आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजीच्या गावची खिडकी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केतकी राऊत   खूप दिवसांनंतर नानीच्या (आजी) गावी आले. आजीचं गाव आपुलकी देणारं. आस्थेने आपली चौकशी करणारं. आजीच्या गावात मिळणारं प्रेम हे हवंहवसं असतं. नानीचं घर खून जुनं आहे. जुन्या पद्धतीची बांधणी असलेल्या घरात ऐसपैस हवा खेळत असते. याच घरात एक छान खिडकी आहे. या खिडकीची गंमत अशी की, तिथे बसल्यानंतर गावातील येणारा-जाणारा प्रत्येक जण दिसतो. ग्रामीण भागातील लोकांच्या वेगवेगळ्या लकबी, ढबी त्या खिडकीतून न्याहाळता येतात. या खिडकीचे विशेष म्हणजे खिडकीत बसलेल्या व्यक्तीला बाहेरील प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे पाहता येते, परंतु बाहेरच्याने आत डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याला अंधूकसे दिसते. त्यामुळे बघणारा बघणेच टाळतो. आम्ही सगळे भाऊ-बहीण लहान असताना त्या खिडकीमध्ये बसण्यासाठी नंबर लावत असायचो. एकदा का तिथे बसण्याचा आपला नंबर आला की, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लहान मुलांना आवाज देत असू. आवाज कानात पडला की, तो मुलगा कोण आवाज देतोय म्हणून इकडेतिकडे बघू लागायचा. त्याच्या त्या फजितीला बघून खूप हसू येत असे आणि आनंदही होत असे. दिवस उजाडल्यापासून खिडकीमध्ये बसायचे. तिथेच भातुकलीचा खेळ मांडायचा. खूप खूप मज्जा करत असायचो. आज आम्ही सर्व बहीण-भाऊ मोठे झालोत, परंतु आजीच्या गावी गेलो की, खिडकीमध्ये बसण्याचा मोह टाळत नाही. मात्र लहानपणीचा आवाज देण्याचा उपद्व्याप आता करता येत नाही ही खंत वाटते. पुन्हा बालपणाने फिरून यावे असे सारखे वाटते. कारण लहानपण खूप छान असते, ‘लहानपण दे गा देवा  मुंगी साखरेचा रवा..’

बातम्या आणखी आहेत...