Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Khaki uniform stolen of police employee

आधी गंडवले गेले सहा लाखांना; आता खाकी वर्दीही पळवली; शेवगाव पोलिस ठाण्यातील प्रकार

प्रतिनिधी | Update - Aug 14, 2018, 11:46 AM IST

आमदार विनायक मेटे यांच्या नावाने शेवगाव पोलिस ठाण्याच्या निरीक्षकालाच सहा लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार रविवारी उघडकीस

 • Khaki uniform stolen of police employee

  नगर- आमदार विनायक मेटे यांच्या नावाने शेवगाव पोलिस ठाण्याच्या निरीक्षकालाच सहा लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. या घटनेची चर्चा थांबत नाही, तोच याच अधिकाऱ्याची चक्क खाकी वर्दी चोरीला गेल्याचे समोर आले. त्यामुळे जिल्ह्यातील खाकी वर्दीची अब्रूच चव्हाट्यावर आली.


  घरातून ६२५ रुपये िकमतीची खाकी वर्दी बूट व कॅपसह चोरीला गेल्याची फिर्याद निरीक्षक गोविंद ओमासे यांनी स्वत: रविवारी आपल्याच पोलिस ठाण्यात दिली. त्यापूर्वी काही तास अगोदरच आपली ६ लाख २० हजारांची फसवणूक झाल्याची फिर्याद त्यांनी दिली होती. "सद्् रक्षणाय खल निग्रहणाय'भूमिका बजावणाऱ्या पोलिसांच्या खाकी वर्दीवरच गुन्हेगारांनी हात टाकल्याने खळबळ उडाली. पोलिसांचे पिस्तूल चोरीला जाण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी याच पोलिस ठाण्यात घडला होता.


  शेवगाव पोलिस ठाण्याचा पदभार घेतल्यापासूनच ओमासे वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहेत. आमदार मेटे यांच्या नावाने त्यांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला. फोनवर मेटे यांचा हुबेहूब आवाज काढत शिवसंग्राम संघटनेच्या तालुकाध्यक्षाने त्यांच्याकडून ६ लाख २० हजार रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ओमासे यांनी दोघांच्या विराेधात फिर्याद दिली. त्याचा तपास सुरू होत नाही, तोच ओमासेंची वर्दी चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. शेवगाव येथील विठ्ठल बडे यांच्या बंगल्यात ओमासे भाड्याने राहातात. रविवारी सकाळी ७ च्या सुमारास त्यांच्या घरातील कपाटात, तसेच अन्यत्र असलेले दोन खाकी ड्रेस, कॅप व लालरंगाचे बूट चोरट्यांनी पळवल्याचे ओमासे यांच्या निदर्शनास अाले. तपास हेड काॅन्स्टेबल नानासाहेब गर्जे करत आहेत.


  पोलिस निरीक्षक आेमासे यांचीही चौकशी करणार
  निरीक्षक ओमासे यांच्या फसवणुकीबाबत दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. वर्दी चोरीप्रकरणी ओमासे यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे.
  - रंजनकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक.

Trending