आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र बुडत असताना मुख्यमंत्री काय वाजवत होते? 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस- राष्ट्रवादीच्या ताब्यातलं सांगली भाजपकडे आलं म्हणजे तुमचं घोडं कृष्णेत न्हालं! तीच कृष्णामाय कोपली. सांगलीत घर खचलं, चूल विझली, पण तुम्हाला कशाची चिंता? विधानसभेची निवडणूक विक्रमी बहुमतानं जिंकायची, एवढ्याच आकांक्षेने झपाटलेल्यांना दुष्काळ काय आणि महापूर काय? निवडणूक कशी जिंकायची एवढेच शस्त्र आणि शास्त्र ज्यांना ठाऊक, त्यांना कशाचे काही पडलेले नसते. महाराष्ट्र प्रगत आणि त्यातही पश्चिम महाराष्ट्र अधिक प्रगत, असे अनेकदा ऐकवले जाते, तोच पश्चिम महाराष्ट्र आज मोडून पडला आहे.  सांगलीचे आमचे ज्येष्ठ बातमीदार गणेश जोशी यांचं घर पाण्याखाली आहे. तिथला तपशील ते सांगत होते, तेव्हा आमच्या वृत्तसंपादकाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. आमचे अन्य तीन सहकारी दोन दिवसांपासून अन्न- पाण्यावाचून तिथं अडकून पडले होते. आज कशीबशी त्यांची सुटका झाली. कुलदीप माने या 'एबीपी माझा'च्या पत्रकाराला पूरस्थितीचं वृत्तांकन करताना 'ऑन एअर' रडू कोसळलं. सांगली, कोल्हापूर, साताऱ्यात, तिकडे कोकणात आणि गडचिरोलीतही मोडून पडलेले संसार बघताना नेहमीची तटस्थता विसरून माध्यमं शोकव्याकुळ झाली आहेत. सत्ताधारी मात्र इनकमिंग सोहळ्यांच्या उन्मादात मग्न आहेत. महाराष्ट्र बुडत असताना कोणत्या महाजनादेशाचे तुणतुणे वाजवले जात आहे? उद्धवांचे सरकार तर अजबच आहे, पण देवेंद्रांकडून तरी अशा संवेदनशून्यतेची अपेक्षा महाराष्ट्राला नव्हती.  पाऊस लहरी आहे, पण तुमचे काही व्यवस्थापन आहे की नाही? पलूसजवळच्या ब्रह्मनाळ गावात बोट बुडून माणसं मरतात. 'बाबा, तुम्ही कुठं आहात?' असा आक्रोश चिमुरडी करते. आईच्या मृतदेहापाशी तिच्या लेकरांचे हुंदके कृष्णामाय पोटात घेते. ही आपत्ती अस्मानी आहे हे खरेच, पण हे काही एका रात्रीत घडले नाही. 'महाजनादेश' यात्रेवर निघालेल्या मुख्यमंत्र्यांकडे यापैकी कशाचेच अपडेट्स नव्हते की काय? सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात दोन ऑगस्टला अतिवृष्टी होऊन हजारो एकर जमीन खचली. कोयना धरणाचे सहा दरवाजे दोन फुटांनी उघडण्यात आले. कृष्णेची पाणी पातळी वाढली. पाच ऑगस्टला कोयना ९५ टक्के भरले. पाटणमध्ये पाणी शिरले. त्याच दिवशी पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली. पुणे बंगळुरू महामार्ग बंद करण्याची वेळ आली. त्याच दिवशी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्य सरकारला याचे गांभीर्य कळवले. एनडीआरएफची दोन पथकं कोल्हापुरात दाखल झाली. गेल्या पंधरा वर्षांतील सगळ्यात मोठा पूर सांगलीत आला. एवढे सगळे आठवडाभरात घडत होते आणि मुख्यमंत्री काय करत होते? कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मदत आणि पुनर्वसन खाते ज्यांच्याकडे आहे, ते सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख कुठे होते? प्रशासनाकडे साधनसामग्री नाही. ब्रह्मनाळ गाव धोक्याच्या उंबरठ्यावर आहे, म्हणून गावकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वीच बोटीची मागणी केली होती. त्यांना ती मिळाली नाही. 'संथ वाहते कृष्णामाई', असे म्हणणाऱ्यांना दुथडी भरून वाहाणाऱ्या कृष्णेच्या रौद्ररूपाचा अंदाज नसावा. तिच्या या रौद्ररूपालाही आपण जबाबदार आहोत. सरासरीपेक्षा फार जास्त पाऊस न पडताही पूर कसे येत आहेत? पर्यावरणाची हानी हे याचे खरे उत्तर आहे. आपण नद्या मरणासन्न करून टाकल्या, नाले बुजवले, नदीपात्रात बांधकामे केली, भवताल उजाड केला.  उशिरा का असेना, सरकार जागे झाले आहे. सदैव 'इलेक्शन मोड'वर असलेल्या हवाई मुख्यमंत्र्यांना आता कुठे जमिनीचे भान आले आहे. केवळ घोषणा करून चालणार नाही. ही प्रत्यक्ष कृतीची वेळ आहे. ही तळमळ राजकीय नेतृत्वाला कृतीतूनच सिद्ध करावी लागणार आहे. सर्व राजकीय पक्षांनी आता तरी राजकारण विसरावे. आणि सारे मतभेद विसरून एकदिलाने कामाला लागावे. 

संजय आवटे, संपादक 
 

बातम्या आणखी आहेत...