात दहशतवादाचा पाठीराखा म्हणून आेळखले जाते, असे मत राहुल यांनी ट्विटमधून पोस्ट केले. 

संयुक्त राष्ट्राला काश्मीरच्या मुद्द्यावर पत्र पाठवण्यात आले आहे, अशी माहिती मानवी हक्क विभागाच्या मंत्री शिरीन मजारी यांनी मंगळवारी दिली होती. मजारी यांनी या पत्राची कॉपी ट्विटरवरून जारी केली होती. त्यात त्यांनी राहुल गांधी यांचाही हवाला दिला होता. 

जम्मू-काश्मिरात हिंसाचार सुरू आहे, असे राहुल गांधी म्हटल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यावर भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर टीका केली होती. राहुल यांनी पाकला संधी दिली. इम्रान खान संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा मुद्दा अतिशय चांगल्या पद्धतीने मांडतील, असे परराष्ट्रमंत्री मेहमूद कुरेशी यांनी म्हटले. 
 
 

लक्ष्य करण्यास राहुल यांनी दिली पाकला संधी : भाजप 
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, राहुल यांनी देशाचा अपमान केला. संयुक्त राष्ट्रात भारताला लक्ष्य करण्यासाठी पाकला संधी दिली. राहुलच्या वक्तव्याचा पाकिस्तानने वापर केला आहे. पाकच्या अर्जात राहुल यांच्या वक्तव्याचा उल्लेख आहे.
 

भाजपची राजकीय पातळी घसरत चाललीय : काँग्रेस 
काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले, जावडेकर यांचे मानसिक संतुलन ढळले आहे. भाजपची राजकीय पातळी घसरत चालली आहे. जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. पाकचे वक्तव्य लोकशाही मूल्यांवरील हल्ला असल्याचे शशी थरूर यांनी म्हटले आहे. 
 
 

संरक्षणमंत्री राजनाथ आज लडाखचा दौरा करतील 
संरक्षणमंत्री राजनाथसिंह गुरुवारी लेहचा दौरा करतील. सरकारने कलम ३७० रद्द केल्यानंतर संरक्षणमंत्री पहिल्यांदाच लडाखच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राजनाथ गुरुवारी स्थानिक लोक व लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा करणे अपेक्षित आहे. स्थानिक सैन्य अधिकारी चीन व पाकिस्तानच्या सीमेवरील सुरक्षा स्थितीबद्दलची राजनाथ यांना माहिती देतील. जूनमध्ये राजनाथ यांनी लडाखचा दौरा केला होता आणि सियाचीन युद्ध स्मारकावर श्रद्धांजली वाहिली होती. 
 

काश्मीर भारत व पाकचा द्विपक्षीय मुद्दा : रशिया
भारतात रशियाचे राजदूत निकोलाई कुदाशेव म्हणाले, काश्मीर भारताचा अंतर्गत विषय आहे. भारत व पाकिस्तानने चर्चेतून हा मुद्दा सोडवावा. कलम ३७० विषयी कुदाशेव म्हणाले, हा भारताचा अविभाज्य भाग आहे. दोन्ही देशांनी सर्व मुद्दे सिमला करार व लाहोर जाहीरनाम्यानुसार सोडवावे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या दोनदिवसीय रशियाच्या दौऱ्यानंतर रशियाकडून हे वक्तव्य जारी झाले आहे.