आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Khelo India: 6500 Players Will Compete For The Medal In 18 Different Sports

खेलो इंडिया- 11 दिवस विविध 18 खेळांमध्ये तब्बल 6500 अधिक खेळाडू पदकासाठी झूंज देणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- चांगला खेळ करत आपल्या राज्यासाठी पदक मिळवण्याची जिद्द...त्यासाठी गेल्या कित्येक महिन्यांचा केलेला सराव...अन् हजारो किलाेमीटरचा प्रवास करत देशभरातून दा़खल झालेल्या युवा खेळाडूंच्या रूपातून जणू पुण्यातील बालेवाडीच्या क्रीडा नगरीला  युवा खेळाडूंच्या कुंभमेळ्याचेच स्वरूप प्राप्त झाले. कुंभरूपी भरलेल्या या खेळनगरीत पुढील ११ दिवस विविध प्रकारच्या १८ खेळांमध्ये तब्बल ६५०० अधिक खेळाडू पदकासाठी मैदानात उतरणार आहेत.

 

देशातील युवा खेळाडूंना व्यासपीठ मिळावे तसेच २०२० ऑलिम्पिकच्या तयारीच्या दृष्टीने केंद्र सरकार व राज्य शासनाच्या वतीने पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन बुधवारी दि. ९ करण्यात आले आहे. मेघालय, पश्चिम बंगाल, ओडिशा, पुद्दुचेरी, आसाम, तेलंगण आणि हरियाणा यासह देशभरातील ३६ राज्यांच्या  संघांचे खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी, कर्मचारी, पालक  पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरीत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे हजारो किलाेमीटरचा प्रवास केल्यानंतरही खेळाडू या स्पर्धेत उत्साहात सहभागी होत पदक पटकावण्याच्या दृष्टीने खेळाडूंनी आपल्या सरावाला सुरुवात देखील केली आहे. स्पर्धेसाठी आलेल्या विविध राज्यातील आलेल्या खेळाडूंच्या माध्यमातून विविधतेत एकात्मतेचे रूप खेलाे इंडियाचा माध्यमातून या ठिकाणी असलेले प्रत्येक जण अनुभवत आहे.  


१ हजार चॅम्पियनला सलग ८ वर्षांसाठी दरवर्षी ५ लाख
 ‘खेलो इंडिया २०१९’ या दुसऱ्या राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरीत मुख्यमंत्री आणि केंद्रीय क्रीडामंत्री, ऑलिम्पिक पदक विजेते कर्नल राज्यवर्धन राठोड यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी राठोड म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. देशातील सुमारे दहा हजार खेळाडू यंदाच्या ‘खेलो इंडिया २०१९’मध्ये सहभागी झाले आहेत. यातल्या १ हजार विजेता खेळाडूंना दर वर्षाला ५ लाख रुपये सलग ८ वर्षांसाठी देण्यात येईल.’

 

उद्घाटनानंतर क्रीडामंत्री राठोड म्हणाले, पुढचे दहा दिवस ‘खेलो इंडिया’चे लाइव्ह प्रक्षेपण होणार आहे. तुमचा खेळ देश पाहणार आहे. शालेय स्पर्धेत यापूर्वी असे कधी घडले नव्हते. चॅम्पियन बना. उद्याचे ऑलिम्पिक विजेते तुमच्यातूनच घडतील. तुमचा खेळ पाहून गावोगावचे लाखो खेळाडू प्रेरणा मिळले. जीवतोड खेळ करा,’ या शब्दात राठोड यांनी खेळाडूंना प्रेरित केले. प्रसिद्ध अभिनेते अमिताभ यांच्या आवाजातील स्फूर्तिदायक निवेदनाला खेळाडूंनी प्रतिसाद दिला. सोहळ्यात विविध कला-क्रीडा आविष्कारांनी खेळाडूंचे चांगलेच मनोरंजन केले.

 

श्रेया भंगाळेने जिंकले रौप्य;  क्रिशा छेडाला कांस्यपदक

 शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत गुरुवारी जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या श्रेया भंगाळेने रौप्यपदक आणि क्रिशा छेडाने शानदार प्रदर्शन करत कांस्यपदक आपल्या नावे केले. या १७ वर्षांखालील गटात जम्मू-काश्मीरच्या बाललीन कौर हिने सुवर्णपदक जिंकले. फायनलमध्ये बावलीनने ४३.४० गुणांची कमाई करत सोनेरी यश मिळवले. ठाण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रेयाने सर्वसाधारण अॅपरेट्स प्रकारात ३९.७० गुणांसह रौप्य जिंकले. मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या क्रिशने कांस्यपदक मिळवले. या दोन्ही खेळाडूंमध्ये महाराष्ट्राने गुरुवारी दोन पदके आपल्या खात्यात जमा केली. श्रेयाने पदक जिंकल्यावर म्हटले की, ही माझी पहिली खेलो इंडिया स्पर्धा असल्यामुळे मला पदकाचा आनंद आहे. येथील वातावरण पाहून मी भारावले.
 
उत्तेजकांचे उच्चाटन करण्यासाठी खेळाडू व प्रशिक्षकांना केले सतर्क 
कामगिरी उंचावण्यासाठी उत्तेजक सेवन करणे हा क्रीडा क्षेत्रासाठी काळिमा आहे. त्यामुळेच उत्तेजकांचे मुळापासून उच्चाटन करण्यासाठी खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन  राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्था (नाडा) चे सरसंचालक नवीन अगरवाल यांनी केले. बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत  खेलो इंडियात सहभागी झालेल्या खेळाडू व प्रशिक्षकांसाठी अगरवाल यांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन बुधवारी दि. ९ करण्यात आले होते. या वेळी अगरवाल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,  या स्पर्धेतही  खेळाडूंची उत्तेजक तपासणी केली जाणार आहे.यश मिळवण्यासाठी अनेक खेळाडू उत्तेजकाचा मार्ग स्वीकारतात. मात्र, त्यामध्ये ते दोषी आढळल्यानंतर खेळाडूंवर कठोर कारवाई होते. 
 
अॅप पहिल्याच दिवशी बंद
खेलाे इंडियासाठी देशभरातून येणाऱ्या हजारो खेळाडूंना एका क्लिकवर सर्व माहिती मिळावी, विविध स्पर्धेचे निकाल समजावेत यासाठी मोठा गाजावाजा करत खेेलो इंडिया अॅपची निर्मिती करण्यात आली. मात्र या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी या अॅपकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने बुधवारी अॅपवर स्पर्धेचे कोणतेही अपडेट न झाल्याने खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. बालेवाडी येथे होत असलेल्या खेलो इंडिया या स्पर्धेसाठी देशातील ३६ राज्यांतील तब्बल ६५०० हून अधिक खेळाडू, प्रशिक्षक, टीम मॅनेजर सहभागी झाले आहेत. 
 
नरेंद्र मोदींचा संदेश :

‘ग्रामीण आणि छोट्या गावांमधल्या खेळाडूंना पुढे आणण्यासाठी ‘खेलो इंडिया’ हा उपक्रम आहे. खेळ केवळ मनोरंजन व तंदुरुस्तीपुरता उरला नसून ते ‘करिअर’चे साधन बनले आहे. हा उद्योग बनला आहे. खेळाडूंनी  देशाला ‘स्पोर्टिंग पॉवर’ बनवावे. खेळाडू व पालकांना शुभेच्छा,’ असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवला.

 

बातम्या आणखी आहेत...