आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षांतराचा कोकाटे पॅटर्न : पाचव्या पक्षाकडून सहावी निवडणूक!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजेंद्र देशपांडे 

सिन्नर - राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. नाशिक जिल्हाही या तडाख्यातून सुटलेला नाही. जिल्ह्याच्या राजकारणात इच्छुक उमेदवारांनी पक्षांतराचा सपाटा लावला आहे. राजकीय वातकुक्कुटाच्या दिशेने धावाधाव करण्याची ही परंपरा तशी नवी नाही. दिवंगत माजी खासदार उत्तमराव िढकले मूळ काँग्रेसी. मग ते समाजवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले. पालिकेच्या राजकारणात अपक्षांची आघाडी बनवून महापौर तद्नंतर शिवसेनेकडून खासदार झाले. पुढे पक्षांतर करून मनसेचे आमदार म्हणूनही त्यांनी राजकारण केले. त्यांचे चिरंजीव राहुल हेही आता उमेदवारीसाठी हाच वारसा पुढे नेण्याच्या तयारीत आहेत. अशीच आणखीही दोन उदाहरणे सध्या चर्चेत आहेत. पैकी एक आहेत दिंडोरीचे धनराज महाले व सिन्नरचे माणिकराव कोकाटे...
 

राणेसांठी १०० आमदारक्या ओवाळून टाकण्याचे कोकाटेंचे वक्तव्य गाजले
> १९९९ : काँग्रेस पक्षात असलेल्या माणिकराव काेकाटे यांनी बंडखोरी केली. यानंतर त्यांनी विधानसभेची निवडणूक शिवसेनेकडून लढवली आणि जिंकलीही. 
> २००४ : कोकाटे सलग दुसऱ्यांदा सेनेकडून विजयी झाले. बंड करून काँग्रेसमध्ये गेलेल्या नारायण राणेंसाठी १०० आमदारक्या आेवाळून टाकण्याचे त्यांचे विधान गाजले. 
> २००९ : माणिकराव काेकाटे यांनी तिसरी निवडणूक पुन्हा काँग्रेसकडून जिंकली.
> २०१४ : शिवसेना-भाजप युती तुटल्याने एेनवेळी काेकाटे यांनी भाजपची उमेदवारी पटकावली. मात्र सेनेच्या राजाभाऊ वाजेंनी काेकाटेंवर मात केली.
> २०१९ : पाचवी व लाेकसभेची निवडणूक त्यांनी भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून लढवली. पण त्यांना अनामत रक्कमही गमवावी लागली.
> २०१९  : आता कोकाटेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत तिकीट मिळवले. ते राजकीय आयुष्यातील सहाव्या लढाईसाठी पाचव्या पक्षाकडून सज्ज झाले आहेत.
 

धनराज महाले : राष्ट्रवादीकडून हरले, आता शिवसेनेकडून तिकीट 
अवघ्या ४ महिन्यांपूर्वीची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढून पराभूत झालेल्या धनराज महालेंना शिवसेनेने दिंंडाेरीतून तिकीट दिले आहे. महाले यांचे वडील हरीभाऊ महाले मूळ जनता दलाचे. पण धनराज यांना यश मिळाले ते शिवसेनेत आल्यावर. प्रथम जिल्हा परिषद सदस्य व नंतर आमदार म्हणून त्यांनी काम केले होते. मात्र, लोकसभेत राष्ट्रवादीमध्ये जाऊन निराशा पदरी पडल्यावर त्यांनी आता पुन्हा यू टर्न घेतला असून तिकीटासह शिवसनेत परतले आहेत. राजकीय पक्षांची ध्येयधाेरणे इच्छुकांकरवी सोयीने कशी वाकवली जातात त्याची चर्चा यानिमित्ताने रंगू लागली आहे.

बातम्या आणखी आहेत...