आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेची निवडणूक पुन्हा जिंकू : केजरीवाल यांचा विश्वास; लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची दोन कारणे केली विशद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या सहकारी पक्षांकडून मोठा पराभव पत्करावा लागला असला तरीही विधानसभेच्या आगामी निवडणुकीत आम आदमी पक्ष पुन्हा विजय मिळवेल, असा विश्वास या पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. 
केजरीवाल यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्येच पक्षाला एका जागेवर विजय मिळाला. इतर ठिकाणी मात्र पक्षाला पराभव पत्करावा लागला. केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची दोन कारणे विशद केली आहेत. त्यांनी लिहिले की, सार्वत्रिक निवडणुकीत संपूर्ण देशात एक वातावरण होते. दिल्लीही त्यापासून दूर राहिली नाही. दुसरेे कारण म्हणजे मतदारांनी या ‘मोठ्या निवडणुकीला’ नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील लढाई मानली आणि त्याप्रमाणेच मतदान केले. या दोन कारणांमुळे पराभवाचे दुसरे कुठलेही कारण असले तरी मतदारांनी ‘आप’ला मते का द्यावी हे पटवून देण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाने केलेली अतुलनीय कामे लक्षात घेऊन मतदार मतदान करतील, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला. 
दिल्लीत पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे आवाहन केजरीवाल यांनी केले. त्यांनी या पत्रात दिल्ली सरकारच्या शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज, पेन्शनशी संबंधित योजना आणि ७० सरकारी सेवा थेट दारी उपलब्ध करून दिल्याचा तसेच अनधिकृत कॉलन्यांत नागरी सेवा उपलब्ध करून दिल्याचा उल्लेख केला आहे. त्याशिवाय पक्षाची भ्रष्टाचारमुक्त मोहीम तसेच दिल्लीत उपराज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात अधिकारांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासह सरकारच्या  इतर पावलांचाही उल्लेख केला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने सर्व राजकीय पंडितांचा अंदाज नाकारत विधानसभेच्या ७० जागांपैकी ६७ जागांवर विजय मिळवला होता.

बातम्या आणखी आहेत...