आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री शिक्षणाचा प्रसार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख.


शिक्षणाचा अधिकार नाही, त्यामुळे ज्ञानसंपादन नाही आणि परिणामी धर्मसूत्रांतही नेमके काय सांगितले आहे याची जाण वा माहिती नाही, चर्चेचा - वादाचा अधिकार नाही; अशी तिची स्थिती बनली. परिणामी धर्मशास्त्रांत आपले अधिकार कोणते सांगितले आहेत, पतीच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, कुणाकडूनही नियमांचे उल्लंघन झाल्यास शिक्षांचे स्वरूप नेमके काय आहे... इत्यादी सगळ्याच गोष्टींबाबतचे तिचे अज्ञान वाढले आणि मौखिक माहितीवर विश्वास ठेवणे भाग पडले. पुरुषांकडून मिळणारी ही माहिती अर्थातच त्यांच्या सोयीची तेवढी होती व पुढील काळात हीच माहिती पुरुषांसह अज्ञानी स्त्रियांकडूनही पुढील पिढ्यांमध्ये हस्तांतरित होत गेली.


प्राचीन काळी भारतीय स्त्रियांची शिक्षणाच्या बाबतीत चांगली प्रगती झालेली होती, असे म्हटले जाते. अर्थात यात उच्चवर्णीय स्त्रियांचाच तेवढा विचार केलेला दिसतो.


इंग्रजी अमदानीच्या सुरुवातीला स्त्रीशिक्षणाचा अभावच होता. एक सावित्रीबाई फुले यांचा अपवाद वगळता १८८० पूर्वीच्या काळात कोणी स्त्रीसुधारक झाल्या नाहीत. पण पुढे राजा राममोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, दयानंद सरस्वती, विवेकानंद, न्या. रानडे, म. फुले, महर्षी कर्वे यांसारख्या विचारवंतांनी स्त्रीशिक्षणाच्या बाबतीत पुढाकार घेतला व हळूहळू स्त्रिया शाळेत जाऊन शिकू लागल्या. या कामी महर्षी कर्वे यांचे कार्य व्यापक आणि उपयुक्त ठरले. कर्व्यांनी आपले सारे आयुष्य स्त्रीशिक्षणासाठीच वाहिले. हळूहळू अनेक कन्याशाळांची स्थापना झाली. स्त्रीशिक्षक तयार करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण संस्था निघाल्या. शिक्षिकेचा पेशा स्वीकारणाऱ्या स्त्रियांसाठी अनेक प्रलोभने ठेवली गेली. कोल्हापूर, बडोदे, औंध, ग्वाल्हेर, इ. अनेक संस्थानांत स्त्रीशिक्षण मोफत ठेवलेले होते. मुलींसाठी असलेल्या शाळांच्या अभ्यासक्रमात शिवणकाम, विणकाम, कशिदाकारी, गृहोद्योग, गायन, चित्रकला, रंगकाम, इ. ललित कला यांचा समावेश होता. 


इ. स. १९४७ पर्यंत भारतात स्त्रीशिक्षणाचा प्रसार बराच झाला होता; पण तो वरच्या वर्गांपर्यंत मर्यादित होता. खेड्यातील मुलींनी शाळेत जावे, म्हणून त्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत, मोफत साहित्य अशी प्रलोभने दाखवण्यात येत होती. शाळेत लेखन, वाचन, साधे गणित हे विषय शिकवीत. श्रवण, वाचन, पाठांतर अशा पद्धतीने अभ्यास होई. धार्मिक शिक्षण शाळेत देत नसत. पुढच्या काळात प्राथमिक शिक्षण मुलामुलींना सक्तीचे करण्यात आले. मुलींसाठी स्वतंत्र शाळा व स्वतंत्र अभ्यासक्रम ठेवण्यात आले. 


भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर शिक्षणासंबंधी विचार करण्यासाठी डॉ. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. मुलांसाठी असलेल्या विद्यालयांतून मुलींच्या दृष्टीने योजना आखल्या जाव्या, मुलींच्या जीवनगरजांचा विचार कॉलेजातून व्हावा व त्याप्रमाणे त्यांना शिक्षण मिळावे, अशा प्रकारच्या सूचना त्या समितीने केल्या. त्याप्रमाणे मद्रास, वेंकटेश्वर, बडोदे, दिल्ली, कलकत्ता, अलाहाबाद अशा अनेक विद्यापीठांनी गृहविज्ञान या विषयाला अभ्यासक्रमात स्थान दिले. स्त्रियांना आधुनिक शास्त्रीय पद्धतीने त्याचे शिक्षण देण्यास सुरुवात केली.


केवळ स्त्रीशिक्षणाचाच विचार करण्याकरिता १९५८मध्ये श्रीमती दुर्गाबाई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय स्त्रीशिक्षण समिती नेमण्यात आली. तिने काही शिफारशी केल्या. शाळा नसलेल्या ठिकाणी शाळा काढणे; मागसलेल्या भागांकरिता मध्यवर्ती शाळा व वसतिगृह काढणे, वाहनांची सोय करणे; गरीब मुलींच्या दुपारच्या जेवणाची सोय करणे; गरजू मुलींना पुस्तके, गणवेष व इतर शालेय साहित्य मोफत पुरवणे; शिक्षणाचा दर्जा उंचावणे, इत्यादी.


या समितीने स्त्रीशिक्षणाचा प्रश्न त्या काळाच्या मानाने व्यापक तऱ्हेने हाताळला. ‘स्त्री ही सुमाता आणि सुपत्नी बनण्यासाठी तिच्या जीवनात व्यवसायाची आवश्यकता आहे. सामाजिकदृष्ट्या उपयुक्त व वैयक्तिकदृष्ट्या साफल्याची भावना निर्माण करणारा असा जीवनव्यवसाय प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यक असतो. त्यासाठी घराबाहेरचा एखादा योग्य तो व्यवसाय स्वीकारल्याने स्त्रीच्या विचाराचे कार्यक्षेत्र रुंदावते, तिच्या व्यक्तित्वात एक प्रकारचा समतोलपणा येतो. त्यामुळे माता आणि पत्नी या भूमिकांसाठीही ती अधिक कार्यक्षम ठरते,’ असे समितीने म्हटले होते.


इ. स. १९६४मध्ये कोठारी आयोगाची नेमणूक झाली. त्याने आपल्या अहवालात स्त्रीशिक्षणाच्या बाबतीत विशेष सूचना केलेल्या नव्हत्या; पण स्त्रीशिक्षणावर नेमलेल्या स्वतंत्र समित्यांनी सुचवलेल्या सर्व शिफारसी मान्य केल्या. या आयोगाने दहावीपर्यंत मुलामुलींना तोच अभ्यासक्रम सुचविला; कार्यानुभव व भाषेचा अभ्यास या बाबतींत निवड करायला मोकळीक दिली आणि सर्व विषय खालच्या व वरच्या अशा दोन पातळ्यांवर अभ्यासता येतील असे सुचवले. 


आज स्त्रीशिक्षणाचा बराच प्रसार झाला आहे. घर व बालसंगोपन या पलीकडे स्त्रीचे क्षेत्र विस्तृत झाले आहे. ती आज अनेकविध नोकऱ्या, व्यवसाय करून अर्थार्जन करताना दिसते आहे. आज पुरुषांसाठी राखीव असलेले बहुतांश दरवाजे स्त्रियांनाही खुले झाले आहेत. स्थापत्य, शेती, वैद्यक, वाणिज्य, कायदा, अध्यापन, कला व शास्त्र या सर्व शाखांत स्त्रिया शिक्षण घेऊन व्यवसाय करीत आहेत. या सर्व इतिहासाविषयी सविस्तर वाचायचे असेल, तर वाचकांनी पुढील पुस्तकं अवश्य पाहावीत. 
१. प्राचीन भारतीय शिक्षणपद्धति - श्री. अ. स. अळतेकर, १९३५
२. भारत में शिक्षा - डॉ. श्रीधरनाथ मुकर्जी, बडोदा, १९६०
३. भारतीय शिक्षा का संक्षिप्त इतिहास - श्री. वंशीधर सिंह, भूदेव शास्त्री, आगरा, १९५७
४. भारतीय स्त्रीशिक्षण - प्रा. कुंदा दाभोलकर, पुणे, १९७३
५. महाराष्ट्रातील राष्ट्रीय शिक्षणाचा इतिहास - श्री. पां. श्री. आपटे, १९५८


- कविता महाजन, वसई 
kavita.mahajan2008@gmail.com

बातम्या आणखी आहेत...