Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | kokan rain tiware dam broken due to heavy rain

कोकण: तिवरे धरणफुटीच्या घटनेत मृतांचा आकडा 9 वर; अनेक जण अजुनही बेपत्ता, आकडा वाढण्याची भीती

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 03, 2019, 04:31 PM IST

धरणाच्या भिंतींना तडे गेल्याची तक्रार केल्यानंतरही दुर्लक्ष झाल्याचे आरोप

  • रत्नागिरी : कोकणात सुरू चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात असलेले तिवरे धरण फुटले आहे. धरण फुटल्याने जवळपासच्या परिसरात पूर आला आहे. धरणाजवळ असलेली 10-12 घरे या पुरात वाहून गेली. आतापर्यंत या पुराच्या पाण्यातून 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले. यामध्ये 7 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. 24 जण अजुनही बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. तिवरे धरणाची पाणीसाठा क्षमता 0.8 TMC आहे. ही घटना मंगळवारी रात्री 9.30 वाजता घडली. परंतु, प्रशासन आणि माध्यमांमध्ये हे वृत्त सकाळी पोहोचले. घटनास्थळी NDRF टीमचे बचावकार्य सुरू आहे. धरण फुटल्याचा सर्वात मोठा फटका ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे यासह सात गावांना बसला आहे.अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.

    दोन वर्षांपूर्वीच भिंतींना तडे गेले होते...
    प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलिस आणि बचाव पथकासह एनडीआरएफची टीम लोकांना वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु, अनेक जण अजुनही बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तिवरे धरण 2000 मध्ये बांधण्यात आले होते. स्थानिकांनी या धरणफुटीसाठी प्रशासनाला जबाबदार धरले आहे. धरणाच्या भिंतींना तडे गेल्याची तक्रार दोन वर्षांपूर्वीच प्रशासनाकडे करण्यात आली होती. अनेक ठिकाणी पाण्याची गळती सुद्धा दिसून आली होती. प्रशासनाने वेळीच डागडुजीचे काम केले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती.

Trending