आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे कुटुंबीयांची खोतकरांनी घेतली भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहणानंतर अचानक माजी सनदी अधिकारी व खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे मेव्हणे श्यामसुंदर शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. या वेळी श्यामसुंदर शिंदे मात्र घरी नव्हते. 
श्यामसुंदर शिंदे यांना निवृत्तीनंतर विधान सभेचे वेध लागले आहेत. या पूर्वी विधान परिषदेत अपयश आल्याने आता त्यांनी विधान सभेची तयारी सुरू केली. मेव्हणे प्रताप पाटील चिखलीकर खासदार असल्याने भाजपची उमेदवारी त्यांना मिळणे अवघड जाणार नाही, असा त्यांचा कयास होता. तथापि प्रताप पाटील चिखलीकर यांचे पूत्र प्रवीण पाटील व मुलगी प्रणिता उमेदवारीसाठी पुढे आल्याने खासदारांचा ओढा कन्या व पुत्राकडे अधिक आहे. त्यातून श्यामसुंदर शिंदे व प्रताप पाटील यांच्यात थोडा कडवटपणाही आला आहे. श्यामसुंदर शिंदे राजकीय उमेदवारी मिळावी यासाठी मुंबईत तळ ठोकून आहेत. या पार्श्वभूमीवर अर्जुन खोतकर यांनी कोणताही पूर्व नियोजित कार्यक्रम नसताना अचानक शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी शिंदे यांच्या पत्नी आशाताई व मुलगा विक्रांत यांनी त्यांचे स्वागत केले. 

भाजप-सेना युतीत लोहा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. केवळ याच कारणामुळे प्रताप पाटील चिखलीकर यांनी काँग्रेस सोडताना शिवसेनेला पसंती दिली. शिवसेनेच्या उमेदवारीवर ते लोहा येथून आमदार म्हणून विजयीही झाले. परंतु त्यांना शिवसेना फारसी भावली नाही. त्यांनी भाजपशी संधान बांधले. शिवसेनेचे आमदार असतानाही प्रताप पाटील सेनेच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहत व भाजपच्या कार्यक्रमाचे मात्र सूत्रधार राहत हे चित्र अनेक वेळा दिसून आले. आता प्रताप पाटील भाजपचे खासदार आहेत. त्यामुळे लोहा मतदार संघातील जागा रिक्त झाली. या जागेवर आपली वर्णी लागावी अशी श्यामसुंदर शिंदे यांची इच्छा आहे. सेना भाजप युती झाली नाही, भाजपची उमेदवारी मिळाली नाही तर श्यामसुंदर शिंदे यांना सेनेतर्फे उमेदवारी दिली जाईल, असे संकेत अर्जुन खोतकर यांच्या भेटीमागे काढले जात आहेत. श्यामसुंदर शिंदे यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीत अपक्ष लढण्यापेक्षा राजकीय पक्षाचे पाठबळ पाठीशी असावे असे वाटत असल्याने ते उमेदवारी मिळवण्यासाठी निकराचे प्रयत्न करीत आहेत. त्यादृष्टीने अर्जुन खोतकर यांनी शिंदे कुटुंबीयांची भेट घेण्याला राजकीयदृष्ट्या महत्व आले आहे. परंतु खोतकर व शिंदे कुटुंबीयात काय चर्चा झाली याचा तपशील मात्र मिळू शकला नाही.