आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप पिकांना अस्मानी संकटाचा फटका; राज्यात 39% क्षेत्रावरील पीक हातचे गेले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • १३९ लाखपैकी ५४.२२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
  • मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आढावा

​​​​​​मुंबई : अवकाळी पावसाने राज्यात धुमाकूळ घातल्याने शेतकरी त्रस्त झाले अाहेत. राज्यातील ३२५ तालुक्यांना या पावसाचा फटका बसला असून १३९.८८ लाख हेक्टरपैकी तब्बल ५४ लाख २२ हजार म्हणजे ३८.९४ टक्के क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. सर्वाधिक २२ लाख हेक्टर शेतीचे नुकसान मराठवाड्यात, तर नाशिक विभागात १६ लाख हेक्टरवरील पिकांना फटका बसला. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे अादेश दिले अाहेत. सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले अाहेत.


अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व शासनाच्या उपाययोजनांचा आढावा फडणवीस यांनी 'वर्षा'वर बैठकीत घेतला. नुकसानीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची शनिवारी बैठक बोलावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून पीक परिस्थितीची माहिती घेतली. नुकसानीची स्थानिक शेतकऱ्यांनी काढलेली छायाचित्रेसुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

भरपावसात शरद पवारांची नाशिक जिल्ह्यात पाहणी

प्रत्येकाची समस्या ऐकून घ्या, ड्रोनने सर्वेक्षण करा
मुख्यमंत्री म्हणाले, या वर्षी प्रचंड पाऊस झाला आहे. अरबी समुद्रातील सुपरसायक्लॉनसह चार वादळांचा फटका बसल., या पावसाची तीव्रता ऑक्टोबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात अधिक होती. त्यामुळे प्रशासनाने ही संपूर्ण स्थिती अत्यंत संवेदनशीलतेने आणि प्राधान्य देत हाताळावी, प्रत्येक शेतकऱ्याची समस्या ऐकून घ्यावी. यासाठी दुष्काळाच्या काळात उभारली तशी यंत्रणा उभारावी. व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकसुद्धा संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात यावेत. शासनाचे या स्थितीवर संपूर्णपणे लक्ष असून, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन स्थितीचे अवलोकन करावे. ज्वारी, मका, धान, तूर, कपाशी, सोयाबीन आणि फळपिके यामुळे बाधित झाली आहेत. प्रभावित भागाचे तत्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

शेतकरी उद‌्ध्वस्त हाेताना राज्यात सत्तेसाठी पोरखेळ सुरू आहे : पवार
नाशिक : अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यात द्राक्षबागांसह खरीप पिकांचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले. माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील विविध भागांना भरपावसात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. 'अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झालेले अाहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी सक्षम सरकारची गरज असताना राज्यात सत्ता स्थापनेबाबत पोरखेळ सुरू अाहे,' अशी टीका पवारांनी भाजप-शिवसेनेवर केली. पत्रकार परिषदेत पवारांसमाेर अापली व्यथा मांडताना एका शेतकऱ्याला अश्रू अावरणे कठीण झाले हाेते. उपस्थित कार्यकर्त्यांनी त्याला धीर देत शांत केले.

मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान
कोकण (४६ तालुके, ९७ हजार हेक्टर), नाशिक (५२ तालुके, १६ लाख हेक्टर), पुणे (५१ तालुके, १.३६ लाख हेक्टरहून अधिक), औरंगाबाद (७२ तालुके, २२ लाख हेक्टर), अमरावती (५६ तालुके, १२ लाख हेक्टर), नागपूर (४८ तालुके, ४० हजार हेक्टर) नुकसान झाले.

साेयाबीन, कपाशीला माेठा फटका
राज्यात साधारणत: ५३ हजार हेक्टरवर फळपिके, १ लाख ४४ हजार हेक्टरवर भात, २ लाख हेक्टरवर ज्वारी, २ लाख हेक्टरवर बाजरी, ५ लाख हेक्टरवर मका, १९ लाख हेक्टरवर सोयाबीन आणि सुमारे १९ लाख हेक्टरवरील कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे.

अरबी समुद्रात 'महा' वादळ, राज्यात पावसाची शक्यता
औरंगाबाद : 'क्यार' चक्रीवादळ अोमानकडे सरकल्यानंतर अरबी समुद्रात अाणखी एक 'महा' नावाचे वादळ अाले अाहे. याचा प्रभाव सहा नोव्हेंबरपर्यंत राहण्याचा अंदाज अाहे. आयएमडीनुसार, २ ते ६ नोव्हेंबर या काळात मराठवाडा मध्य महाराष्ट्र व विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता अाहे.
 

बातम्या आणखी आहेत...