आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरीट सोमय्यांच्या उमेदवारीचा मुद्दा अधांतरीच, आता केंद्रीय समिती घेणार निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ईशान्य मुंबई मतदारसंघातून भाजपच्या किरीट सोमय्यांच्या उमेदवारीचा निर्णय आता भाजपचे केंद्रीय नेतृत्व घेणार असल्याचे समजते. आगामी निवडणूक कालावधीतील प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांतील समन्वयाबाबत चर्चा करणासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीनंतरही सोमय्यांच्या उमेदवारीबाबत निर्णय होऊ शकला नाही. मात्र, दोन्ही पक्षांदरम्यान विविध स्तरांवर असलेल्या कुरबुरी मिटवून समन्वयाने प्रचाराचे नियोजन करण्याबाबत या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे. 


युती झाल्यानंतरही शिवसेना व भाजप नेत्यांत पुरेसा समन्वय दिसून येत नसल्याने मंगळवारी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची “वर्षा’या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. यात दोन्ही पक्षांंचे वरिष्ठ पदाधिकारी आणि ज्येष्ठ नेते उपस्थित होते. सभांचे नियोजन, मित्र पक्षांचा सहभाग यासारख्या मुद्द्यांवर या वेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार एक सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले, दोन्ही पक्षांत समन्वयासाठी सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली असून लवकरच एकत्रित सभांना सुरुवात होणार होईल. मुंबईतील मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्रित सभेने या मोहिमेचा प्रारंभ होईल.


सोमय्यांना शिवसेनेवरील शेरेबाजी भोवणार?
शिवसेनेने आपल्या कोट्यातील सर्व २३ उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाकडून ईशान्य मुंबईतील जागेवरील लोकसभेचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. २०१४ च्या निवडणुकीत येथून किरीट सोमय्या खासदार बनले होते. त्यामुळे यंदाही त्यांनाच येथून उमेदवारी मिळणे अपेक्षित होते. मात्र, युतीतील तणावाच्या काळात किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे पक्षप्रुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या शेरेबाजीमुळे त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा प्रचंड विरोध आहे. याबाबत विनोद तावडे म्हणाले, या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या बाजूंची कल्पना एकमेकांना आहे. त्यामुळे हा निर्णय आता भाजपचे केंद्रीय नेतृत्व घेईल.


जुन्या जाणत्या नेत्यांकडून घेतले प्रचाराचे मार्गदर्शन
युतीच्या घोषणेनंतर समन्वयासाठी राज्यभरात मनोमिलन मेळावे पार पडले. मात्र, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे नवी मुंबई व पुण्यातील मेळावे रद्द करण्यात आले होते. ही बाब लक्षात घेता लवकरच या ठिकाणी एकत्रित सभांचे आयोजन केले जाणार आहे. याशिवाय, दोन्ही पक्षांमधील जुन्या जाणत्या नेत्यांनीही या बैठकीत मार्गदर्शन केले. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी युतीच्या प्रचारादरम्यान कसे नियोजन केले जात होते, हे सांगताना काही जुने किस्सेही या नेत्यांनी सांगितल्याचे समजते.


नेमके प्रकरण काय? :  २०१४ मध्ये भाजप-शिवसेना युती सत्तेत आली. मात्र, शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये सातत्याने वाक््युद्ध सुरूच होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्वच नेतेमंडळी भाजपवर सडकून टीका करत होती. त्याचवेळी भाजपकडून किरीट सोमय्या, आशिष शेलार यांनी थेट ठाकरेंवर शाब्दिक प्रहार सुरू केला होता. युती झाल्याने टीकेचे बंड शमले मात्र सोमय्या सेनेच्या निशाण्यावरच राहिले. महत्प्रयासाने झालेली युती विनावितुष्ट पार पडावी, यासाठी युतीच्या घोषणेच्या पत्रकार परिषदेतूनही भाजप नेत्यांनी सोमय्यांना निघून जाण्यास सांगितले होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या उमेदवारीलाही शिवसेनेने थेट विरोध दर्शवलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा अद्याप निकालात निघालेला नाही. 

बातम्या आणखी आहेत...