आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रीधनाचा योग्यायोग्य विचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख.


स्त्रि यांच्या प्रश्नांमध्ये आर्थिक प्रश्न हा अनेकार्थांनी इतर प्रश्नांहून मोठा बनलेला दिसतो. ती अबला, ती परावलंबी, ती दुबळ्या घटकांमधली एक असं मानलं गेल्याने आपल्याकडे प्रत्येक काळात स्त्रियांसाठी कौटुंबिक, सामाजिक व राजकीय पातळ्यांवर काही ना काही वेगळ्या आर्थिक तरतुदी केल्या गेलेल्या दिसतात. स्त्रियांचे आर्थिक प्रश्न पाहता तीन मुख्य प्रश्न दिसतात. एक म्हणजे कौटुंबिक मालमत्तेत वाटा न मिळणे, दुसरं पुरुषी मक्तेदारी मानली गेल्याने अनेक कार्यक्षेत्रांमध्ये स्त्रियांना प्रवेश नसणे आणि तिसरं म्हणजे समान वेतन न मिळणे. घर / जमीन नावावर नसणे आणि स्त्रीधनाचा प्रश्न हेही त्यात समाविष्ट करता येतील.

मिताक्षरेने असे म्हटले आहे की, सर्व अविवाहित भावंडांमध्ये मालमत्तेचा समान हिस्सा आखला जावा आणि अविवाहित बहिणीच्या विवाहासाठी भावांना मिळाला असता तितकाच हिस्सा बाजूला काढून ठेवला जावा. जर वडिलोपार्जित संपत्ती जास्त नसेल, तर चतुर्थांश हिस्सा बाजूला काढून तिच्या विवाहाची तरतूद करावी, असं दायभागाचं मत होतं. थोडक्यात विवाहित मुलींना वडिलोपार्जित संपत्तीमध्ये वेगळा हिस्सा दिला जात नव्हता आणि अविवाहित मुलींसाठीही तो हिस्सा म्हणजे केवळ ‘विवाहाची तरतूद’ होती. प्राचीन काळात विधवा स्त्रियांनाही मृत पतीचा वारसा हक्क दिला जात नसे; मध्ययुगीन काळात हे विचार काही प्रांतांमध्ये काहीसे बदलले. यास्काचार्याच्या म्हणण्यानुसार उत्तरेत विधवांना मृत पतीची मालमत्ता वा त्यातला हिस्सा मिळत नसे, पण दक्षिणेकडे काही विवक्षित प्रसंगी तो मिळत होता.

स्त्रीधन ही प्रत्येक स्त्रीची ‘वैयक्तिक मालमत्ता’ मानली जाते, हे आजही अनेक स्त्रियांना माहीत नसतं. साधं लग्नाच्या वेळी तिला मिळालेल्या भेटवस्तू, कपडे-दागिने, पैसा अडका हे पूर्णत: ‘तिच्या मालकीचं’ असतं; त्यावर सासरच्या – माहेरच्या कुणाचाही, अगदी तिच्या नवऱ्याचाही हक्क नसतो. त्याबाबतचे निर्णय तिने स्वत: घ्यायचे असतात. हे माहीत नसल्याने वस्तू तिच्या नावे खरेदी करणे, सर्व वस्तूंची यादी करून त्याची प्रत तिच्याजवळ एक आणि माहेरी – सासरी एकेक देऊन ठेवणे या प्राथमिक गोष्टीही अनेक लोक करत नाहीत. मुळात लग्न (अगदी प्रेमविवाह असला तरी) एक ‘व्यवहार’ असतो, मात्र या व्यवहारात मुलीलाच ‘वस्तू’ मानून कन्यादान वगैरे विधी केले जातात आणि वस्तूला काही भावना, कल्पना, विचार, मतं नसतातच; त्यामुळे ही माहिती तिला देण्याची वा अशा तरतुदी करण्याचीही गरज अनेकांना वाटत नाही. लग्न ठरवताना लाख वाटाघाटी होतील, त्यात कुणाची मनं / भावना दुखावल्या जातील वगैरे विचार होत नाहीत; मात्र मुलीसाठीची तरतूद स्वतंत्र करायची म्हटलं किंवा तिच्या नावे काही गोष्टी करायच्या म्हटलं की लगेच ‘सासरच्यांना काय वाटेल?’ असा मुद्दा पोतडीतून बाहेर निघतो. कुणाच्याही नावे दिलं वा कुणाजवळदेखील ठेवलं, तरी ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटातच राहणार ना... असे बिनडोक व बालिश विचार मांडले जातात. 
मग लग्नानंतर सासूने सुनेच्या माहेराहून आलेल्या वस्तू आपल्या लेकीला दिल्या, तरी सून त्याविषयी काही बोलत नाही; किंबहुना तिने बोलूच नये, अशी अपेक्षा असते. नवऱ्याचा तर बायकोवर ‘संपूर्ण हक्क’ असतो, असं म्हणून हुंड्यात मिळालेले पैसे-दागिने तो बिनधास्त तिला न विचारता, न सांगता वापरून मोकळा होताना दिसतो. याज्ञवल्क्याच्या मते (२.४६), स्त्रीधनावर पतीची कोणत्याही प्रकारची सत्ता असत नाही. ह्याला अपवाद म्हणजे काही विशेष अडचणीच्या प्रसंगी फक्त पतीला पत्नीच्या स्त्रीधनावर सत्ता चालविता येते.

स्त्रीधन, हुंडा, आंदण या कल्पना आपल्याकडे वेदकाळापासून प्रचलित असलेल्या दिसतात. ऋग्वेदातील विवाहसूक्तात नवरी सासरी जाताना तिच्यासोबत आंदण दिलेल्या वस्तू व्यवस्थित पाठवल्या जात असल्याचा उल्लेख येतो. (ऋ. १०.८५.१३ आणि ३८) तैतरीय संहितेत तर पत्नी घरातल्या सगळ्याच सामानाची स्वामिनी असते असं म्हटलेलं आहे. मनुस्मृतीत स्त्रीधनाबाबतचे मत अर्थातच याहून वेगळे दिसते. म्हणजे मनू स्पष्टपणे म्हणतो की, पत्नी जे काही मिळवते किंवा तिला जे काही मिळतं, ते सगळंच्या सगळं आपोआप तिच्या पतीच्या मालकीचं बनतं. (मनुस्मृती; ८.४१६) मेधातिथीच्या मते या वचनाचा अर्थ असा आहे की, स्त्रियांची मिळकतीवर मालकी असते हे सत्य असलं तरीही त्या मालमत्तेचं काय करायचं याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार मात्र पत्नीला नसतो; ही निर्णयक्षमता केवळ तिच्या पतीकडे असते. थोडक्यात, पती जिवंत असेपावेतो पत्नीच्या स्त्रीधनावर त्याची मालकी नसली तरी सत्ता असतेच.

या मतांचा प्रभाव आजही आहेच. साधारणपणे घरात पती-पत्नी दोघेही नोकरी करणारे असतील, तर सहसा पत्नीच्या कमाईतून घरखर्च भागवला जातो आणि पतीच्या कमाईतून बचत केली जाते; घरापासून ते घरातल्या एखाद्या लहान वस्तूपर्यंतची मालकी पाहिली तर ती बहुतांश वेळा पतीच्या नावावर दिसते. दोघांच्याही कमाईतून घरखर्च व बचत हे समांतर करावं, हे आजही सुचवलं जात नाही. पत्नीनं सुचवलं तर तिला ‘स्वार्थी’ मानलं जातं. आर्थिक विषय काढले तर संबंध खराब होतील, असं लोक मानतात. उलट आर्थिक व्यवहार जितके पारदर्शक, स्वच्छ असतील; नातं तितकं मोकळं व सुरक्षित भावना असलेलं बनतं, हे लोकांना कळेल तो सुदिन.
{{{

बातम्या आणखी आहेत...