आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामला अहमदाबादचा विशेष लळा आहे. माझे सारे वर्गमित्र विदेशात गेले, परंतु मी इथेच राहिले. शालेय जीवन शिक्षण आणि माैजमस्तीत कसे गेले, ते कळले नाही. महाविद्यालयीन शिक्षणासाठी जेव्हा बायाेमेडिकल अभियांत्रिकीला प्रवेश घेतला तेव्हा भविष्यात काय बनायचे आहे, हे मी ठरवलेले नव्हते. शिक्षण आणि मजेत महाविद्यालयीन दिवस जात असताना २००८ मध्ये द्वितीय वर्षात असताना मला काेणीतरी विचारले की, आठवड्यातून दाेन दिवस झाेपडपट्टीतील मुलांना शिकवू शकाल का? मी त्यास हाेकार दिला आणि आम्ही ६-७ मित्रमंडळी शनिवार, रविवारी दाेन तास गुलबाई टेकरा झाेपडपट्टी परिसरात मुलांना शिकवू लागलाे. या भागातील लाेक अनेक पिढ्यांपासून मूर्ती बनवण्याचे काम करतात. मुलांनादेखील पारंपरिक व्यवसायात झाेकून देतात. नगरपालिकेच्या सरकारी शाळेत आम्ही गंमत म्हणून जाऊ लागलाे, परंतु जसे सरावलाे तसे शिकवण्यात आम्हाला आनंद मिळू लागला. रविवारी सुटीच्या दिवशीदेखील मुलांची भरपूर गर्दी असायची. आम्ही समाजासाठी काहीतरी करू शकताे, ही भावना आमच्यात बळावत हाेती. हे शिक्षणसत्र फार काळ चालले नाही. पदवीची परीक्षा झाल्यानंतर माझे बहुतेक मित्र उच्च शिक्षणासाठी निरनिराळ्या देशांत निघून गेले, परंतु मी येथेच राहिले. आपले भविष्य खराब करणार का, असे माझे मित्र म्हणायचे. मी म्हणाले, हाेय, मी आता या मुलांना साेडू शकत नाही. या मुलांसाेबत तीन वर्षे घालवल्यानंतर जाणवले की, बरीच मुले हुशार आहेत. त्यांना याेग्य मार्गदर्शन करणारा काेणी नव्हता. सरकारी धाटणीचे शिक्षण तसे सर्वज्ञात आहेच. माझ्या मित्रांना म्हणाले, मी या मुलांची जबाबदारी घेतलीय, तुम्हाला वाटत असेल तर विदेशात राहून मदत करू शकता. याचसाेबत मी नाेकरी करू लागले. काही महिन्यांनी ती साेडावी लागली. माझ्या लक्षात आले की, एखाद्या माेठ्या कंपनीत नाेकरी करण्यात मला आनंद मिळणार नाही, जितका या गरजू मुलांचे भविष्य घडवण्यात मिळणार आहे. २०११ मध्ये नाेकरी साेडण्याचा निर्णय घेतल्यानंतर नातेवाईक म्हणाले, पायावर कुऱ्हाड मारून घेत आहेस. परंतु माझ्या वडिलांनी प्रेरणा दिली. म्हणाले, ‘तू या मुलांचे आयुष्य बदलवू शकतेस. समाजात आदर्श पायंडा पाडू शकतेस. आपलं काम सुरू ठेव.’ त्यानंतर मी पूर्ण ताकदीनिशी स्वत:ला झाेकून दिलं. माझ्या प्रयत्नामुळे या गरीब मुलांना सतत मिळत असलेले यश हीच माझी ताकद ठरत राहिली. मी नातेवाईक. परिचितांकडून काही रुपये उसने घेऊन शहरातील निरनिराळ्या भागात खाेल्या, हाॅल भाड्याने घेतले. साऱ्या ठिकाणी शिकवण्यासाठी मी वेळ निश्चित केली हाेती. मुले नियमित शिकावीत, खंड पडू नये यासाठी त्यांच्या आई-वडिलांना राजी करणे मुश्किल हाेते. यापेक्षा कठीण म्हणजे मुलींचे आठवीनंतर शिक्षण सुरू ठेवणे, कारण माेठ्या मुलींना त्यांचे कुटुंबीय घर आणि व्यवसायाच्या कामात गुंतवून ठेवत हाेते. मुलींच्या शिक्षणासाठी मला खूप कष्ट साेसावे लागले. याचसाेबत मी ‘श्वास’ नावाने स्वयंसेवी संस्थेची नाेंदणी केली. लाेकांना कामाची आेळख पटली तेव्हा या चांगल्या कामासाठी निधी गाेळा हाेऊ लागला. आता मी ६५० मुलांना शिक्षण देत आहे. व्यावसायिक शिक्षक नियुक्त केले आहेत. माझे लक्ष केवळ शिक्षणावर नाही, तर त्याचसाेबत मुलांच्या व्यावसायिक प्रशिक्षणावरदेखील आहे. त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी काैशल्य शिकवले जात आहे. ११ वर्षांपूर्वी गुलबाई टेकडीवरून सुरू झालेला हा प्रवास आता अहमदाबादच्या ११ भागांत पाेहाेचला आहे. तीन कंपन्यांच्या सीएसआर फंडातून प्रायाेजकत्व मिळते. बरेच लाेक देणगी देतात. माझे मित्रदेखील साहाय्य करतात, परंतु ही सारी मदत कमी पडते. मी शिकवलेली सुमारे ४५ मुले उच्च शिक्षण घेत आहेत. खासगी शाळांमध्ये त्यांना प्रवेश मिळवून दिला. सरकारी शाळेत सारे काही मिळते, परंतु खासगी शाळेत पाचवीनंतर एका मुलाचा वर्षाचा एकूण खर्च ९० हजार रुपये हाेत आहे. काम कठीण आहे, मात्र दानशूर लाेक मदत करीत असतात. (शब्दांकन : समीर देशमुख)
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.