आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंद्रे रसेलच्या झंझावाताने काेलकात्याच्या रायडर्सचा हैदराबादवर राेमहर्षक विजय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेलकाता - नितीश राणापाठाेपाठ (६८) अांद्रे रसेलच्या (नाबाद ४९) तुफानी झंझावाती खेळीच्या बळावर यजमान काेलकाता नाइट रायडर्स संघाने अापल्या एेतिहासिक इडन गार्डन मैदानावर राेमहर्षक विजय संपादन केला. काेलकाता संघाने रविवारी १२ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग (अायपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजयाचे खाते उघडले. काेलकाता संघाने अापल्या पहिल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या सनरायझर्स हैदराबाद संघावर १९.४ षटकांत ६ गड्यांनी विजय मिळवला. हैदराबादसाठी  डेव्हिड वाॅर्नरने (८५) केलेली   झंझावाती खेळी अपयशी ठरली. 

 


प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने ३ बाद १८१ धावा काढल्या. प्रत्युत्तरात यजमान काेलकाता संघाने ४ गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले.  आता हैदराबादचा संघ शुक्रवारी आपल्या घरच्या मैदानावर राजस्थान राॅयल्सविरुद्ध सामना खेळणार आहे. तसेच काेलकाता संघाला मंगळवारी घरच्या मैदानावर पंजाबच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. काेलकात्याच्या विजयात नितिश राणाने अर्धशतकी खेळीचे माेलाचे याेगदान दिले. रसेल हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

 

 

रसेलची तुफानी खेळी :
रसेलने अष्टपैलु खेळी करताना काेलकाता संघाला विजय मिळवून दिला. त्याने गाेलंदाजी करताना दाेन विकेट घेतल्या. तसेच फलंदाजीमध्ये नाबाद ४९ धावांची खेळी केली.त्याने १९ चेंडूंमध्ये प्रत्येकी चार चाैकार आणि षटकारांसह ही खेळी केली. 
 

 

नितीश राणाचे अर्धशतक : 
यजमान काेलकाता संघाच्या विजयासाठी प्रतिभावंत युवा फलंदाज नितीश राणाने एकाकी झुंज दिली.  यासह त्याने आपल्या टीमचा विजयाचा मार्ग सुकर केला.  त्याने  यंदाच्या सत्रातील पहिले आणि या लीगमधील दुसरे अर्धशतक साजरे केले. त्याने ४७ चेंडूमध्ये ८ चाैकार आणि ३ षटकारांसह ६८ धावांची खेळी केली. 

 

 

वाॅर्नर- बेयरस्ट्राेने नाेंदवली पहिली शतकी भागीदारी

यंदाच्या सत्रातील आयपीएलमधील झंझावाताला आता चांगली सुरुवात झाली. दुसऱ्या सामन्यात तुफानी फटकेबाजीने दाेन अर्धशतकांची नाेंद झाली. यात हैदराबादच्या वाॅर्नरने अर्धशतकाचे खाते उघडून दिले.  त्याने  जाॅनी बेयरस्ट्राेसाेबत पहिल्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी रचली. ही यंदाची पहिली सर्वात माेठी भागीदारी ठरली. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...