आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघाचि संसार सुखाचा करीन!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा शेवटचा लेख.


कविता महाजन यांनी २५ जुलै रोजी या सदरातला हा लेख इमेल केला होता. त्यांनी लिहिलं होतं, ‘या वर्षातले शेवटचे दोन लेख पाठवते आहे. पुढील वर्षी काय करायचं ते डिसेंबरमध्ये ठरवू.’ सदर आणखी दोन वर्षं तरी चालवता येईल, इतका त्यांचा अभ्यास झालेला होता. दुर्दैवाने त्यांना २९ सप्टेंबर रोजी मृत्यूने गाठलं आणि पुढे काय करायचं ते अर्धवटच राहिलं.


स्वा तंत्र्य आंदोलनाची सुरुवात झाली, त्या काळात स्त्रीप्रश्नांचा विचार मागे पडला. स्त्रिया शिकू लागल्या आहेत, नोकऱ्या करताहेत, राजकीय आंदोलनांत - चळवळींत सहभागी होत आहेत, त्यामुळेही या प्रश्नांचा वेगळा विचार करण्याची गरज राहिली नाही; अशीही भावना असावी. मात्र स्त्रियांच्या दुय्यम स्थानाचे प्रश्न व त्यांच्याकडे पाहण्याची पुरुषांची व एकूणच समाजाची दृष्टी यामुळे बदलली नाही. उलट काळाच्या ओघात त्यांच्या समस्यांमध्ये वाढच झाली. स्त्रियांच्या प्रश्नांचा इतिहास पाहताना आपण प्राचीन काळापासून चौदाव्या-पंधराव्या शतकापर्यंतच्या इतिहासाचा धांडोळा या सदरातून घेत आलो आहोत. तथापि यात काही महत्त्वाचे प्रश्न शिल्लक राहिले आहेत; उदाहरणार्थ लैंगिकतेच्या संदर्भातले काही प्रश्न; कौमार्याच्या कल्पनेचा जाच; स्त्री पतित / दूषित असण्याच्या कल्पना; पळवून नेले जाण्याचे भय; छेडछाड, विनयभंग, विटंबना, बलात्कार या आत्यंतिक गंभीर समस्या; स्त्री आरोग्याचे प्रश्न; देवदासी, नर्तकी, वेश्या या समाजापासून ‘वेगळ्या’ काढल्या गेलेल्या स्त्रियांचे प्रश्न हे त्यातले काही प्रमुख. या प्रश्नांच्या सोडवणुकीचे, स्त्रीला माणूस समजावे म्हणून केले गेलेले प्रयत्न आपल्याकडे एकोणिसाव्या शतकापासून सुरू झाले. त्यांचाही विचार यानंतर करायला हवा आहे. या समस्यांमध्ये जागतिकीकरणानंतर नवी भर पडली आहे. बाजारकेंद्री अर्थव्यवस्थेने केवळ नवे प्रश्न निर्माण केले असेच नाही तर जुन्या प्रश्नांकडे पाहण्याचे दृष्टिकोनदेखील इत्थंभूत बदलून टाकण्याची खेळी खेळली आहे. त्यामुळे प्राचीन ठरलेल्या, जुन्या झालेल्या आणि तरीही अजूनही न सुटलेल्या स्त्रीप्रश्नांकडे कसं बघायचं हा पेच सर्वसामान्य माणसांपुढे पडलेला आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरील वेगाने बदलणाऱ्या संदर्भांना समजून घेताना नाकी नऊ येत असतानाच नव्या तंत्रज्ञानातून आदळणारे माहितीचे ढीग आणि सोशल मीडियामधून समोर येणारी गोंधळवून टाकणारी आग्रही व आक्रमक मतं-मतांतरं यांमुळे काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं याबाबत स्त्रिया आणि पुरुष हे दोन्हीही घटक अस्वस्थ झालेले दिसताहेत. इतिहासाचा आढावा घेत घेत या अस्वस्थ वर्तमानापर्यंत येऊन थांबणे आणि त्याचे तटस्थपणे निरीक्षण करणे आवश्यक आहे. ते पुढील वर्षात याच अथवा अजून एखाद्या लेखमालेतून करीन. मुळात इथल्या स्त्रीप्रश्नांचा विचार करताना भारतासह जगभरच्या स्त्रीप्रश्नांचा समग्रतेने पाहिले, तरच योग्य रीतीने त्याचा अंदाज येऊ शकेल आणि त्यातूनच सम्यक मुक्तिदायी, शोषणविरोध, शांततावादी पर्यायांवर आधारलेली कृती करणे शक्य होऊ शकेल. लैंगिकतेविषयी आपण कमी बोलतो हे मान्यच आहे; मात्र शारीरिकतेविषयीही आपण कमी का बोलतो, हे एक कोडंच आहे. इथं लैंगिकता आणि शारीरिकता ही बाईची वा बाप्याची हा मुद्दाच नाहीये... ‘सर्वांची!’ असं म्हणू या. मासिक पाळी, ती येणं न येणं व संपणं; गर्भधारणा, गर्भपात; मूल होऊ नये म्हणून करायच्या योजना; प्रसूती, बाळाला दूध पाजणं, दूध न येणं, दूध जास्त येणं... या सर्वच गोष्टी खरंतर ‘फक्त स्त्री’च्या नाहीयेत. बाईच्याच पोटातून जन्माला येणाऱ्या प्रत्येक पुरुषाचाही या गोष्टींशी संबंध असतोच. या गोष्टींवर, यातून उद्भवणाऱ्या प्रश्नांवर किती काळ किती लोकांनी लिहून झालंय आणि स्थिती अजूनही फारशी बदललेली नाहीये किंवा काळाने काही प्रश्न सोडवतानाच काही नवे प्रश्नही निर्माण केले आहेत, असं आजकाल सातत्याने जाणवतंय. उदाहरणार्थ कुमारी मातांची संख्या कमी होते आहे, मात्र आयपिल्स आणि सहजी गर्भपात या गोष्टींमुळे शारीरिक वेदनेला आणि काही वेळा काही गंभीर आजारांनाही सामोरे जावे लागणाऱ्या स्त्रियांची संख्या मात्र वाढते आहे. 


काळाच्या या टप्प्यावर जिथं नवी वैज्ञानिक संशोधनं आली आहेत, कायदे बदलताहेत आणि असलेल्या कायद्यांचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढते आहे, अनेक क्षेत्रांमध्ये स्त्रिया कार्यरत होताहेत आणि तरीही काही क्षेत्रांपासून वंचित आहेत  संक्रमणाचा टप्पा आहे हा आणि या टप्प्याविषयी मोकळेपणानं बोललं - लिहिलं जाणं, चर्चा होणं महत्त्वाचं वाटतंय. अनेक प्रश्नांकडे आज ‘बायकांचे प्रश्न’ म्हणून न पाहता ‘समाजाचे प्रश्न’ म्हणून पाहण्याची वेळ आली आहे कारण त्या प्रश्नांचा बळी केवळ बायका नसून पुरुषही आहेत. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, अंध-अपंग माणसं वेगवेगळ्या तऱ्हांनी या प्रश्नांनी भरडली जाताहेत. या सदरातून मला या प्रश्नांपैकी अनेक मुद्द्यांवर लिहिण्याची आणि त्या निमित्ताने वाचकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

  

स्त्रीजन्म म्हणवुनी न व्हावे उदास।
साधुसंती ऐसे मज केले।
या ओळींपासून आपण या सदराची सुरुवात केली होती. स्त्री प्रश्नांच्या इतिहासाचा, त्यांच्या सोडवणुकीचा हा विचार खालील ओळींपर्यंत येऊन ठेपावा, ही इच्छा व्यक्त करून; नव्या वर्षांच्या शुभेच्छांसह आपला निरोप घेते...
अवघाचि संसार सुखाचा करीन।
आनंदे भरीन तिन्ही लोक।

बातम्या आणखी आहेत...