आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंगल वसवणारा अवलिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही माणसं छंद म्हणून झाडं लावतात. काही बागा फुलवतात. डॉ. प्रेमेन्द्र बोथरा यांनी जंगल वसवलं. मात्र, तो केवळ छंद नव्हता. त्यांची त्या कृतीमागे निसर्गाप्रती असलेली गहिरी अात्मीयता होती. अाजच्या सदरात जाणून घेऊया एका हिरव्यागार अवलियाला…

 

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चा माहिती संकलनाचा प्रकल्प हिंगोली जिल्ह्यात सुरू करायचा होता. जिल्हा समजून घ्यावा या उद्देशाने हिंगोलीला पोहोचलो. ‘थिंक महाराष्ट्र’च्या कामाचे स्वरूप समजल्यानंतर लोक अापसूक त्या त्या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींची नावे सुचवतात, भेटी घडवून देतात असा माझा अनुभव. हिंगोलीतही तेच घडले. मला हिंगोलीतील मंडळी अाग्रहाने प्रेमेन्द्र बोथरा या होमिओपॅथी डॉक्टरांकडे घेऊन गेली.
डॉ. बोथरा यांचे क्लिनिक त्यांच्या घराला जोडून होते. वय चाळिशीपार. गोलाकार चेहरा. माझ्यासोबत अालेले दीपक नेनवाणी म्हणाले, ‘डॉक्टरांनी त्यांच्या गावामध्ये जंगल तयार केलंय.’
मला क्षणभर अर्थबोध झाला नाही. मी डॉक्टरांकडे पाहिले. ते मंद स्मित करत म्हणाले, ‘अामच्या गावात एक डोंगर अाहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत तो उघडा-बोडका होता. अाम्ही त्यावर झाडं लावून तिथं जंगल निर्माण केलंय.’
‘किती मोठा अाहे तो डोंगर?’
‘चौऱ्याऐंशी एकर!’
माझे डोळे विस्फारायचे बाकी राहिले. मनात त्या कामाचा अाणि त्याच्या परिणामाचा अावाका जाणून ‘क’ने सुरू होणारे बक्कळ प्रश्न निर्माण झाले. मी ते विचारले अाणि डॉक्टर सांगू लागले, ‘मी कळमनुरी तालुक्यातील पोतरा गावचा. मी लातूरहून डॉक्टरकीचं शिक्षण घेतल्यानंतर १९९१ मध्ये गावी परतलो. त्यानंतरची दहा वर्षं हिंगोलीमध्ये माझी प्रॅक्टिस स्थिरस्थावर करण्यात गेली. प्रॅक्टिससोबत घरच्या शेतीकडे लक्ष देत होतो. अामच्या गावच्या डोंगराजवळ महादेवाचं मंदिर अाहे. त्याशेजारचा डोंगर रुक्ष वाळवंटासारखा. त्यावर एकही झाड नव्हतं. माझ्या मनात त्या डोंगरावर देवराई निर्माण करावी अशा भीमकाय कल्पना येत. लोक देवाच्या धाकाने देवराईच्या वाटेला जात नाहीत. त्यामुळे तसं जंगल जर देवाच्या सान्निध्यात असेल, तर त्याचं रक्षण होऊ शकेल असा माझा विचार होता.’


‘मी प्रयत्न करायचं ठरवलं. मी झाडांच्या बिया गोळा करू लागलो. त्यांचे सीडबॉल तयार केले. गावातील मंडळींना ती कल्पना सांगितली. तेदेखील सोबत जोडले गेले. गावच्या शाळेतील पाचवी ते सातवी इयत्तेतील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांची सोबत मिळाली. मी जवळपास दहा लाख बिया गोळा केल्या. अाम्ही २००३ ते २००६ अशी तीन वर्षं सीडबॉल तयार करून ते डोंगरावर सातत्याने टाकत-पेरत राहिलो. एकेका विद्यार्थ्याने हजारो बिया पेरल्या. सोबतीला निसर्ग त्याचे काम करत राहिला. बिया रुजल्या. कोंब फुटले अाणि झाडं उगवली. अाता त्या भकास डोंगरावर घनदाट जंगल उभं अाहे.’


डॉक्टर अाणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांनी पोतरा गावचा डोंगर हिरवागार झाला अाहे. त्यावर लाखो झाडे उगवली अाहेत. महत्त्वाचे म्हणजे त्या डोंगरावर पडणारे पावसाचे पाणी, जे पूर्वी झाडांअभावी जमिनीवर थेट पडून वाहून जात असे, ते त्या झाडांमुळे जमिनीत मुरू लागले. पोतरा गावाची पाण्याची पातळी गेल्या काही वर्षांत लक्षणीय प्रमाणात वाढली अाहे. गावाला पूर्वीप्रमाणे पाण्याची अडचण भासत नाही. विहिरींना मुबलक पाणी अाहे. डॉक्टर त्या जंगलाबद्दल अभिमानाने म्हणतात की, ‘हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे ‘मॅन मेड’ जंगल अाहे.’
पोतरा गावचे जंगल मोठे, घनदाट झाले. तेथे वृक्ष अाणि वनस्पती यांच्या नवनव्या जाती अाढळू लागल्या. नवनवे पक्षी राहण्यास येऊ लागले. डॉक्टरांनी केलेल्या पाहणीनुसार त्या जंगलात किमान ४५ प्रकारच्या पक्ष्यांचा अधिवास निर्माण झाला अाहे.


डॉक्टरांचा निसर्गाशी असलेला बंध त्यांच्या प्रत्येक कामातून जाणवतो. ज्याप्रमाणे जंगलाचे इकोसिस्टिमचे जाळे असते, तसे विविध धडपडींचे जाळे डॉक्टरांच्या कामातून जाणवते. डॉक्टरांनी त्यांच्या मालकीच्या अाठ-दहा एकर जमिनीतला एक तुकडा जंगलासारखा वाढू दिला अाहे. त्यावरचा निसर्ग मनमर्जीने पसरला अाहे. तेथेदेखील विविध पक्ष्यांचा अधिवास अाहे.


डॉक्टरांचा झाडांप्रमाणे पक्ष्यांशीदेखील तेवढाच भावबंध अाहे. ते पक्षीनिरीक्षण करतात. त्यांनी फोटोग्राफीचा छंद जोपासला अाहे. त्यांच्याकडे हिंगोली परिसरातील अाणि तेथे येणारे स्थलांतरित अशा सर्व पक्ष्यांचे तब्बल साडेतीन हजार फोटो अाहेत. डॉक्टर फुलपाखरांची बाग वसवण्यासाठी धडपडत अाहेत.


डॉक्टरांशी बोलताना अापण होमिओपॅथी डॉक्टरऐवजी एखाद्या वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापकासोबत बोलत असल्याचा भास होतो. त्यांना झाडा-वेलींची, शेतीची, पक्ष्यांची बक्कळ माहिती अाहे. त्यांच्या जिभेवर त्या झाडा-पक्ष्यांची शास्त्रीय नावे हजर असतात. डॉक्टरांनी वीस वर्षे हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक प्रदेशाचे निसर्गाच्या अनुषंगाने अवलोकन केले अाहे. त्यांच्याकडे त्याबद्दलचे शास्त्रीय दस्तऐवज उपलब्ध अाहेत. डॉक्टर प्रयोगशील पद्धतीने शेती करतात. त्यांनी त्यांच्या शेतात पिकांना विद्राव्य खते देण्यासाठी छोटे अाणि परिणामकारक यंत्र निव्वळ शंभर रुपयांत तयार केले अाहे. एकटा माणूस हाताळू शकेल अशा त्या यंत्राद्वारे खतफवारणीचा खर्च सहा पटीने कमी तर होतोच, सोबत बेफाम खत टाकल्यामुळे जमिनीवर होणारे दुष्परिणामदेखील अाटोक्यात येतात, असे डॉक्टर सांगतात. ते यंत्र त्यांच्या निर्मितीक्षमतेतून नव्हे, तर सर्वसामान्य माणूस, शेती, तिचा कस अाणि उत्पादन याविषयीच्या त्यांच्या विचारमंथनातून जन्माला आलेले अाहे. डॉक्टर म्हणतात, ‘मला असा वेगळा विचार करण्याचा किंवा निसर्गाशी जोडून राहण्याचा वारसा माझ्या वडिलांकडून मिळाला. ते प्रयोगशील शेतकरी होते. त्यांनी त्यांच्या काळात एका एकरात पस्तीस क्विंटल गव्हाचे उत्पन्न घेतले होते. तो त्या वेळचा विक्रम होता. अजूनपर्यंत तो कुणी मोडलेला नाही.’


डॉक्टर बोथरा यांनी इको क्लबची सुरुवात केली. ते हिंगोली शहरातील एका शाळेचे दोनशे विद्यार्थ्यांना बसने पोतरा गावातील शेतात घेऊन जात असत. तेथे दिवसभर निसर्गाचा अभ्यासवर्ग अाणि कार्यशाळा चाले. ते विद्यार्थ्यांना तेथे शेती, पक्षी निरीक्षण, सीडबॉल तयार करण्याचे प्रशिक्षण, वनस्पती-झाडे यांची माहिती अशा बऱ्याच गोष्टी उपलब्ध करून देत. मुलांच्या प्रवासाची जबाबदारी शाळा घेई, तर त्यांची न्याहारी, जेवण अाणि परतताना खास ‘हँडमेड अाइस्क्रीम’ असा खर्च डॉक्टर स्वत: करत. ती मुले माघारी अाल्यानंतर त्यांचे अनुभव लिहून सादर करत. डॉक्टर त्यातील सर्वोत्तम पाच अनुभव निवडून त्या मुलांचा शाळेत जाऊन सत्कार करत असत. त्यांचा तो उपक्रम २०१० ते २०१२ असा तीन वर्षे चालला.


डॉक्टर बोथरा बहुगुणी अाणि बहुप्रयत्नी अाहेत. ते पक्षी-वनस्पती यांच्याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये व्याख्याने देतात. ते चांगले कवीदेखील अाहेत. त्यांनी मराठी, हिंदी अाणि इंग्रजी भाषांत हजारो कविता लिहिल्या अाहेत. त्यांचे अक्षर सुबक अाणि देखणे अाहे. त्यांच्या चार कवितांना परदेशातून चार लाख रुपयांचा पुरस्कार अवचितपणे मिळाल्याची कहाणी डॉक्टर खुलवून सांगतात.
डॉक्टरांना त्यांच्या कामाचा अभिमान जरूर वाटतो, मात्र ते त्या भावनेत अडकून पडलेले नाहीत. ते निसर्गाच्या नवनव्या वाटा शोधत सतत पुढे जात अाहेत.
वाचक डॉ. प्रेमेन्द्र बोथरा यांच्याशी 94221 78321 वा botharapremen15@gmail.com येथे संपर्क करू शकतात.
(लेखक ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अाणि ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे सहाय्यक संपादक अाहेत.)

- किरण क्षीरसागर, मुंबई
info@thinkmaharashtra.com

बातम्या आणखी आहेत...