आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रीवादी चळवळींना मिळतोय #SocialSupport

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोमल कुंभार

स्त्रियांच्या हक्कांसंबंधी आणि शोषणाविरूद्धच्या चळवळींना सोशल मीडियामुळे मोठा पट मिळाला आहे. योग्य हॅशटॅग आणि सोशल मीडिया कसा वापरायचा, याची जाण असेल, तर कोणतीही चळवळ अगदी सहजपणे हव्या असलेल्या लोकांपर्यंत पोहोचते. पण, त्याच वेळी या चळवळी वणव्यासारख्या पेटून काही काळाने विझून न जाता त्यातून अपेक्षित परिणाम साधला जावा, यासाठीही प्रयत्न होत आहेत.
सोशल मीडिया किंवा समाज माध्यमं हा आजच्या काळाचा अविभाज्य घटक झाला आहे. पूर्वी एखादी बातमी किंवा माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी खूप मोठा कालावधी जात होता. पण, तो आता अवघ्या काही सेकंदांवर आला आहे. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात घडलेल्या कुठल्याही घटनेचे पडसाद तत्काळ जगभरात उमटतात. सोशल मीडियाने ही ताकद लोकांच्या हातात दिली आहे. माहितीचं लोकशाहीकरण करण्यात या माध्यमांचा खूप मोठा वाटा आहे. जगभरात झालेल्या पूर्वीच्या ऐतिहासिक चळवळींना लोकांपर्यंत पोहोचून, त्यांचा सहभाग घेणं आणि त्या पुढे चालवणं हे एक खूप मोठं दिव्य असायचं. त्या चळवळी अनेक महिने चालायच्या. सोशल मीडियावर, विशेषत: ट्विटर, फेसबुकवरुन चाललेल्या चळवळी जितक्या वेगाने पसरतात तितक्याच वेगाने त्या संपुष्टातही येतात. पण, तरीही त्यांची व्याप्ती आणि तीव्रता कमी होत नाही. सोशल मीडिया आल्यापासून महिलांच्या अनेक चळवळी ठिकठिकाणी चालवल्या गेल्या आणि त्या याच मीडियामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या.सर्वांत अलीकडची आणि सर्वदूर पोहोचलेली चळवळ म्हणजे स्त्रियांच्या लैंगिक शोषणाबाबत चालवली गेलेली ्#MeToo ही चळवळ. तराना बुर्क यांनी ही चळवळ लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या स्त्रियांना आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडता यावी, यासाठी सुरू केली. २०१७ मध्ये अभिनेत्री एलिसा मिलानो यांनी एक ट्विट करून या चळवळीला वाचा फोडली आणि तेव्हापासून ‘मी टू’चे अनुभव जगाच्या कानाकोपऱ्यातून वणवा पेटल्यासारखे येऊ लागले. संपूर्ण जग या अनुभवांमुळे हादरलं. फ्रान्समध्ये ही चळवळ बॅलन्सटॉनपोर्क, इटलीमध्ये क्वेलाव्होल्टाचे, तुर्कस्तानात सेन्डेअनलट, अरबी देशांमध्ये एनाकमान, चीनमध्ये राइसबनी, स्पेनमध्ये क्युएन्टालो अशा नावांनी चालवली गेली. या चळवळीमुळे अनेक आरोपींना शिक्षा झाली, सरकारी नियमांमध्ये-कायद्यांमध्ये सुधारणा झाली, कंपन्यांनी लैंगिक शोषणासंबंधी आपली धोरणे बदलली. त्याचबरोबर लैंगिक संबंधांसाठी संमतीची आवश्यकता आणि लैंगिक शोषण संपुष्टात आणण्याबाबत जगभरात चर्चा सुरू झाली.‘मी टू’ला जगभरातून खूप प्रतिसाद मिळाल्यावर  २००९ मध्ये भारतात एक महत्त्वाची चळवळ उभी राहिली आणि तिच्यामुळे सोशल मीडियाची ताकद खऱ्या अर्थाने कशी वापरता येईल, हे लोकांना कळलं. #PinkChaddi नावाची ही चळवळ प्रमोद मुतालिकांच्या नेतृत्वाखालील श्रीराम सेनेने मंगळुरूमध्ये व्हॅलेंटाइन दिनाच्या निमित्ताने पबमध्ये जाणाऱ्या महिलेला केलेल्या मारहाणीचा विरोध करण्यासाठी चालवली गेली. व्हॅलेंटाइन दिनाच्या निमित्ताने किमान लाखभर गुलाबी रंगाची अंतर्वस्त्रं त्यांना पाठवली गेली. लाखो लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या मोहिमेला आपला पाठिंबा दर्शवला. या चळवळीला विरोध म्हणून ‘पिंक कंडोम’ चळवळही चालवली गेली, पण ती फारशी चालली नाही. श्रीराम सेनेवर त्यानंतरच्या काळात बंदी आणली गेली.शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश नाकारण्याच्या मुद्द्यावर २१ नोव्हेंबर २०१५ ला पंजाब विद्यापीठातील निकिता आझाद या विद्यार्थिनीने #HappyToBleed नावाची एक चळवळ सुरू केली. तिलाही सोशल मीडियामुळे प्रचंड प्रतिसाद मिळाला. भारतातील महिलांच्या मासिक पाळीभोवती असलेल्या अंधश्रद्धा दूर व्हाव्यात, त्यांच्या आरोग्याबाबत चर्चा व्हावी, केवळ पाळी सुरू आहे म्हणून त्यांना धार्मिक ठिकाणी प्रवेश नाकारण्यात येऊ नये, अशी अनेक उद्दिष्टं या चळवळीने समोर ठेवली होती. या चळवळीमुळे महिलांच्या आरोग्याच्या अनेक प्रश्नांवर खुलेपणाने चर्चा सुरू झाली, ही खूप महत्त्वाची गोष्ट ठरली.‘सेंटर ऑन फॉरेन रिलेशन्स’ने सोशल मीडियाने स्त्रीवादाला एक वेगळा आयाम कसा दिला, या आशयाचा लेख प्रकाशित केला आहे. त्याच्या लेखिका कॅथेरिन पॉवेल म्हणतात, की पारंपरिक प्रसार माध्यमांमध्ये अजूनही महिलांचं पुरेसं प्रतिनिधित्व नाही. २०१७ च्या वीमेन्स मीडिया सेंटर रिपोर्टनुसार वृत्तपत्रे टीव्ही, इंटरनेट आणि वायर न्यूजमध्ये महिलांना फक्त ३८ टक्के बायलाइन मिळतात आणि विकिपीडियामध्ये फक्त १५ टक्के महिला योगदान देतात. परंतु, सोशल मीडियामध्ये ही दरी सांधण्याची क्षमता आहे. कतार कॉम्प्युटिंग रिसर्च इन्स्टिट्यूटमधील एका संशोधनात असं दिसून आलं, की प्रत्यक्ष आयुष्यात जास्त लिंग असमानता असलेल्या देशांमध्ये महिलांचे ऑनलाइन अस्तित्व खूप जास्त आहे. उदाहरणार्थ, पाकिस्तानमध्ये गुगल प्लसवर महिलांचे फॉलोअर्स पंचवीस असतील, तर त्याच वेळी पुरुषांचे सोळा आहेत आणि ट्विटरवर महिलांचे ६०० फॉलोअर्स असताना पुरुषांचे २२२ आहेत. हीच गोष्ट चळवळींमध्येही प्रतिबिंबित होते असं दिसतं.२०१४ मध्ये ख्यातनाम गायिका एम्मा वॉटसन यांना नंदिता   समानतेसाठी पुरुषांनीही पुढाकार घ्यावा, यासाठी आवाहन केलं. त्यासाठी त्यांनी #HeForShe नावाची एक चळवळ सुरू केली. ही चळवळ सुरू झाल्यानंतर जगभरातल्या अनेक स्त्री-पुरुषांनी या हॅशटॅगचा वापर करून लिंगाधारित भेदभाव नष्ट करण्यासाठी आपण सहभागी असल्याची खात्री दिली आहे. भारतात बलात्कारपीडितेवर होणारे आरोप आणि सार्वजनिक ठिकाणी होणारा लैंगिक छळ यांचा प्रतिकार करण्यासाठी #IWillGoOut नावाची एक चळवळ सुरू झाली. ही चळवळ रस्त्यांवर तर चालवली गेलीच, पण सोशल मीडियावरही तिने लक्ष वेधून घेतलं. यूएन वीमेननेही या चळवळीची दखल घेतली आणि जगातल्या अनेक ठिकाणी तिला पाठिंबा देण्यासाठी आंदोलनं केली गेली.भारतीयांच्या गोऱ्या रंगाच्या वेडाचा फायदा अनेक फेअरनेस क्रीम्सनी घेतला. त्याला आव्हान देण्यासाठी २००९ मध्ये #DarkIsBeautiful नावाची एक चळवळ सुरू करण्यात आली. चेन्नईतल्या ‘वीमेन ऑफ वर्थ’ नावाच्या एका संस्थेने ही चळवळ सुरू केली. २०१३ मध्ये नंदिता दास या अभिनेत्रीने डार्क इज ब्यूटिफुल या चळवळीला पाठिंबा दर्शवल्यानंतर या चळवळीला मोठा आयाम मिळाला. ट्विटरवर या चळवळीला पाठिंबा दर्शवण्यासाठी #adswedontbuy हा हॅशटॅगही चालवला गेला. यामुळे फेअरनेस क्रीम्सच्या जाहिरातदारांनी काळ्या, सावळ्या रंगाच्या मुली सुंदर नसतात या पद्धतीच्या चालवलेल्या जाहिराती बंद कराव्या लागल्या. स्त्रियांच्या हक्कांसंबंधी आणि शोषणाविरुद्धच्या चळवळींना सोशल मीडियामुळे मोठा पट मिळाला आहे. योग्य हॅशटॅग आणि सोशल मीडिया कसा वापरायचा, या गोष्टी माहीत असतील, तर कोणतीही चळवळ अगदी सहजपणे आपल्याला हव्या असलेल्या लोकांपर्यंत पोहोचते. पण, त्याचवेळी या चळवळी वणव्यासारख्या पेटून लगेच विझून जाणाऱ्या ठरणार नाहीत, तर त्यांच्यामुळे एक परिणाम साध्य केला जावा, यासाठीही काम केलं जातंय आणि ते करणं गरजेचंही आहे. त्यासाठी सरकारी, न्यायालयीन, सामाजिक यंत्रणा जास्तीत जास्त लोकाभिमुख आणि सोशल मीडियासाठी प्रतिसादात्मक असणंही गरजेचं ठरतं.    

संपर्क- ९७६९७४३६८१

बातम्या आणखी आहेत...