आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिणाम : जूनअखेरपर्यंत ४.९१ टक्के क्षेत्रावरच खरिपाची पेरणी; गेल्या वर्षीपेक्षा ३४.७ टक्क्यांनी कमी पर्जन्यमानाचा परिणाम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राज्यात काही ठिकाणी अधिक तर काही ठिकाणी कमी पाऊस झाला आहे. परिणामी खरीप हंगामात ८५ टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरण्या झाल्या नाहीत. गेल्या वर्षी जून महिन्याच्या एकूण पर्जन्यमानाच्या ३४.७ टक्क्यांनी यंदा कमी पाऊस आहे. त्यामुळे राज्यात एकूण १४०.७४ लाख हेक्टर पैकी फक्त ७.३६ लाख हेक्टर ४.९१ टक्के क्षेत्रावर खरीप हंगामाच्या पेरण्या उरकल्या आहेत. गेल्या वर्षी जूनअखेर राज्यात ३९ लाख ८८ हजार ३२२ हेक्टर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. सध्या फक्त ७ लाख ३५ हजार ७२२ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जूनअखेर राज्यात १ लाख हेक्टर उसाची नव्याने लागवड झाली आहे. पावसाची उशिरा सुरुवात झाल्याने अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत, तर जुलै महिना उजाडल्यावर राज्यात पावसाला सुरुवात झाल्याने वाफसा होण्याची शेतकरी वाट पाहत आहेत. 


जून महिन्यात पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत राज्यातील ठाणे, सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. त्यापाठोपाठ  पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, औरंगाबाद, जालना व बुलडाणा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पाऊस झाला. त्याखालोखाल उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये पावसाची सरासरी ५० ते ७५ टक्केच राहिल्याने पेरण्यांनी अजूनही वेग घेतला नाही. गेल्या वर्षाच्या तुलनेत राज्यात खरिपाच्या पेरण्या ८२ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. गेल्या वर्षी जूनअखेर राज्यात ३९ लाख ८८ हजार ३२२ हेक्टर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. सध्या फक्त ७ लाख ३५ हजार ७२२ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ऊस, कापूस या नगदी पिकांची लागवड व पेरणी फार कमी आहे. 

 

गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये केवळ २८ टक्के कापसाची लागवड
कापसाचे आगार समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात गेल्या वर्षी मान्सूनच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस न पडल्याने कापूस गेल्या वर्षीच्या १६ लाख ५७ हजार २३८ हेक्टरच्या तुलनेत यंदा फक्त ४ लाख ५६ हजार ४६१ हेक्टर सर्वसाधारण २८ टक्के क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे. ज्वारीची फक्त ९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी बाजरी ५७ हजार ४०५ हेक्टर होती. यंदा जून महिन्यात फक्त ४ हजार ३७ हेक्टर क्षेत्रावर बाजरी पेरली गेली. 
 

बातम्या आणखी आहेत...