कथा / ज्ञानाचा नेहमी योग्य उपयोग केला तरच आयुष्य सुखी आणि यशस्वी होते

साधूंनी दोन शिष्यांना डब्यामध्ये गहू दिले आणि म्हणाले दोन वर्षांनंतर ही अमानत घेऊन जाईल...पुढे काय झाले?

रिलिजन डेस्क

Jun 22,2019 12:05:00 AM IST

एका आश्रमामध्ये दोन शिष्यांसोबत एक साधू राहत होते. साधूंनी आपल्या दोन्ही शिष्यांना चांगले शिक्षण दिले. एके दिवशी साधूंनी दोन्ही शिष्यांना एक-एक डबा भरून गहू दिले आणि म्हणाले, मी तीर्थयात्रेवर जात आहे. दोन वर्षांनंतर परत येईल, तेव्हा मला हे गहू परत करा परंतु गहू खराब होणार नाहीत याकडे विशेष लक्ष द्यावे. एवढे बोलून साधू तीर्थयात्रेला निघून गेले.


> एका शिष्याने साधूंनी दिलेला गव्हाचा डबा देवघरात ठेवला आणि दररोज त्याची पूजा करू लागला. दुसऱ्या शिष्याने डब्यामधून गहू काढले आणि शेतात पेरले. दोन वर्षांमध्ये डबाभर गव्हापासून त्याच्याकडे भरपूर गहू जमा झाले होते.


> तीर्थयात्रा पूर्ण करून साधू आश्रमात आले आणि त्यांनी शिष्यांकडे गव्हाचे डबे मागितले. पहिल्या शिष्याने साधूंना डबा दिला आणि म्हणाला गुरुजी मी तुमच्या अमानतची चांगली देखभाल केली आहे. मी रोज या डब्याची पूजा करत होतो. साधूंनी डबा उघडून पाहिला तर गहू खराब झाले होते आणि त्याला कीडही लागली होती. हे पाहून पहिला शिष्य खाली मान घालून निघून गेला.


> दुसरा शिष्य एक पिशवी घेऊन आणि साधूंसमोर ठेवून म्हणाला, गुरुजी ही तुमची अमानत. गव्हाने भरलेली पिशवी पाहून साधू खूप प्रसन्न झाले. ते शिष्याला म्हणाले तू माझ्या परीक्षेत उत्तीर्ण झालास. मी तुला जे काही ज्ञान दिले होते त्याचा तू योग्य उपयोग केलास. यामुळेच तुला गहू सांभाळण्यात यश प्राप्त झाले.


> जोपर्यंत आपण आपले ज्ञान डबाबंद गव्हासारखे ठेवू तोपर्यंत त्या ज्ञानाचा कोणताही लाभ होणार नाही. ज्ञान आचरणात आणावे, इतरांसोबत शेअर करावे. असे केले तरच ज्ञान वाढत राहील आणि त्याचा लाभही मिळेल. या कथेची शिकवण हीच आहे की, आपण आपले ज्ञान डब्यामध्ये बंद करून ठेवू नये, हे वाढवण्याचा प्रयत्न करत राहावा.

X
COMMENT