Home | Magazine | Madhurima | Kavita Mahajan writes about history of women

साक्षर स्त्रियांचे अपवाद

कविता महाजन, वसई | Update - Sep 11, 2018, 06:07 AM IST

भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिल

 • Kavita Mahajan writes about history of women

  भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख.

  इ. स. पूर्व सुमारे २०० ते इ. स. १२०० या कालखंडात पहिली तीन-चार शतके मुलींचे उपनयन एक संस्कार म्हणून चालू होते. पण त्यानंतर वेदाध्ययन वगैरे काही होत नसे. इसवी सनाच्या पाचव्या शतकाच्या पुढे मुलींचा उपनयन संस्कार बंद झाला. त्यामुळे त्यांच्या प्राथमिक शिक्षणाकडेही दुर्लक्ष होऊ लागले. दुर्दैवाने मुलींचे विवाहाचे वयही भराभर कमी होऊ लागले. आणि इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून मुलींची लग्ने अकरा-बाराव्या वर्षी होऊ लागली. तेव्हा साहजिकच त्यांचे प्राथमिक शिक्षण बंद झाले.


  कुलीन, संपन्न व सुसंस्कृत घराण्यांमध्ये मात्र मुलींचे वेदाध्ययन बंद पडल्यावरही त्यांना वाङ्मयाचे थोडेसे शिक्षण देत. इसवी सनाच्या पहिल्या दोन-चार शतकांत विवाहकाल बारा-तेरा वर्षांचा होता. तोपर्यंत मुलींना लेखनवाचन वगैरे शिकवून वाङ्मयाचीही ओळख करून देत. या वेळी स्त्रियांपैकी काही प्राकृतांचा विशेष व्यासंग करीत व त्या भाषांत कविताही करीत, हे गाथासप्तशतीवरून दिसून येते. इसवी सनाच्या चौथ्या शतकानंतर जेव्हा संस्कृतचा विशेष अभ्यास होऊ लागला, तेव्हा काही स्त्रियाही संस्कृतमध्ये ग्रंथ लिहू लागल्या. अर्थानुरूप भाषाशैलीबद्दल शीलभट्टारिका नामक कवयित्रीची ख्याती होती. शृंगाररसप्रधान मनोहर कविता करण्याबद्दल गुजरातमधील देवी नावाची कवयित्री प्रसिद्ध होती. वऱ्हाडात विजयांकेने उत्तम काव्याबद्दल कीर्ती मिळवली होती. काही स्त्रिया वैद्यकाचाही अभ्यास करीत. रूसा नामक एका स्त्री वैद्याने स्त्रीरोगावर एक पुस्तक लिहिले होते. ते इतके उपयुक्त होते की, आठव्या शतकात त्याचे अरबी भाषेत भाषांतर करण्यात आले. दुर्दैवाने हे कोणतेच ग्रंथ सांप्रत उपलब्ध नाहीत.


  या विदुषी बहुतेक अमात्य, प्रधान, मांडलिक यांसारख्या संपन्न व सुसंस्कृत कुलातील असाव्या. कारण इसवी सनाच्या नवव्या शतकापर्यंत अशा घराण्यात स्त्रियांना उच्च शिक्षण देत असत व शास्त्राभ्यास आणि काव्य करण्याची त्यांच्या अंगी पात्रता असे, असे काव्यमीमांसेवरून कळते. संस्कृत नाटकांतील नायिकांवरून तेच अनुमान निघते. संपन्न कुलातील मुलींना संगीत, चित्रकला, गृहसजावट वगैरे ललित कलांचेही शिक्षण देत, असे संस्कृत नाटके व कामसूत्र यांवरून दिसते.


  इसवी सनाच्या आठव्या-नवव्या शतकाच्या सुमारास जेव्हा मुलींची लग्ने नवव्या-दहाव्या वर्षी होऊ लागली, तेव्हा बऱ्याचशा मुली अशिक्षित राहू लागल्या.


  मुसलमानी अंमलामध्ये साक्षरतेचे हे प्रमाण भराभर कमी होऊ लागले. राज्यक्रांतीमुळे बहुतेक संपन्न व सुसंस्कृत कुलांची वाताहात झाली. काही हिंदू कुले संपन्न झाली; पण ती बहुतेक मुळात हीन संस्कृतीची असल्यामुळे मुलींना शिक्षण देण्याकरिता खासगी शिक्षक ठेवण्याची प्रथा त्यांच्यांत निर्माणच झाली नाही. मुलींच्या शिक्षणासाठी सार्वजनिक शाळा नव्हत्याच, त्यामुळे मुसलमानी अंमलात बहुतेक स्त्रिया निरक्षरच राहिल्या. राजपूत राजघराण्यात राजकुमारींना शिक्षण देत असत. जैन विधवांनाही १९व्या शतकाच्या प्रारंभी मठात धर्मग्रंथ वाचता येण्याइतके शिक्षण देत. पण ही उदाहरणे अपवादात्मक आहेत.


  मध्ययुगाच्या शेवटी शेकडा दहापेक्षा जास्त स्त्रिया साक्षर नव्हत्या; तरीही सामान्य स्त्रीसमाज असंस्कृत होता, असे म्हणता येणार नाही. या वेळी पुराणांच्या माध्यमातून हिंदूंच्या संस्कृतीचे ज्ञान लोकांना त्यांच्या भाषेतून देण्याची प्रथा दृढमूल झाली होती. त्यामुळे धर्म, नीती, तत्त्वज्ञान व प्राचीन संस्कृती यांचे ज्ञान निरक्षर लोकांनाही मिळत असे. निरक्षर असूनही हिंदू स्त्रियांनी हिंदू संस्कृतीचे जे संरक्षण केले आहे, त्याचे बरेचसे श्रेय पुराणश्रवण, पौराणिक धर्माचे पालन व मध्ययुगातील संतकवींच्या लोकभाषांतील वचनांचे पठण यांनाच आहे.


  मध्ययुगात क्षात्र घराण्यातील व राजकुलातील स्त्रियांना राज्यकारभाराचे व लष्करी कवायतीचे शिक्षण देत असत. मस्सग लोकांचा राजा अलेक्झांडरशी झालेल्या लढाईत जेव्हा पडला, तेव्हा त्याच्या विधवा राणीने राजधानीच्या बचावाचे व राज्यकारभाराचे काम आपल्याकडे घेतले. सातवाहन घराण्यातील नयनिका राणी व वाकाटक वंशातील प्रभावती गुप्ता राणी या दोघीही आपल्या पतीच्या पश्चात् मुलांच्या अज्ञानावस्थेत आपल्या राज्यांचा कारभार पहात होत्या. काश्मीरमध्ये सुगंधा व दिद्दा या दोन राज्यकर्त्या राण्या होऊन गेल्या. चालुक्यांच्या राजवटीत तर राजघराण्यातील पुष्कळ स्त्रियांकडे राज्यकारभारातील जबाबदारीची कामे सोपवीत असत. विजयभट्टारिका, अक्कादेवी, मइलादेवी, कुंकुमदेवी व लक्ष्मीदेवी या चालुक्य राजघराण्यातील स्त्रिया इसवी सनाच्या सातव्या व अकराव्या शतकात नगराधिकारी किंवा प्रांताधिकारी म्हणून काम करीत होत्या. घोड्यावर बसणे, तलवार व भाला चालवणे, पोहणे, इ. गोष्टी त्यांना येत असत. आपल्या गावाचे रक्षण करता करता धारातीर्थी पडलेल्या स्त्रियांच्या स्मरणार्थ कोरलेले काही लेख सापडले आहेत. मराठा व राजपूत स्त्रियांनाही मध्ययुगात लष्करी शिक्षण देत असत.

  - कविता महाजन, वसई
  kavita.mahajan2008@gmail.com

Trending