आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुळथाची जिलेबी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोडली एकदाची शाळा आणि नोंदवलं मातीच्या शाळेत नाव. पण मातीची शाळा मला फार महागात पडली. पाटीवर पाढे गिरवायचे सोडून मी धसकट जवळ केली होती. ते हातापायात खुपणारच! ढेकळाच्या जंजाळाने त्याचे फास पक्के जखडले होते. वावरानं तर पायखुटीच घातली होती मला. काट्याबोराट्यांनी पाय हुळहुळे करून सोडले. किती अवघडंय शेतीची शाळा. त्या शाळेची गोष्ट..  

 

सोडली एकदाची शाळा आणि नोंदवलं मातीच्या शाळेत नाव. पण मातीची शाळा मला फार महागात पडली. पाटीवर पाढे गिरवायचे सोडून मी धसकट जवळ केली होती. ते हातापायात खुपणारच! सावलीला बसून धडे वाचायचं सोडून मी उन्हात येऊन बसलो होतो. मग सूर्य माझी गय करणार होता का? त्याला थोडीच माझी कीव वाटणार होती? ढेकळाच्या जंजाळाने त्याचे फास पक्के जखडले होते, हरळी-काशा मला तोंडघशी पाडण्यासाठी सरसावल्या होत्या. पक्का चंगच बांधला होता त्यांनी! वावरानं तर पायखुटीच घातली होती मला. काट्याबोराट्यांनी पाय हुळहुळे करुन सोडले. किती अवघडयं शेतीची शाळा. त्या शाळेची गोष्ट..  


अर्ध्या वाट्यानं ज्या विठ्ठल तात्याला आमची जमीन लावलेली होती त्यांच्या ताब्यात मला आईनं दिलं. संध्याकाळचंच आई विठ्ठलतात्याच्या घरी घेऊन गेली. राधाकाकूनं चहा ठेवला. आवलाच्या चुलीवर कुळथाचे शेंगोळे शिजत होते. त्यास आम्ही कुळथाची जिलेबी म्हणायचो. मला फार आवडायची. राधाकाकू जेव्हा जेव्हा कुळथाची जिलेबी करायची तेव्हा खास माझ्यासाठी पाठवायची. राधाकाकू म्हणाली, 
“काय रे भावड्या, लई भारी कविता लिव्हतो म्हने तू!” 
“शाळातही चांगलाच हुशारय,” तात्या म्हणाले. 
“तात्या, त्याला शाळा न्हायी करायची!” 
“आता काय म्हणू तुला! काय रेऽ करायचं तुला मग? गावभर डुकरं वळनार का?”
आईने तात्याला डोळ्यानं खुणावलं. तात्या राधाईला म्हणाले,  “काय आयकायचं त्याचं? त्यो सांगेल आन्‌ आपन आयकायचं! आयीबायीनं एवढं उन्हात आयुष्य काढलं; हे दिवस पाहण्यासाठी का?  याचा बाप गेला संसार मोकलून. आईबाईचं घर उन्हात बांधलं.  अन्‌ याच्या डोक्यात असलं खूळ. माला न्हायी पटत बायी. शेती करायला शेती त पाह्यजे ना तेवढी!” राधाकाकूनं काठुटीत हात धुतले अन्‌ खरकटं पाणी फेकायला बाहेर गेली. मग तात्या म्हणाले, 
“म्हन्जे तुला शाळा शिकायचीच न्हायी?” 
“न्हायी!” 
“तुला शेतीच करायची... तुजा निर्णय पक्काय तर.” 
“हां!” 
“चालंल, उद्यापासून मळ्याकडं यायचं!” 


काही झालं तरी शाळा शिकायची नाही. आपली शेतीच करायची आन्‌ लोकांना दाखवून द्यायचं टेक्‍निकनं शेती कशी करता येते ते. मग सारेच तोंडात बोट घालतील. सारे लोक माझ्या शेतीची पाहणी करायला येतील. मळ्यात माल नेण्यासाठी ट्रक,टेम्पो, पिकअप असल्या गाड्याच गाड्या रांग लावून उभ्या राहतील, असं हिरवगार चित्र  माझ्या डोळ्यासमोर तरळू लागलं. आईच्या हाकेनं भानावर आलो. 
“भावड्या, चाल घरी. का इडंच ऱ्हातो?”
“पांडूची आयी, त्याला कुळथाची जिलबी दे बरं थोडी ताटलीत!” 
“न्हायी मिळायची. त्याला आवडते म्हनून केल्याव घरी नेवून द्यायचे, पन आता न्हायी!” 
राधाकाकूचा राग काही उतरला नव्हता. पहिल्यांदाच जिलेबी न खाता विठ्ठलतात्याच्या घरून चाललो होतो. जिलेबी काही डोळ्यासमोरून हलत नव्हती. जिलेबी करावी ती राधाकाकूनंच! अशी लालचुटूक शिजवायची! चवदार तर अशी, की मी बोटं चाटत बसायचो. माझ्या शेतीमालीच्या वेडानं पहिलीच खायची गोष्ट माझ्याकडून हिरावून घेतली. दुसरा दिवस उगवला तोच मी आता अट्टल शेतकरी झालो आहे या जाणिवेनं. आता मी विद्यार्थी राहिलो नव्हतो. तात्या बैलगाडी घेऊनच दाराशी उभे. 


“तात्या, म्या त तोंडही धुतलं न्हायी अन्‌ चहाही घेतला न्हयी. म्या येतो मागावून!”
“न्हयी रे, तोंडबिंड ऱ्हाव दे. लाइट जाईल. कडूळ  भरून घेऊ.” 
तसाच बसलो गाडीत जाऊन. तात्या माझ्या हातात बैलांचा कासरा देत म्हणाले, 
“धर कासरा.” 
“म्या त अजून बैलगाडी चालवली न्हयी.” 
“शेतकरी व्हायचं त असं म्हनून न्हायी चालत. सिकल्याशिवाय कसं येयील? त्यात काय अवघडय?” तात्या म्हणाले. त्यात काय अवघडय? पण खरंच सारंच अवघड होतं. तात्या मला रोज नवा धडा शिकवत होते. नांगरणी, वखरणी, पाळ्यावर पाळ्या औताच्या हाकून घेतल्या. नांगरणी करताना जमिनीचे भले भले ढेकळं बाहेर पडत होते, तसेच माझ्या मनाचे ढेकळंही तात्या मला दाखवू पाहत होते. वखराच्या पाळ्या हाकून हाकून ढेकळं फोडून माती भुसभुशीत करावी, तशी माझ्या मनातले ढेकळंही इरघळून काढले. काश्या धस्कटाचं गचपण वेचून बांधावर टाकावं, तसं माझ्या डोक्यातलं गचपणही काढून टाकलं. शेतीची मशागत पुरी होता होता मला जाणीव झाली, की आपण शाळेचीच सुगी पास होऊ शकतो. आता मला शाळेतलं गणित सोपं वाटायला लागलं होतं. पण मी हरलोय, हे तात्याला अन्‌ आईलाही म्हणता येत नव्हतं. कसं म्हणणार? आपणच स्वतःहून शेतीचं दावं आपल्या गळ्यात बांधून घेतलं होतं. ते सोडायचं कसं? शेतीमातीच्या शाळेचा गृहपाठ पक्का व्हायच्या ऐवजी मी आणखीनच बेंबळा होत गेलो. रडकुंडीला आलो. मला वाटायचं वावरही माझी चेष्टा करतंय. ढेकळं, धसकटं तर माझ्याकडे बोट दाखवून खदाखदा हसताहेत

 
राधाकाकूचा राग मला इतक्या दिवस कळला नव्हता, पण तो आता उमगला होता. मात्र स्वतःच्याच हातानं पायावर मी कुऱ्हाड मारून घेतली होती. तिची वेदना मला मुकाटी सहन करायची होती. जेव्हा मी शाळा सोडली तेव्हा आई म्हणाली होती, “मातीची शाळा आज ना उद्या वास्तव शिकवील तुला!” हे वाक्य पुन्हा पुन्हा डोक्यात टकरा देवू लागलं. खरंच आई, मला वास्तव कळलंय. पण तुला कोणत्या तोंडानं सांगू, की मला शिकायचीय शाळा. नको मला मातीची ही शाळा. मातीच्या शाळेतही पास होणारे विद्यार्थी आहेत, पण मी मात्र या शाळेतला ढ विद्यार्थी आहे. आयुष्यभर एकाच वर्गात मी पडून राहील. पास तर काही होणार नाही. या शाळेत पास होणारी तूच हुशार चुणचुणीत विद्यार्थिनी आहेस! आता आपण जन्मभर मातीच उपसायची. आपलीही माती होऊन जाणार. या विचाराने झोप लागत नव्हती. कविताही लिहावीशी वाटत नव्हती. सगळंच रितं रितं वाटायला लागलं. आपला जन्मच वाया जाणार. आठवीच्या वर्गाची परीक्षा महिनाभरावर राहिली होती. विठ्ठलतात्यानं ठरवलं तर मी परीक्षेला बसू शकतो, कारण आठवीच्या वर्गाचे क्लासटीचर मणियार सर तात्याचे मित्र होते. दुपारचं तात्या न्‌ मी चाऱ्याची वळई लावत होतो. तात्याला म्हणायची हिंमत होत नव्हती. त्याशिवाय फास मोकळा होणार नव्हता. सगळंच बळ एकवटून म्हणालोच तात्याला, 


“तात्या, माला शाळेत न्हायी जाता येनार का?” 
“शाळा कश्याला? शेतीच बरी. शाळा न्‌ कुणाचं भलं जालं त तुह्यं व्हनारय!” 
मी रडकुंडीला आलो. 
“तात्या, मणियार सर त तुम्च्ये चांग्ले दोस्तय. माज्यासाठी सांगून पहाल नं?” 
“न्हायी गड्या! त्यायचे बोलने कोन खायील?”
माझा इलाजच खुंटला. मी रडायला लागलो. तात्यानं हातातली पेंढी खाली टाकली. मला गोंजारलं. 
“अरं मर्दासारखा मर्द आन्‌ असा रडायला लागला? पुस डोळे.”
“मला शाळेत जायचंय!” रडता रडता म्हणालो. 
“अरे, तुजी परीक्षा फी पंदरा रुपये, मागल्या आठवड्यातच भरली. मणियार सरायला सांगून बी ठिवलंय. फक्त तुज्या म्हणण्याची वाट पाहत होतो! उद्या दप्तर उचलायचं अन्‌ शाळेत जायचं. मातीच्या शाळेची काळजी घ्यायला आमी आहोतच.”


मी तात्याला मिठी मारली. माझी शाळा परत सुरू केल्याबद्दल. रातच्याला राधाकाकू पदराखाली डबा झाकून घेऊन आली. आम्ही जेवायला बसलो होतो. राधाकाकूनं कुळथाची जिलेबी माझ्या ताटात ओतली. 
“तू साळंत जानार म्हणून लई आनंद जाला! म्हनून माज्या लेकरासाठी खास केली!”  राधाकाकूची कुळथाची जिलेबी आधीच्यापेक्षा जास्तच चवदार लागली. उद्यापासून शाळेत जाणाऱ्या एका विद्यार्थानं एकट्यानच फस्त केली...


 लेखकाचा संपर्क : ८८३००३८३६३

बातम्या आणखी आहेत...