Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | kept wife in the house for seven years

संशयी वृत्तीमुळे पत्नीला ७ वर्षांपासून घरात कोंडून ठेवले, प्लायवूड ठोकून खिडक्या कायमच्या बंद

प्रतिनिधी | Update - Sep 07, 2018, 12:44 PM IST

संशयी वृत्तीमुळे पत्नीला ७ वर्षांपासून घरात कोंडून दररोज मारहाण करणाऱ्या पतीविरुद्ध शेजाऱ्यांनी महिला व बाल सहायक

 • kept wife in the house for seven years

  जळगाव- संशयी वृत्तीमुळे पत्नीला ७ वर्षांपासून घरात कोंडून दररोज मारहाण करणाऱ्या पतीविरुद्ध शेजाऱ्यांनी महिला व बाल सहायक कक्षाकडे तक्रारी अर्ज केला. त्याची दखल घेऊन कक्षातील महिला सदस्यांनी गुरुवारी एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने त्या तरुणास ताब्यात घेऊन तंबी दिली. नेहरूनगर परिसरातील ही घटना आहे.


  नेहरूनगरात ७ वर्षांपासून नीलेश प्रताप पाटील (वय ३७) हा पत्नीसाेबत राहताे. त्याला ५ वर्षांचा एक मुलगा व ४ वर्षांची एक मुलगी आहेत. ताे ७ वर्षांपासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्याने घरातील खिडक्या प्लायवूड ठोकून कायमच्या बंद केल्या आहेत. फटींमध्ये सिमेंट भरुन हवा येण्यासही जागा शिल्लक ठेवली नाही. पत्नी चुकून देखील घराबाहेर गेल्याचे समजल्यास तो अमानुषपणे मारहाण करीत असतो. त्यामुळे त्याची पत्नी मानसिक धक्क्यात तर मुले भयभीत आहेत. तीन दिवसांपूर्वी शेजारी राहणाऱ्या एकाने महिला व बाल सहायक कक्षाकडे लेखी अर्ज दिला. त्यानुसार महिला व बाल सहायक कक्षाच्या शोभा हंडोरे, विद्या सोनार व एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक अतुल वंजारी, मंदा बैसाने यांनी गुरुवारी दुपारी नेहरुनगरात नीलेश पाटीलला ताब्यात घेतले. त्याने आपण पत्नीस आधी मारहाण करीत होतो, आता काहीच करीत नाही, असे पोलिसांना सांगितले. दरम्यान, पोलिसांनी पती-पत्नी असे दोघांचे लेखी जबाब नोंदवून घेतले. पत्नी व मुलांना चांगली वागणूक देण्याची तंबी देऊन त्याला सोडून देण्यात अाले. आठवडाभरात घरी येऊन चौकशी करू, असे महिला व बाल सहायक कक्षातील सदस्यांनी सांगितले आहे. पाेलिस नीलेशला एमआयडीसी ठाण्यात घेऊन जाताना त्याने त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला.


  कपडे वाळवण्यासाठी स्वत: जाताे छतावर
  पत्नीने घराबाहेर निघू नये, यासाठी हा विकृती मनाेवृत्तीचा पती स्वत:च घराबाहेरील महिलांची कामे करतो. त्याच्या पत्नीने घरात कपडे धुतल्यानंतर ते वाळवण्यासाठी तो स्वत:च छतावर जातो. याशिवाय मुलांना आठवड्यातून एक-दोन दिवस स्वत:च घराबाहेर घेऊन जातो. परंतु, पत्नीस घराबाहेर पडूच देत नाही.


  वडिलांच्या स्वभावामुळे दोन्ही मुले भयभीत
  वडिलांच्या स्वभावामुळे दोन्ही मुले देखील भयभीत वातावरणात आहेत. यातील मुलगा हा शाळेत जातो तर मुलगी घरीच असते. घरात टीव्ही किंवा इतर मनोरंजनाची साधनेदेखील नसल्यामुळे पत्नी व दोघा मुलांसाठी कैदेच्या शिक्षेप्रमाणे वातावरण त्याने तयार केेले आहे.

Trending