आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण वाङ‌्मयात मोलाची भर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 केशव कुकडे

ग्रामीण परिसर, शेतकरी-शेतमजूर आणि कष्टकरी वर्गाचे चित्रण, बोलीभाषा, लोकांच्या समस्या, सुख-दुःख, व्यथा-वेदना अशा सर्वांचं प्रतिनिधित्व करणारा राजेंद्र गहाळ यांचा ‘पोशिंदा ’ हा कथासंग्रह.  संवादलेखनाची उत्तम जाण असणाऱ्या लेखकाच्या लेखनशैलीमुळे हा कथासंग्रह वाचनीय झाला आहे.


मराठवाड्यातील ग्रामीण बोली भाषेतील संवाद हे या संग्रहाचं वैशिष्ट्यं. लेखकाने अनुभवलेले ग्रामवास्तव, लोकांच्या समस्या, सुख-दुःख, व्यथा-वेदना  कथासंग्रहात आहेत. कथेतील पात्रांची बोलीभाषा ही औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण परिसरात बोलली जाणारी भाषा आहे. लेखकाच्या निवेदनाच्या भाषेवरही ग्रामीण बोलीभाषेचा प्रभाव जाणवतो. भूक, उपासमार, दारिद्र्य, गरिबी, बेरोजगारी, शैक्षणिक प्रश्नांना लेखकाने  त्यांच्या कथासंग्रहात स्थान दिले. राजेंद्र गहाळ यांचा कथासंग्रह ‘पोशिंदा’ शोषित वर्गाचे प्रतिनिधित्व करणारा आहे. शेतकरी, शेतमजुरांच्या जीवनाचे प्रभावी चित्रण मराठवाड्याच्या ग्रामीण बोलीभाषेतून केले आहे. राजेंद्र गहाळ यांच्या कथालेखनाने ग्रामीण कथा वाङ्मयात मोलाची भर पडली आहे.

‘पोशिंदा’ कथासंग्रहामधील ‘मळ्याची वाट’ या कथेत उदार मनाच्या दानशूर शेतमालकाचे चित्र रेखाटले आहे.‘सांजवेळ’ ही कथा आहे व्यसनाच्या आहारी जाऊन पत्नीशी भांडणाऱ्या, मारझोड करणाऱ्या ‘परसू’ शेतमजुराची. ‘जिव्हाळा’ ही शेतकऱ्यांची फसवणूक व लुबाडणूक करणाऱ्या सावकाराची आणि इमानदार मजुराची कथा. ‘हिस्सा’ ही संपत्तीसाठी भावाभावात होणाऱ्या वादाची तर “पोशिंदा’ कथेत जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यावर येणाऱ्या उपासमारीच्या विदारक परिस्थितीचे गांभीर्य मांडलं गेलंय. सोनामाय, परिवर्तन, उगवतं मावळतं, आधार, वाट, नियती, परतफेड या कथाही यात आहेत. कमीत कमी निवेदन आणि जास्तीत जास्त संवादयोजना यामुळे प्रत्येक कथेला नाट्यात्मकता आलीय. संवादलेखनाची उत्तम जाण राजेंद्र यांना असल्याचे दिसते.  कौटुंबिक हिंसाचार, अन्याय, अत्याचार आणि शोषणाला बळी पडणाऱ्या आणि त्याला प्रत्युत्तर देणाऱ्या सामान्य माणसाच्या जीवनाचे यथार्थ चित्रण या संग्रहातील कथांमध्ये येते. शोषितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम या कथांच्या माध्यमातून लेखकाने केले आहे.


या कथा मानवतेचा पुरस्कार करणाऱ्या आहेत. गावातील लोक, त्यांच्यातील दैनंदिन व्यवहार, सामाजिक, आर्थिक परिस्थितीचे जीवघेणे वास्तव या लघुकथांमध्ये आले आहे.  आर्थिक परिस्थिती ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या विकासाला मारक आहे. खेडेगावातील लोकांच्या शैक्षणिक मागासलेपणाचे मूळ कारणही त्यांचे दारिद्र्य हेच आहे. शारीरिक श्रम केल्याशिवाय दोन वेळच्या अन्नाची सोय होऊ शकत नसलेल्या सामान्य माणसाच्या जीवनाच्या कथा राजेंद्र यांनी त्यांच्या या कथासंग्रहातून मांडल्या आहेत. सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक रा. रं. बोराडे त्यांच्या अभिप्रायात म्हणतात, राजेंद्र यांच्या कथांमध्ये शोषणाचे संदर्भ येतात. हे संदर्भ वाचकांना अस्वस्थ करतात. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या परभणी या महानगरीय शहरात प्रदीर्घ वास्तव्यास राहूनही प्रभावीपणे ग्रामीण जीवनाचे चित्रण लेखकानं केलं आहे हेही  उल्लेखनीय आहे.

लेखकाचा संपर्क : ९८६०९८५९११