आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Khadse's 'different Thinking'; Talks With Sharad Pawar In Delhi, Might To Leave BJP Soon, Political News And Updates

खडसेंचा ‘वेगळा विचार’;दिल्लीत शरद पवारांशी ३० मिनिटे बंदद्वार चर्चा, पवारांच्या सल्ल्याने आज उद्धव ठाकरेंना भेटणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पक्षात मिळणारी दुय्यम वागणूक व भाजपमधील लोकांकडून मुलीचा झालेला पराभवामुळे खडसे नाराज

नवी दिल्ली- भाजपवर नाराज असलेले ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी नवी दिल्लीत जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे ३० मिनिटे बंद द्वार चर्चा झाली.पक्षात मिळणारी दुय्यम वागणूक व भाजपमधील लोकांकडून मुलीचा झालेला पराभव याबाबत खडसेंनी पवारांकडे मन मोकळे केले. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी ‘पुढील’ चर्चा करण्याचा सल्ला पवारांनी खडसेंना दिला, त्यानुसार खडसे मंगळवारी ठाकरेंना भेटणार आहेत. खरे तर भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या भेटीसाठी खडसे दिल्लीत गेल्याची चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात स्वपक्षीय एकाही नेत्याला न भेटताच ते परतले. पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले, ‘जळगावातील  पाण्याची योजना केंद्रीय जल आयोगाकडे रखडली होती, त्याला आजच मान्यता मिळाली. परंतु केंद्राची मंजुरी अद्याप बाकी आहे.


त्यामुळे आपण पवारांची भेट घेतली.  त्यांनी मला रोहिणीचा पराभव कसा झाला, हे विचारले. त्यावर मी वास्तवाची माहिती दिली,’ एवढेच उत्तर खडसेंनी दिले. मात्र प्रत्यक्षात गेल्या चार वर्षांपासून पक्षात अडगळीत पडलेल्या खडसेंचे भाजपात मन रमत नसल्याची चिन्हे आहेत. ‘अोबीसी नेत्यांवर पक्षात अन्याय होत असून, आता वेगळा विचार करावा लागेल,’ असे संकेत खडसेंनी यापूर्वीच दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून खडसेंनी पवारांची भेट घेतल्याचे मानले जाते. मंगळवारी खडसे व उद्धव ठाकरेंची भेट होणार आहे. त्यानंतर पवार व ठाकरे यांच्यात चर्चा होऊन खडसेंबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नाराज पंकजा मुंडेंची भाजपच्या बैठकीकडे पाठ


विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून माजी मंत्री पंकजा मुंडेंही भाजपवर नाराज आहेत. १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावर कार्यक्रम घेऊन ‘पुढील भूमिका’ स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. सोमवारी आैरंगाबादेत आयोजित भाजपच्या मराठवाडास्तरीय बैठकीकडेही पंकजांनी पाठ फिरवली. त्यामुळे पंकजाही बंडाच्या पवित्र्यात असल्याची चर्चा अधिक रंगली. मात्र ‘प्रकृतीच्या कारणामुळे त्या बैठकीला येऊ शकल्या नाहीत,’ असे स्पष्टीकरण देत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सारवासारव केली. दरम्यान, तिकीट कापलेले भाजप नेते प्रकाश मेहता यांनी सकाळी मुंबईत पंकजांची भेट घेऊन चर्चा केली. यापूर्वी पक्षातील नाराज खडसे, विनोद तावडे, राम शिंदे हेही नेते पंकजांना भेटले होते.