आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Khot Shetty Amnasam Accused Of Cheating Farmers Of Rs 500 Crore Due To Kadaknath

कडकनाथमुळे खोत-शेट्टी आमनेसामने, राज्यभरातील शेतकऱ्यांची 500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत पुन्हा समोरा-समोर आले आहेत. त्याच कारण बनली आहे कडकनाथ कोंबडी. कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाच्या आमिष दाखवून महारयत अॅग्रो या कंपनीकडून राज्यभरातील शेतकऱ्यांची 500 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ही कंपनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नातेवाईकांची असल्याचे बोलले जात आहे. यावरूनच आता दोघांमध्ये कलगीतुरा रंगला असून हा वाद आता एकमेकांच्या खाण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे.

महारयत अॅग्रो कंपनीने कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय करण्यासाठी राज्यभरातील शेतकरी आणि बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपये घेतले. मात्र अवघ्या दोन वर्षांतच कंपनीने आपली प्रमुख कार्यालये बंद केल्याने गुंतवणूकदार अडचणीत आले आहेत. कंपनीकडून राज्यभरात पाचशे कोटीहून अधिक फसवणूक झाल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे या कंपनीचे प्रमुख सदाभाऊ खोत यांच्या जवळचे नातेवाईक असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत राजू शेट्टी यांनी संबंधितांवर कारवाईची मागणी कोल्हापूरची पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे केली.

कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखवल्याने या गैरव्यवहाराला राजकीय आश्रय असल्याचा गंभीर आरोपही राजू शेट्टींनी केला. यावरूनच बोलताना त्यांनी सदाभाऊ खोत यांचा 'कोंबडी चोर' असा उल्लेख केला होता. याला प्रत्युत्तर देताना सदाभाऊ खोत यांनी महारयत अॅग्रोचे प्रमुख आपले नातेवाईक असल्याचे सिद्ध करावे, असे आव्हानही शेट्टी यांना दिले. यावरच ते थांबले नाही, तर राजू शेट्टी यांना चिकन आवडते असे सांगतानाच, तसे पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावाही त्यांनी केला. शेट्टी हे अक्कलशून्य असल्याची बोचरी टीका करत त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचेही ते म्हणाले.

निवडणुकीच्या तोंडावर सदाभाऊ खोत यांच्यावर आरोप करण्याची संधी शेट्टींना मिळाली आहे, ते ही संधी कशी गमवणार. सदाभाऊ खोतही त्याला त्यांच्याच स्टाईलने प्रत्युत्तर देत आहेत. कडकनाथ कोंबडीवरून सुरू झालेले हे वाकयुद्ध दिवसेंदिवस खालच्या पातळीवर जात असल्याचे चित्र आहे. 

बातम्या आणखी आहेत...