अपडेट / ऑस्कर मेमोरियममध्ये अखेरच्या क्षणी जोडले गेले किर्क डग्लसचे नाव, वयाच्या 103 व्या वर्षी झाले होते निधन

ऑस्कर मेमोरियमच्या माध्यमातून अकादमी गेल्या वर्षभरात जग सोडून गेलेल्या सेलिब्रिटींना श्रद्धांजली वाहते. 

दिव्य मराठी वेब टीम

Feb 08,2020 01:38:00 PM IST


हॉलिवूड डेस्कः अभिनेते किर्क डग्लस यांचे वयाच्या 103 व्या वर्षी मागील बुधवारी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अकादमीने किर्क यांचे नाव मेमोरियममध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. 9 फेब्रुवारी रोजी होणा-या पुरस्कार सोहळ्यात किर्क यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. किर्क डग्लस यांना 1996 मध्ये अकादमीच्या मानद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ऑस्कर मेमोरियमच्या माध्यमातून अकादमी गेल्या वर्षभरात जग सोडून गेलेल्या सेलिब्रिटींना श्रद्धांजली वाहते.


मीडिया रिपोर्टनुसार, बास्केटबॉलचा दिग्गज आणि ऑस्कर विजेते कोबे ब्रायंट यांनाही पुरस्कार सोहळ्यादरम्यान गौरविण्यात येणार आहे. कोबे यांना 'डियर बास्केटबॉल' या लघुपटांसाठी ऑस्कर मिळाला होता.

मीडिया रिपोर्टनुसार, शेवटच्या क्षणी किर्क यांचे नाव जोडले गेले आहे. यापूर्वी मेमोरियम लिस्टमध्ये अनेक मोठी नावे समाविष्ट न केल्यामुळे ऑस्करवर बरीच टीका झाली होती. 2019 मध्ये स्टॅन्ली डोनेन, सँड्रा लोके आणि कॅरोल चॅनिंग या दिग्दर्शकांची नावे सामाविष्ट न केल्याने ऑस्करवर टीका झाली होती.

किर्क डग्लस यांना पहिल्यांदा 1950 मध्ये 'चॅम्पियन' चित्रपटासाठी ऑस्करमध्ये नामांकन प्राप्त झाले होते, त्यानंतर 1953 मध्ये 'द बॅड अँड द ब्यूटिफुल' आणि 1957 मध्ये 'लस्ट फॉर लाइफ' या चित्रपटासाठी ऑस्करमध्ये नामांकन झाले होते. 1996 मध्ये त्यांना अकादमीचा मानद पुरस्कार देण्यात आला होता. याशिवाय 'लस्ट फॉर लाइफ' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कारही त्यांना मिळाला होता.

X