आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रात गई बात खतम’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्रियांना आपल्या शरीरातच रस असणाऱ्या पुरुषाच्या हाका सावधपणे ऐकाव्या लागतील, वेळीच शहाणे व्हावे लागेल. आजची भारतीय स्त्री कुणाच्या अामिषाला बळी पडून इमोशनल फूल होऊ नये. कोणत्याही पुरुषाच्या वचनांना बळी पडून आपला आत्मसन्मान पायदळी तुडवला जाणार नाही, याची दक्षता तिनेच घेणे गरजेचे आहे.किंवा स्त्रियांना एक तर ‘रात गई बात खतम’ या न्यायाने प्रॅक्टिकल वागावे लागेल, तुझ्याशी सेक्स केला म्हणजे तूच माझा सात जन्मीचा जोडीदार या भोळसट सनातन तत्त्वज्ञानाला तिलांजली द्यावी लागेल. 
 
तुम्हे अपना बनाने की कसम खाई है।’ म्हणत दिलेल्या शपथेला/वचनाला जागत प्रेयसीला जनम जनम के लिये अपनी बाहों मंे बांधणारा प्रियकर, स्त्रीला लग्नाचं वचन देऊन शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर काही काळाने त्या नात्यातून अंग काढून घेणारा पुरुष आणि ‘मैं तुम्हारे बच्चे की माँ बननेवाली हूँ’ म्हणत त्याला लग्न करायला भाग पडणारी स्त्री किंवा वडील मृत्युशय्येवर असताना आपल्या मुलाचा हात जवळच्या नात्यातल्या/ ओळखीच्या मुलीच्या हातात देऊन तू हिच्याशीच लग्न कर असं वचन मागणारे वडील आणि आपला जन्मदाता अंतिम घटका मोजत आहे, त्याची इच्छा पूर्ण करणं आपलं परमकर्तव्य आहे असं समजून वचन देणारा व जन्मदात्याच्या मृत्यूपश्चात ते वचन पाळणारा गुणी, प्रामाणिक पुत्र अशी अनेक तद्दन फिल्मी कॅरेक्टर्स आपण सिनेमांमध्ये पहिली आहेत. अशा घटना कित्येकांच्या आयुष्यातही निश्चितपणे घडल्या असतीलच. ‘जान जाये पर वचन न जाये’ असा बाणा अंगी असणारी रील आणि रिअल लाइफमधली ही पिढी आता नामशेष झाली आहे.
लेखाच्या सुरुवातीलाच दिल्याघेतल्या वचनांसंबंधी दाखले देण्याचं कारण हे की ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय होय. हा निर्णय ‘ एखाद्या स्त्रीला लग्नाचं वचन देऊन तिच्या संमतीने तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करणे व पुढे ते वचन न पाळल्याने किंवा इच्छा असूनही पाळता न आल्याने संबंधित स्त्रीकडून पुरुषावर  केलेल्या बलात्काराच्या आरोपासंबंधी आहे.’

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांनी सेल्स टॅक्समध्ये सहायक आयुक्त महिलेची याचिका या आधारावर फेटाळली आहे. या महिलेने सीआरपीएफमधील डेप्युटी कमांडंटवर लावलेले बलात्काराचे आरोपही दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने फेटाळले आहेत. परस्पर सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना म्हटलं आहे की, “या संबंधांमुळे पुढे काही साध्य होणार नाही, हे महिलेला माहीत असूनही तिने परस्पर सहमतीने शारीरिक संबंध ठेवले तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही. अशा परिस्थितीत परस्पर सहमतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधांना लग्नाचं खोटं वचन देऊन बलात्कार केला, असं बोलता येणार नाही.” रिअल आणि व्हर्च्युअल जगात या  निर्णयाचं स्वागत पुरुषवर्गाने जेवढ्या उत्साहात केलं त्यावरून हा निर्णय त्यांच्यासाठी किती मोठा दिलासा देणारा आहे हे कळते.
आपल्या देशात स्त्री-पुरुषांच्या विवाहपूर्व प्रेमसंबंधांचा स्वीकार खूप शतकाआधीच झालेला असला तरी विवाहपूर्व शरीरसंबंध मात्र आजही इथे टॅबू आहेत. आपल्या देशात आजही लग्नाआधी सेक्स करणाऱ्यांना कॅरेक्टरलेस समजलं जातं. लग्नाआधी सेक्स करणारी मुलगी म्हणजे तर संस्कृतीच्या तोंडाला काळं फासणं होय. विसाव्या शतकातही आपण सेक्स या मानव जातीच्या आदिम गरजेला नैतिक-अनैतिकतेच्या, पापपुण्यांच्या कोंदणातून बाहेर काढू शकलेलो नाही. हे अनेक समस्यांचं मूळ आहे किंबहुना अनेक गुन्ह्यांचं कारणही. पुरुष सेक्सविषयी जात्याच मोकळाढाकळा असला तरी भारतीय स्त्रीमनावर मात्र अद्यापही ‘ज्याच्याशी सेक्स त्याच्याशीच लग्न किंवा ज्याच्याशी लग्न त्याच्याशीच सेक्स’’ या विचारसरणीचा जबरदस्त पगडा आहे. एखाद्या पुरुषाशी रत व्हायला कोणतीही स्त्री लगेच तयार होत नाही. अगदी तो पुरुष तिचा प्रियकर असला तरी. सेक्स ही लग्नानंतर नवऱ्यासोबतच करायची खासगी गोष्ट आहे या भारतीय सो कॉल्ड संस्कृतीच्या रक्षणकर्त्या स्त्रिया शरीरसंबंधांसाठी आग्रह धरणाऱ्या पुरुषाकडून लग्न करण्याचं वचन ( कमिटमेंट) घेतात आणि तो पुरुषही तसं वचन देतो. व्यक्तिपरत्वे ते वचन खरेही असू शकते, ते भविष्यात पाळलेही जाऊ शकते किंवा काही अडसर आल्यास नाहीही. काही पुरुष स्त्रीच्या होकारासाठी लग्नाचं वचन देऊन तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करून पुढे काही थातुरमातुर करणे सांगून तिला दिलेल्या लग्नाच्या वचनाला फितूरही होतात. दिलेलं लग्नाचं वचन जाणूनबुजून न पाळलेल्या किंवा इच्छा असूनही पाळू न शकलेल्या कित्येक पुरुषांवर ‘लग्नाचं खोटं वचन देऊन किंवा आमिष दाखवून बलात्कार’ केल्याचे गुन्हे दाखल झालेले आहेत. अनेकांनी या गुन्ह्यात प्रचंड बदनामीला सामोरं जात जबर शिक्षाही उपभोगल्या आहेत. स्त्री आपल्या प्रियकराकडून लग्नाचं वचन घेऊन त्याच्याशी सहमतीने शरीरसंबंध ठेवते म्हणजे तिच्यावर कुठलीच शारीरिक जबरदस्ती पुरुषाकडून झालेली नसते. पुरुषाने बळाचा वापर केलेला नसतो. त्या स्त्रीनेही त्या संबंधांचा पुरुषाइतकाच आनंद उपभोगलेला असतो हे सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ आहे. दिलेलं लग्नाचं वचन पाळलं गेलं तर सगळं आलबेल. आणि ‘ राजा-राणी सुखाने संसार करू लागले वगैरे’ अशी सुखांतिका. पण वचन देणाऱ्या पुरुषाकडून वचन पाळलं गेलं नाही तर ती फसवणूक बलात्काराचा गुन्हा ठरायची. याचाच आधार घेत आजवर अनेक स्त्रियांनी खोटं वचन देऊन फसवणाऱ्या पुरुषांना कोर्टात खेचलं आहे. सोबतच अशाही काही स्त्रिया आहेत की ज्यांनी प्रामाणिकपणे वचन देऊनही काही कारणाने ते न पाळू शकलेल्या पुरुषांच्या असहायतेचा गैरफायदा उचललेला आहे. त्यांना आयुष्यातून उठवण्याचंही काम केलं आहे.
 
पुरुष मुळातच चलाख असतो, लबाडी करतो आणि स्त्री भोळी दुधखुळी असे समजले जाते. पुरुषाच्या शारीरिक गरजा आणि स्त्रियांच्या मानसिक गरजा स्ट्राँग असतात असाही जेंडर स्टडी आहे. मनं जुळली की शरीरं एकत्र यायला फार वेळ लागत नाही. कित्येक रिलेशनशिपमध्ये एखादी स्त्री पुरुषाकडून लग्नाचं वचन घेते याचा अर्थ तिला एक प्रकारची मानसिक सुरक्षितता हवी असते तर पुरुष वचन देऊन तिच्या सहमतीने तिचं शरीर मिळवतो. हे दुसरं-तिसरं काही नसून दोघांमधलं डील आहे. यालाच गिव्ह अँड टेक पॉलिसी ही म्हणता येईल. 

हे डील एकाने मोडलं म्हणून तो गुन्हा. पण त्या डीलचा फायदा दुसऱ्यानेही घेतलेलाच असतोच की. एखादी स्त्री जेव्हा पुरुषावर लग्नाचं वचन देऊन बलात्कार केला असा आरोप करते तेव्हा ती लग्नाच्या वचनाच्या बदल्यात मी माझे शरीर दिले होते, अशी कबुलीच देत असते. पुरुषावर असा आरोप करून त्याला लग्नबंधनात अडकायला मजबूर करणं हासुद्धा स्त्रीचा पुरुषावर होणार बलात्कारच आहे. लग्न हा एकमेकांच्या सोबतीने सहजीवन सुरू करण्याचा आनंददायी प्रवास आहे. या प्रवासासाठी कायद्याचा बडगा उगारून कुणी कुणाचा हात त्याच्या इच्छेविरुद्ध हातात घेऊ शकत नाही.

लग्न ही एखाद्या स्त्रीसाठी आयुष्यभराच्या भाकरीची आणि निवाऱ्याची सोय असते, असाही समज/गैरसमज रूढ आहे. आर्थिकदृष्ट्या पुरुषावर अवलंबून असणाऱ्या स्त्रीच्या बाबतीत बहुतांशी खरं आहे. पुरुष लग्नाचं अामिष दाखवून, वचन देऊन तिला शरीरसंबंधांसाठी राजी करतो याचा छुपा अर्थ हा की तू मला तुझं शरीर दे, मी तुझ्या आयुष्यभराच्या अन्न- वस्त्र-निवाऱ्याची सोय करतो. शरीरविक्रेती स्त्री ( वेश्या)  पैसे घेऊन पुरुषाला काही वेळासाठी आपलं शरीर उपलब्ध करते. त्या पैशात ती तिच्या उदरनिर्वाहाची सोय करते. मग एखादी स्त्री पुरुषाकडून लग्नाचं वचन घेऊन त्याला स्वखुशीने आपलं शरीर देते तेव्हा ती याहून वेगळं काय करत असते. हे म्हणणं फार धाडसाचं असलं तरी खोटं नाही. आधी राजीखुशी शरीरसंबंधांना तयार होऊन महिनोन‌्महिने त्याचा आनंद उपभोगून नंतर त्या संबंधांना बलात्काराचं लेबल लावणाऱ्या स्त्रियांच्या उलट्या बोंबांची कोर्ट यापुढे दखल घेणार नाही. हे एकाअर्थी बरंच झालं असलं किंवा स्त्रियांकडून फेकल्या जाणाऱ्या या फासातून कित्येक प्रामाणिक पुरुषांचा गळा मोकळा झाला असला तरी कोर्टाच्या या निर्णयामुळे चतुर पुरुषांचं ‘चांगलंच फावणार’ आहे व इमोशनल फूल दुधखुळ्या स्त्रिया लबाड चतुर पुरुषांच्या हातातलं वापरून फेकून द्यायचं सेक्स टॉय होणार आहेत.
यापुढे स्त्रीला उपभोग्य वस्तू समजणाऱ्या लबाड पुरुषांना स्त्रियांच्या भावनिक कमजोरीचा फायदा घेणं, त्यांना लग्नाचं वचन देऊन त्यांच्या शरीराचा महिनोन‌्महिने बिनबोभाट उपभोग घेत राहणं, तिचा कंटाळा आला की दूर सारणं अधिक सोपं जाणार आहे. आणि मग स्त्रिया लग्नाचं वचन देऊन बलात्कार केला असा आरोपही पुरुषांवर करू शकणार नाहीत. स्त्रियांना एक तर ‘रात गई बात खतम’ या न्यायाने प्रॅक्टिकल वागावे लागेल, तुझ्याशी सेक्स केला म्हणजे तूच माझा सात जन्मीचा जोडीदार या भोळसट सनातन तत्त्वज्ञानाला तिलांजली द्यावी लागेल. नाही तर फक्त आपल्या शरीरातच रस असणाऱ्या पुरुषाच्या हाका सावधपणे ऐकाव्या लागतील, वेळीच शहाणे व्हावे लागेल.

आजची स्त्री शिक्षित आहे. आधुनिक विचारांची पुरस्कर्ती आहे. आपल्याला कोण फसवू शकतं, कोण नाही याचा सारासार विचार करण्याची कुवत तिच्या अंगी शिक्षणातून निर्माण होणं अपेक्षित आहे. पाश्चात्त्य जीवनपद्धतीचा अवलंब केलेली आजची भारतीय स्त्री कुणाच्या अामिषाला वा खोट्या वचनाला बळी पडण्याइतकी कमजोर आणि इमोशनल फूल होऊ नये. तिला आपलं मानसिक व शारीरिक भान कायम जागृत  ठेवता आलं पाहिजे. तिला सावज करून जाळ्यात पकडू पाहणाऱ्या कोणत्याही पुरुषाच्या आणाभाकांना, वचनांना बळी पडून आपला आत्मसन्मान पायदळी तुडवला जाणार नाही याची दक्षता तिने घेतली तर तिच्या प्रगतीसाठी ते अधिक श्रेयस्कर ठरेल.
 

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांनी सेल्स टॅक्समध्ये सहायक आयुक्त महिलेची याचिका या आधारावर फेटाळली आहे. या महिलेने सीआरपीएफमधील डेप्युटी कमांडंटवर लावलेले बलात्काराचे आरोपही दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने फेटाळले आहेत. परस्पर सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना म्हटलं आहे की,  या संबंधांमुळे पुढे काही साध्य होणार नाही, हे महिलेला माहीत असूनही तिने परस्पर सहमतीने शारीरिक संबंध ठेवले तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही.

लेखिकेचा संपर्क : ९९२३९००७२८

बातम्या आणखी आहेत...