Home | International | Other Country | Kim Un-Putin will be visiting for the first time

किम उन -पुतीन यांची पहिल्यांदाच होणार भेट, या भेटीबाबत जगभरात उत्सुकता

वृत्तसंस्था | Update - Apr 24, 2019, 11:29 AM IST

उत्तर कोरियाने बैठकीच्या वृत्ताला दिला दुजोरा

  • Kim Un-Putin will be visiting for the first time

    प्योगाँग - उत्तर कोरियाचे प्रमुख किम जाँग उन लवकरच व्लादिमीर पुतीन यांच्या भेटीसाठी रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या वृत्ताला उत्तर कोरियाने दुजोरा दिला आहे. भेटीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. उभय नेत्यांची ही पहिलीच भेट असून त्यांच्यात नक्की काय शिजतेय याकडे आता जगाचे लक्ष लागले आहे.


    दोन्ही नेत्यांची रशियाच्या पूर्वेकडील व्लादिवोस्तोक बंदरावर ही ऐतिहासिक भेट होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. एवढेच नव्हे, तर ही भेट तीन दिवसांची असून बुधवारपासून ती सुरू होणार आहे, असा दावा करण्यात आला आहे. या भेटीचा अधिकचा तपशील देण्यास मात्र कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेेने नकार दिला. त्यामागे सुरक्षेचे कारण सांगण्यात आले. व्लादिवोस्तोक बंदर दोन्ही देशांच्या मध्यभागी आहे. रशिया व उत्तर कोरियाच्या सीमांपासून सुमारे ३०० किमी मध्यावर हे बेट आहे. पुतीन यांच्या भेटीसाठी किम रेल्वेनेच रशियाला जाण्याचा कार्यक्रम आखतील, असे सूत्रांनी सांगितले. गुरुवारी दोन्ही नेत्यांत द्विपक्षीय चर्चा होईल. तत्पूर्वी उन यांच्या आगमनाबद्दल पुतीन स्नेहभोजनाचे आयोजन करणार आहेत. दरम्यान, आठ वर्षांपूर्वी किम जाँग उन यांचे वडील किम जाँग इल यांनी रशियाचे तत्कालीन राष्ट्रपती दमित्री मेदवेदेव यांची भेट घेतली होती. त्यानंतर उत्तर कोरियाच्या नेत्याचा हा पहिलाच रशियन दौरा आहे.

    अण्वस्त्र कार्यक्रमावरून फेब्रुवारीत हनाेई बैठकीतून काहीही निष्पन्न झाले नाही. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सातत्याने आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आंतरराष्ट्रीय दबाव आणि निर्बंधाचे मोठे संकट टाळण्यासाठी उन नवा पर्याय म्हणून पुतीन यांच्याकडे पाहत आहेत. रशियाच्या मदतीने नव्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पोहोच शक्य होईल, असे त्यांना वाटते. म्हणूनच उभय नेत्यांच्या बैठकीतील विषयपत्रिका वेगळी असेल.

Trending