आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कावड महोत्सवामुळे वाहतूक मार्गात बदल; पोलिस बंदोबस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - श्री राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे गांधीग्राम येथून कावड पालखी यात्रा काढली जाते. त्यामुळे सोमवारी वाहतूक मार्गात बदल केला आहे. या बदलाची नोंद वाहनधारक चालकांनी घ्यावी, असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखा पोलिसांनी केले.

 

अकोला ते अकोटकडे जाणारी वाहतूक, येणारी वाहतूक एसटी स्टँड अकोला ते भगतसिंग चौक, वाशीम बायपास ते शेगाव टी पॉइंट गायगावमार्गे निंबाफाटा ते देवरीमार्गे अकोट या मार्गाने वळती केली आहे. अकोटकडून येणारी वाहतूकही याच मार्गाने शहरात दाखल होईल. दर्यापूर ते आपातापा नाका रेल्वे स्टेशन चौक ते अकोल्यातील मध्यवर्ती बसस्थानक या मार्गावरील वाहतूक दर्यापूर खरप टी पॉइंट न्यू तापडियानगर, जठारपेठ चौक, रेल्वे स्टेशन चौक, टाँवर चौक ते मध्यवर्ती बसस्थानक या मार्गाने वळती केली आहे. हा बदल ३ सप्टेंबरच्या मध्य रात्रीपर्यंत लागू राहील. सदर पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी केले.

 

कावड यात्रेदरम्यान शोध आणि बचाव पथक राहणार सतर्क
गांधीग्राम येथून ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी २ सप्टेंबर रोजी कावड यात्रेचे आयोजन केले जाते. पूर्णा नदी येथे मोठया प्रमाणात शिवभक्त जमा होतात, त्याअनुषंगाने मागील दोन आठवडयापासुन या ठिकाणी शोध व बचाव पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने शोध व बचाव पथक, बोट, लाइफ जॅकेट, लाइफ बोया, सर्चलाईट, रोप इत्यादी बचाव साहीत्यासहीत उपस्थित राहणार आहे. या पथकामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सुनील कल्ले, प्रशांत सायरे, हरिहर निमकंडे , देवेंद्र तेलकर , अतुल वानखडे , सचिन चिकार , पी.एस.दामोदर, संत गाडगेबाबा आपत्कालिन पथकाचे दीपक सदाफळे, आपत्कालिन पथक ऊगव्याचे तुळशीदास फुकट, अतुल सनगाळे, संतनगरी आपत्कालिन पथकाचे निखिल पाठक, शाम देशमुख , शौर्य फाउडेशनचे अंकुश डोंगरे, अक्षय यन्नावार उपस्थित राहणार आहेत. अकोला तहसील अंतर्गत नायब तहसीलदार यांचे नेतृत्ववात मंडळ अधिकारी, तलाठी यांचे पथक गांधीग्राम तसेच अकोला शहरात नियुक्त करण्यात आले आहे.

 

'सीसीटीव्ही'चा मिरवणुकीवर वॉच
यात्रेनिमित्त जिल्हा पोलिस, अतिरिक्त जवानांची कुमक तैनात केली आहे. कावड मार्गावर सीसीटीव्हीची नजर राहील. तसेच कावड मार्गाचे व्हिडिओ शूटिंगही होणार आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षकांची शहरात उपस्थिती राहणार आहे. या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसेच भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, अशा सूचना पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

 


कावड यात्रेमुळे जनता दरबार रद्द
जिल्ह्यात ३ सप्टेंबरला कावड व पालखी यात्रा असल्याने पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी होणारी जनता तक्रार निवारण सभा रद्द केली. जनतेच्या तक्रार निवारणासाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या सोमवारी तक्रार निवारण सभा घेण्यात येते. सप्टेंबरच्या पहिल्या सोमवारी कावड यात्रा असते. यात्रा सुरळीत होण्यासाठी महसूल व पोलिस यंत्रणा या दरम्यान व्यस्त असते. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून हा जनता दरबार रद्द केला आहे. याची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...