आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रवेत्त्या स्त्रिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख.


शिक्षणाचा पूर्णत: अभाव आणि  हवे ते शिक्षण घेता न येणे या प्रश्नाने स्त्रियांच्या अनेक पिढ्या अज्ञानाच्या खाईत लोटल्या. देशाच्या स्वातंत्र्यासोबत शिक्षणाचा हक्क स्त्रियांना मिळाला. सक्तीच्या, मोफत प्राथमिक शिक्षणाला घटनात्मक आधारही आहे. सर्व पंचवार्षिक योजनांत स्त्रीशिक्षणासाठीच्या तरतुदी असूनही स्त्रियांच्या शिक्षणाचं प्रमाण फारसं चांगलं नाहीच. विशेषत: माध्यमिक शिक्षणानंतर गळती वाढत जाते आणि उच्च शिक्षणापर्यंत तर खूपच कमी मुली पोहोचलेल्या दिसतात.


पुराणांमधले संदर्भ पाहिले, तर शिकलेल्या व शिकवणाऱ्या स्त्रियांची काही उदाहरणे सापडतात. १. मदनिका नावाच्या एका राक्षसपत्नीला स्वेच्छारूपधारिणीविद्या अवगत होती. २. मनोरमा नावाच्या विद्याधरीने आपल्यावर चाल करून आलेल्या राक्षसापासून सुटका करून घेण्यासाठी स्वारोचिष मनूला अस्रग्रामहृदयविद्या दिली होती. ३. विभावरी नामक विद्याधरीने सर्वभूतरुतविद्या स्वारोचिष मनूला दिली होती. त्यामुळे सर्व जीवजंतूंच्या ध्वनीचा अर्थ समजत असे. ४. भूमिगत निधीची प्राप्ती करून देणारी पद्मिनी विद्या कलावती नामक स्त्रीने स्वारोचिषाला दिली होती. ५. त्रिपुरा सुंदरीने अर्जुनाला पराबाला विद्या दिली होती. ६. पुरुषप्रमोदिनी विद्या रंभेने यमाची कन्या सुनीथा हिला शिकवली होती. ७. देवहुती विद्या दुर्वासाने कुंतीला दिली होती. या ‘विद्या’ वेगवेगळ्या शाखांमधील आहेत, हेही या मोजक्या उदाहरणांवरून दिसून येतं. स्त्रियांना केवळ घर व मुलं यांच्याशी संबंधित गोष्टींमध्येच जन्मजात रस असतात, असे गैरसमज ही माहिती वाचताना दूर होतात. 


त्यानंतरच्या काळाचा विचार करता आढळते की, इ.स.च्या पहिल्या शतकापर्यंत भारतीय समाजात कन्येचे उपनयनही होत असे. अर्थात त्या काळी तिला शिक्षणाचाही लाभ होत असे. विद्वान स्त्रिया राजदरबारात पुरुष आचार्यांशी शास्त्रार्थ करीत व विद्यालयात अध्यापनही करीत, असे उपनिषदांवरून व धर्मशास्त्रावरून कळते. (भारतीय संस्कृतिकोश, खंड ५, पृ. ३६९, ३५९) 


यात असाही एक मुद्दा काही संशोधक सांगतात की, शुद्र वगळता ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या बाकी तिन्ही वर्णांमध्ये उपनयन संस्कार केले जात. उपनयन संस्कार झालेली व्यक्ती शिक्षणासाठी सज्ज मानली जाई. त्यामुळे या काळात शुद्र वर्णाच्या स्त्रिया वगळता इतर सर्व स्त्रियांचे उपनयन संस्कार होत असले पाहिजेत आणि त्या सर्व शिक्षण घेत असल्या पाहिजेत. 


इ.स. पूर्व सुमारे ८००पर्यंतच्या काळातील स्त्रियांचा दर्जा पुरुषांबरोबरचा होता. पत्नी शब्दाची व्युत्पत्ती तिच्या यज्ञकर्तव्याशी निगडित आहे. त्यावरून पत्नीला यज्ञात महत्त्वाचे काम असे, हे दिसून येईल. यज्ञाच्या वेळी तिचे व्रतोपनयन होत असे व पतीबरोबर तिलाही दीक्षा मिळे. वेदमंत्रांची व त्यांच्या अर्थाची चांगली माहिती असल्यावाचून वैदिक यज्ञात भाग घेता येणे शक्य नसल्यामुळे त्यासाठी उपनयनाची आवश्यकता असे व या काळात सामान्यतः सर्व स्त्रियांचे उपनयन होत असे. काही स्त्रिया त्यानंतर बराच काल अध्ययनात घालवीत, असे दिसते. घोषा, लोपामुद्रा यांसारख्या स्त्रिया मंत्रद्रष्ट्या म्हणून प्रसिद्ध आहेत. याव्यतिरिक्त आणखी कित्येक स्त्रिया विदुषी असाव्या. या शिक्षणाबरोबरच संपन्न कुलातील स्त्रिया गायनवादनादी ललित कलांचेही शिक्षण घेत. या कालखंडाच्या शेवटी स्त्रियांचे वैदिक अध्ययन मागे पडू लागले व यज्ञात त्यांचा भाग औपचारिकच राहू लागला. 


इ.स. पूर्व सुमारे ८०० ते इ.स. पूर्व सुमारे २०० या काळात नित्य गरज असणाऱ्या वैदिक मंत्रांचे ज्ञान व प्रतिदिन विहित असलेले धार्मिक विधी करण्याची पात्रता या कालात स्त्रियांमध्ये होती. गृह्याग्नीतील रात्रीचा होम पत्नीनेच करायचा असे. दिवसाचा होमही तिनेच करावा, असे काहींचे मत होते. सुगीच्या वेळी करायचा सीतायज्ञ तर स्त्रियांनीच करावा, अशी रूढी होती. स्त्रस्तरारोहण संस्काराच्या वेळी पत्नीने स्वतः आपल्या उपनीत मुलांसमवेत पुष्कळ मंत्र म्हणायचे असत. वनवासात जायच्या वेळी राम जेव्हा कौसल्येचा निरोप घ्यायला गेला, तेव्हा ती एकटीच होम करण्यात गुंतली होती. वालीची पत्नी तारा हीही मंत्रवेत्ती होती. या उदाहरणांवरून या काळी मुलींचे उपनयन होत असे, हे कळून येईल. उपनयनानंतर वयात येईपर्यंत काही मुली थोडेसे वेदाध्ययन करीत व नंतर लगेच विवाह करीत. अशा मुलींना सद्योद्वाहा म्हणत. काही मुली मात्र लवकर विवाह न करता वेद-वेदान्तपूर्वमीमांसादी शास्त्रांचे अध्ययन करीत. हे शिक्षण त्या घरीच पिता किंवा भ्राता याच्याकडून घेत. त्यांना ब्रह्मवादिनी म्हणत. याज्ञवल्क्याची पत्नी मैत्रेयी ही ब्रह्मवादिनी होती. सुलभा, वडवा प्रातीथेयी, गार्गी, वाचक्नवी या प्रसिद्ध विदुषी होत्या. काही सुशिक्षित स्त्रिया आजन्म ब्रह्मचर्य पाळून अध्यापनाचा व्यवसाय करीत. क्षत्रिय व वैश्य कुलांतील बऱ्याच स्त्रिया भिक्षुणी बनून आपले आयुष्य तत्त्वज्ञानाच्या व्यासंगात घालवीत. थेरीगाथा या ग्रंथात अशा स्त्रियांची चरित्रे व गाथा आहेत.


- कविता महाजन, वसई
kavita.mahajan2008@gmail.com

बातम्या आणखी आहेत...