आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रियांचे धार्मिक, आध्यात्मिक अधिकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाळी सुरू असल्याचा आनंद व्यक्त करणं आता एकविसाव्या शतकात प्रागतिक मानलं जातं असलं तरी चक्रधरस्वामींनी काही शतकांपूर्वी पाळीतला अस्पृश्यतेचा संदर्भ काढून टाकला होता. 
भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख.

 

स्त्रियांचं धार्मिक स्थान हा आपल्याकडे बराचसा दुर्लक्षित राहिलेला मुद्दा आहे. मुळात स्त्रियांच्या प्रश्नांचा विचार करताना बाकीचे प्रश्न इतके अवाढव्य होऊन बसतात की, त्या तुलनेत त्यांचे धार्मिक, आध्यात्मिक प्रश्न क्षुल्लक वाटू लागतात. तथापि शिक्षणाच्या हक्कांचा विचार करताना ‘धर्माचा अभ्यास / विचार’ हा मुद्दा डोकावलाच; त्यामुळे शिक्षणापाठोपाठ याही विषयाचा थोडक्यात आढावा घेऊ. स्त्रियांच्या धार्मिक स्थानाचा विचार करताना सहसा संकुचित मुद्दे समोर येतात. उदाहरणार्थ, स्त्रिया एखादे कर्मकांड करू शकतात की नाही? त्यांना एखाद्या धार्मिक विधीत सहभागी होण्याचा किंवा एखादा धार्मिक विधी पुरुषाखेरीज (अधिक स्पष्ट सांगायचे तर पतीविना) करण्याचा अधिकार आहे की नाही? विविध धार्मिक स्थळी त्यांना सहज प्रवेश मिळतो की नाही? वगैरे प्रश्न तात्कालिक निमित्तांनी विचारात घेतले जातात. काही धार्मिक स्थळी प्रवेश बंदी, काही विधी - कर्मकांडे यांचे अधिकार नसणे ही ‘अडचण’ झाली; फार तर हा धार्मिक मार्गातला अडथळा आहे, असंही म्हणता येईल. पण हे सगळं वरवरचं आहे, मूळ प्रश्न अधिक गंभीर व निराळा आहे. पापपुण्याच्या कल्पनांचा जाच स्त्रियांना दीर्घकाळ सोसावा लागलेला आहे. मासिक पाळी / विटाळ याबाबतचं अज्ञान आणि या विषयीच्या भ्रामक कल्पनांनी स्त्रियांना अस्पृश्य ठरवलं आणि एका अर्थाने जननचक्राचा अपमानच केला. 


याला अपवाद ठरले ते फक्त चक्रधर. त्यांनी इतक्या जुन्या काळातही स्त्रियांच्या मासिक धर्माला चिकटलेला अस्पृश्यतेचा संदर्भ काढून फेकला आणि संन्यास घेण्याचा अधिकार पुरुषांच्या सारखाच स्त्रियांनादेखील आहे, हे स्पष्टपणे सांगितलं. ते स्वत: जातीपाती मानत नसले तरी त्यांच्या शिष्यांमध्ये ब्राह्मण जास्त संख्येने होते; त्यामुळे स्त्रियांना असा समान अधिकार देण्याच्या निर्णयाने असंख्य भल्याबुऱ्या प्रतिक्रिया उमटल्या. हे धाडस पुरुषांना आणि स्त्रियांनादेखील पेलवणारं नव्हतं; मात्र चक्रधर आपल्या मतांवर ठाम राहिल्याने स्त्रियांसाठी अनुकूल ठरणारे बदल घडत गेले. “मासिक धर्माचा विटाळ मानण्याचे कारण नाही,” हा मुद्दा उमाइसाला पटवून देताना आधी ते तिची खूप थट्टा करतात आणि मग तिला समजावून सांगतात की, “बाइ : नवा नाडीमध्ये हे एकि नाडी : ... यें नवद्वारें : जैसी नाकी सेंबूड ए : डोळेया चीपूड : काना मळ : तोंडा थुंका ए : गुहिद्वार मळ एति : ऐसी हे एकि धातु स्रवे : मग नीवर्ते याचा वीटाळु धरूं न ए :” जर नाकातल्या शेंबडाचा, तोंडातल्या थुंकीचा, डोळ्यातल्या चिपडाचा वगैरे विटाळ होत नाही, तर मासिक पाळीचा विटाळ कसा काय होऊ शकतो? हे सर्व ‘मळ’ एकसारखेच नाहीत का? ही वस्तुनिष्ठ चिकित्सा पाहिली की, आजही चकित व्हायला होतं. चक्रधरांच्या पाठोपाठ आठवते ती ‘देहासि विटाळ म्हणति सकळ’ हे गाणारी सोयराबाई. सोयराबाई थेट लिहितात...


देहासी विटाळ म्हणती सकळ । आत्मा तो निर्मळ शुद्धबुद्ध॥१॥
देहिंचा विटाळ देहीच जन्मला । सोवळा तो झाला कवण धर्म ॥२॥
विटाळावाअंचोनी उत्पत्तीचे स्थान । कोण देह निर्माण नाही जगीं ॥३॥
म्हणुनी पांडुरंगा वानितसे थोरी । विटाळ देहांतरी वसतसे ॥४॥
देहाचा विटाळ देहींच निर्धारी । म्हणतसे महारी चोखियाची ॥५॥
धार्मिक विधींच्या बाबत स्त्रियांच्या अधिकारांचा विचार आपण आधीच्या काही लेखांमधून केलेला आहे. त्यामुळे या लेखात पुनरावृत्ती टाळत तीर्थयात्रा आणि संन्यास या दोन मुद्द्यांचा विचार करू.
तीर्थयात्रा करण्याचा अधिकार सर्व वर्णांच्या आणि आश्रमांतील पुरुषांनाच असतो, असे नसून स्त्रियांनादेखील असतो, असे वनपर्वात (८२.३३-३४) म्हटले आहे. पवित्र तीर्थांची यात्रा करणे हे कृत्य स्त्रिया आणि शूद्र यांच्या बाबतीत पातकयुक्त असल्याचे स्मृतिग्रंथात (तीर्थ प्र. पा. २१) सांगितले आहे परंतु ते वचन स्त्रियांच्या बाबतीत त्या पतीच्या संमतीशिवाय गेल्यास लागते.
जपस्तपस्तीर्थयात्रा प्रव्रज्या मन्त्रसाधनम्।
देवताराधनं चेति स्त्रीशूद्रपतनानि षट्।। 
तीर्थप्रकाश (पा. २१)
हिंदू स्त्रीला तिच्या पतीच्या मिळकतीवर जरी मर्यादित अधिकार असतो तरी तिला आपल्या पतीच्या पारलौकिक हिताकरिता श्राद्ध करण्याकरिता गयेची अथवा पंढरपूरची यात्रा करण्याला लागणाऱ्या खर्चाकरिता आपल्या पतीच्या मिळकतीचा लहानसा भाग विकण्याचा हक्क असतो, असे निर्णय न्यायालयांनी दिले आहेत. (गणपत वि. तुळशीराम, ३६ मुंबई ८८).
(धर्मशास्त्राचा इतिहास; उत्तरार्ध; पृ. १२१.१२२)
प्राचीन काळात काही तुरळक प्रसंगी स्त्रियांनादेखील संन्यस्तवृत्तीचा अंगीकार करता येत असे. तथापि स्त्रियांनी घरादाराचा त्याग करणे अथवा संन्यस्तवृत्ती स्वीकारणे या गोष्टीच्या विरुद्ध हिंदू धर्माचा सर्वसाधारण कल आहे, असे म्हणावे लागते.
स्मृतिचंद्रिकेत यमाच्या एका वचनात असं म्हटलं आहे की, 
स्त्रियाः श्रुतौ वा शास्त्रे वा प्रव्रज्या न विधीयते।
प्रजा हि तस्याः स्वो धर्मः सवर्णादिति धारणा।।
(स्मृतिचंद्रिका व्यवहार पा. २५४).
याचा अर्थ असा होतो की, वेदांनी अथवा धर्मशास्त्रांनी स्त्रियांना प्रवृज्या स्वीकारणे म्हणजे संन्यास घेणे हे विहित / योग्य नसल्याचे सांगितले असून स्वतःच्या समान वर्णाच्या पुरुषापासून प्रजेची उत्पत्ती करणे आणि संगोपन करणे हाच स्त्रियांचा विहित धर्म आहे आणि हाच सुप्रतिष्ठित नियम आहे. संन्यास घेणं म्हणजे काय? त्यात दोन गोष्टींचा विचार मुख्यत्वे होतो.  
एक म्हणजे काम्य कर्मांचा त्याग आणि दुसरं म्हणजे आश्रमधर्माचे पालन. एखादा हेतू पूर्ण करण्याच्या इच्छेपोटी व्यक्ती ज्या कुठल्या क्रिया / कृत्ये करते, त्या सगळ्यांचा त्याग करणे; थोडक्यात ती कृत्यं / कामं न करणे म्हणजे काम्य कर्मांचा त्याग होय. धर्मशास्त्रात म्हटलं आहे की, दंडधारणादी बाह्य चिन्हे असणाऱ्या आणि ज्याचा स्वीकार करताना काही प्रेष शब्दांचा उच्चार करावा लागतो अशा एका विशिष्ट आश्रमाचे पालन करणे ही संन्यासातली दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे. व्यक्तीला हा त्याग कसा साधता येतो, त्यावर तिला अमृतत्व / मोक्ष मिळणार की नाही, हे ठरतं; असं उपनिषदं सांगतात. (कैव. उप., बृह. उप. ४.५.३। ४) भगवद्गीतेमध्येही काम्यकर्माचा त्याग करणे म्हणजे संन्यास असं म्हटलं आहे. (१८.२) 
हा विशिष्ट बाह्य चिन्हे असणारा संन्यास स्त्रियांना आणि शूद्रांना अधिकृतरीत्या स्वीकारता येत नसे. तथापि सर्व कर्मांचा त्याग तसेच ऐहिक सुखांचा आणि वासनांचा त्याग स्त्रिया, शूद्र आणि संकर जातीचे लोक ह्यांनाही करता येतो, असं मत धर्मशास्त्रात मांडलेलं आहे. (धर्मशास्त्राचा इतिहास; पूर्वार्ध; पृ. ३२३.३२४)
“आत्मा तो निर्मळ शुद्धबुद्ध” असं लिहिताना सोयराबाईला हेच म्हणायचं असावं. तिच्यासह इतर संत कवयित्रींनी आपला धार्मिक / आध्यात्मिक अधिकार लेखनातून दाखवून दिलेला आहेच. 

बातम्या आणखी आहेत...