गौरी लंकेश यांच्या / गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांचे औरंगाबादच्या अणदुरेशी संबंध; सीबीआयचा दावा, कोठडीत ३० ऑगस्टपर्यंत वाढ

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येचा गुंता उकलण्यासाठी झालेल्या नवीन अटकसत्रात पकडलेला औरंगाबादचा सचिन अणदुरे याचे संबंध कर्नाटकात गौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपींशी असल्याचा दावा सीबीआय वकिलांनी रविवारी कोर्टात केला. गौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपीनेच देशी बनावटीचे एक पिस्तूल व तीन गोळ्या अणदुरेला दिल्याचे तपासात उघड झाले असल्याचे सीबीआयचे म्हणणे असून हा युक्तिवाद मान्य करत कोर्टाने रविवारी सचिनची कोठडी ३० ऑगस्टपर्यंत वाढवली.

Aug 27,2018 09:53:00 AM IST

पुणे- डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येचा गुंता उकलण्यासाठी झालेल्या नवीन अटकसत्रात पकडलेला औरंगाबादचा सचिन अणदुरे याचे संबंध कर्नाटकात गौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपींशी असल्याचा दावा सीबीआय वकिलांनी रविवारी कोर्टात केला. गौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपीनेच देशी बनावटीचे एक पिस्तूल व तीन गोळ्या अणदुरेला दिल्याचे तपासात उघड झाले असल्याचे सीबीआयचे म्हणणे असून हा युक्तिवाद मान्य करत कोर्टाने रविवारी सचिनची कोठडी ३० ऑगस्टपर्यंत वाढवली.


कोर्टासमोर बांधली राखी
कोठडीत मारहाण झाली का, अशी विचारणा कोर्टाने केली तेव्हा त्याने 'नाही' असे उत्तर दिले. दरम्यान, अणदुरेच्या नात्यातील एका महिलेने न्यायालयाच्या परवानगीने कोर्टासमोर सचिनला राखी बांधली.


समोरासमोर आणून सखोल चौकशीनंतरच स्पष्ट होईल खरे मारेकरी कोण?
सारंग अकोलकर व विनय पवार यांनी डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या या अंतिम निष्कर्षाला आम्ही पोचलो नव्हतो. हत्येच्या प्रत्यक्ष साक्षीदारांनी केलेल्या वर्णनानुसार काढलेली रेखाचित्रे व अकोलकर-पवार यांच्या छायाचित्रांमध्ये साधर्म्य आहे. यास हत्येच्या साक्षीदारांनी दुजोरा दिल्याचे आम्ही म्हटले आहे. रेखाचित्रे व छायाचित्रे यातील अचुकता ५०-६० टक्केच असू शकते. मात्र अणदुरेचे वकील दिशाभूल करू पाहत आहेत, असे 'सीबीआय'च्या वरिष्ठ तपास अधिकाऱ्याने 'दिव्य मराठी'ला सांगितले. अणदुरेला पकडल्यानंतर पूर्वीच्या आरोपींना क्लीन चिट देणार का, असा प्रश्न अणदुरेच्या वकिलांनी उपस्थित केला होता. याबाबत विचारले तेव्हा, आरोपींची समोरासमोर चौकशी केल्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील, असे ते म्हणाले.


औरंगाबादच्या सचिन अणदुरे याला गौरी लंकेश हत्येतील आरोपीने दिले पिस्तूल : सीबीआयचे वकील विजयकुमार ढाकणे यांचा युक्तिवाद
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपींचा डॉ. दाभोलकर हत्येशी संबंध आहे. त्यामुळे गौरी यांच्या मारेकऱ्यांचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. दाभोलकर हत्येप्रकरणी ताब्यात असलेल्या शरद कळसकर आणि अणदुरे यांची एकत्रित चौकशी करायची आहे. त्यामुळे अणदुरेच्या पोलिस कोठडीत वाढ करावी.

दरवर्षी २० ऑगस्टला नवी थेअरी मांडून सीबीआयकडून दिशाभूल : अणदुरेच्या वकिलांचा न्यायालयात आक्रमक पवित्रा
सुनावणीदरम्यान सचिन अणदुरेची बाजू मांडणाऱ्या अॅड. प्रकाश साळशिंगीकर यांनी आक्रमक होत सीबीआयवर हल्ला चढवला. दुसऱ्या कुठल्या तरी हत्येच्या तपासातल्या आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे सीबीआय थेट निष्कर्षावर येतआहे. गेल्या आठ दिवसाच्या पोलिस कोठडीत अणदुरेकडून काय माहिती मिळाली याची एकही ओळ त्यांना सादर करता आलेली नाही, असे अणदुरेच्या वकिलांनी न्यायालयास सांगितले. सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या. त्यावेळी काढलेल्या संशयितांची रेखाचित्रे या दोघांशी जुळतात, असे सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले होते. तत्पूर्वी नागोरी-खंडेलवाल यांनी गोळ्या झाडल्याचे सीबीआयचे म्हणणे होते.


गौरी लंकेश हत्येतील एका आरोपीने ७.६५ मिलीमिटर कॅलिबरचे देशी पिस्तुल व ३ गोळ्या अणदुरेला दिल्या. अणदुरेने ११ ऑगस्टला पिस्तुल, ३ गोळ्या व मॅगेझीन त्याच्या औरंगाबादेतील मेहुणा शुभम सुरळे याच्याकडे दिले. हे समजल्यानंतर सीबीआयने सुरळे याच्या औरंगाबादेतील घराची झडती घेतली. परंतु, सीबीआयने अणदुरेला पकडल्याचे कळताच सुरळेने हे पिस्तुल, ३ गोळ्या आणि मॅगेझीन रोहित राजेश रेगे या मित्राकडे दिले. सीबीआयने रेगेच्या घरी (विघ्नहर्ता बिल्डींग, श्रीमंत गल्ली, औरंगाबाद) छापा मारून पिस्तुल जप्त केले.

X