आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेंढवा दुर्घटना : आदेश दिल्यानंतरही स्ट्रक्चरल ऑडिट नाही, शनिवारपर्यंत राज्य सरकारला अहवाल देणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे -  काेंढवा येथील इमारतीची  संरक्षक भिंत काेसळून १५ मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी पुणे जिल्हाधिकारी यांनी पाच जणांची समिती स्थापन केली असून उपजिल्हाधिकारी रमेश काळे हे त्याच्या अध्यक्षपदी आहेत. यामध्ये कामगार आयुक्त, पुणे महापालिकेचे अभियंता युवराज देशमुख, सहायक पाेलिस आयुक्त अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांचा समावेश आहे. या समितीने साेमवारी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष प्राथमिक पाहणी केली असून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना ते लवकरच सादर करणार आहेत. काेंढवा येथील दुर्घटनेसारख्या घटनांची पुनरावृत्ती हाेऊ नये यासाठी जिल्हाधिकारी नवलकिशाेर राम यांना सर्तकता बाळगण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. दरम्यान, घटनास्थळाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिल्यानंतर ते करण्यात आले नसल्याची कबुली मनपा अभियंत्यांनी दिली.

 

भविष्यात दुर्घटना हाेऊ नये यासाठी नागरी वस्तीत असणाऱ्या इमारतींच्या सुरक्षितता तपासण्याचे सुचवण्यात आले आहे. त्याप्रमाणे पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागातर्फे प्रत्यक्ष बांधकाम ठिकाणांची पाहणी करून त्रुटी आढळल्यास आल्यास त्यात दुरुस्ती करण्याचे आदेश विकासकाला देण्यात येणार आहेत. काेंढव्यात ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणचे स्ट्रक्चरल आॅडिट करणे आवश्यक असून त्यानुसार त्याचा अहवाल तत्काळ देणे अपेक्षित असताना अद्याप स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले नसल्याची कबुली मनपा अभियंत्यांनी दिली आहे. घटना घडून तीन दिवस उलटल्यानंतर ही अद्याप सीमाभिंत पुन्हा बांधण्याबाबत काेणत्याही पावले उचलण्यात आली नसून केवळ भिंतीच्या खड्ड्यात पडलेल्या चार कार बाहेर काढण्यात आल्या आहे. पावसाचा जाेर दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने सीमाभिंतीच्या ठिकाणी माती खचण्याचे प्रमाण वाढत असून त्याचा परिणाम अॅल्काॅन स्टायलस या इमारतीच्या सुरक्षिततेवर हाेणार असल्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. सदर घटनेनंतर बिल्डर व त्याच्या भागीदारांवर सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याने ते पसार झाले असून इमारतीची सुरक्षा एेरणीवर आली आहे. 


अॅल्काॅन स्टायलसच्या रहिवाशांचे पुणे मनपाला पत्र
अॅल्काॅन स्टायलस साेसायटीत राहाणाऱ्या कुटुंबांनी ही घटना घडल्यानंतर साेसायटीची बैठक घेत विविध प्रश्न उपस्थित करत पुणे मनपा आणि महापाैर मुक्ता टिळक यांना साेमवारी पत्र देत काही मागण्या करून त्याची तत्काळ पूर्तता करण्यात यावी, अशी विनंती केली आहे. झालेल्या दुर्घटनेमुळे रहिवासी वास्तूला धाेका निर्माण झाला असून याबाबत राहत्या वास्तूची व राहिलेल्या संरक्षक भिंतीची चाचणी सीआेईपीमार्फत करण्यात येण्याचे आदेश द्यावा. त्याचा अहवाल ४८ तासांत सादर करण्याचे आदेश पालकमंत्री यांनी दिले असून त्याची पूर्तता करावी, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.


शनिवारपर्यंत राज्य सरकारला अहवाल देणार
निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे म्हणाल्या, विविध गाेष्टींची पडताळणी करून जिल्हाधिकारी या अहवालाची तपासणी करून शनिवारपर्यंत शासनाला सादर करतील. शासनाला प्राथमिक अहवाल देण्यात आला आहे.